तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कार्यवाही कधी ?

तीर्थक्षेत्र आळंदी अद्यापही अनेक सुविधांपासून वंचित 

श्री. अजय केळकर, कोल्‍हापूर आणि श्री. अमोल चोथे, पुणे

पुण्‍यापासून अवघ्‍या २५ किलोमीटरवर असलेल्‍या तीर्थक्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींनी वास्‍तव्‍य केले असून तेथे त्‍यांचे समाधीस्‍थान आहे. हे समाधीस्‍थान इंद्रायणीच्‍या काठी असून आषाढ मासात एकादशीच्‍या दिवशी संत ज्ञानेश्‍वरांची पालखी निघते आणि ती पंढरपूर येथे पोचते. त्‍यामुळे वारकर्‍यांच्‍या जीवनात आळंदीचे स्‍थान अनन्‍यसाधारण आहे. असे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले आळंदी मात्र अद्याप अनेक सुविधांपासून वंचित आहे. शहरात महत्त्वाच्‍या ठिकाणी माहितीफलक नसणे, अपुरे वाहनतळ, मुख्‍य घाटावर दिव्‍यांच्‍या सुविधेचा अभाव, दर्शनाच्‍या रांगेची समस्‍या, इंद्रायणी नदीचे प्रदूषण यांसह अनेक समस्‍यांकडे शासन-प्रशासन स्‍तरावर दुर्लक्ष आहे. आळंदीच्‍या विकासासाठी ९ वर्षांपूर्वीच विकास आराखडा संमत झाला आहे; तो मात्र अद्यापही अगदी प्राथमिक टप्‍प्‍यावरच आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ने महापालिकेत समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या २३ गावांसह ‘पी.एम्.आर्.डी.ए.’ हद्दीचा विकास आराखडा वर्ष २०२१ मध्‍ये घोषित करण्‍यात आला होता. या विकास आराखड्यानुसार आळंदी येथे ‘तीर्थक्षेत्र केंद्र’ करण्‍याचे घोषित केले; मात्र ही केवळ घोषणाच झाली, त्‍यावर पुढे कोणतीच कृती झाली नाही.

संत ज्ञानेश्‍वरांनी चालवलेली भिंत दुर्लक्षित !

चांगदेव नावाचे एक ज्‍येष्‍ठ योगी संत ज्ञानेश्‍वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्‍या वेळी संत ज्ञानेश्‍वर आपल्‍या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवांची भेट घेण्‍यासाठी संत ज्ञानेश्‍वरांनी त्‍या भिंतीलाच चालवत नेले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ती भिंत आळंदीत आहे. या भिंतीच्‍या परिसरातही सध्‍या विशेष असा काही माहिती फलक लावण्‍यात आलेला नाही. नवीन आलेल्‍या माणसालाही येथे नेमके काय आहे ? ते कळत नाही, अशी स्‍थिती आहे.

पद्मावतीदेवी मंदिराकडे जाणारा रस्‍ता गेली अनेक वर्षे दुर्लक्षित !

तीर्थक्षेत्र आळंदीतून अवघ्‍या दीड किलोमीटर अंतरावर असणार्‍या पद्मावतीदेवी मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्‍सवात तर भाविकांची अलोट गर्दी होते. पितृपक्ष झाल्‍यावर लवकरच नवरात्रही येत आहे; मात्र या रस्‍त्‍यावर अनेक खड्डे असून त्‍यावरून चालणेही कठीण आहे. गेली अनेक वर्षे हा रस्‍ता दुर्लक्षित असून त्‍यासाठी आंदोलनही करण्‍यात आले; मात्र पालिका प्रशासन त्‍यादृष्‍टीने विशेष काही करत नाही.

वाहनतळाचा प्रश्‍न गंभीर !

आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्‍याने येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात; मात्र मुख्‍य मंदिर परिसरात वाहने लावण्‍यासाठी जागा अपुरी आहे. त्‍यामुळे या परिसरात वाहनकोंडी ही ठरलेली असते. आळंदी क्षेत्रात मोठ्या संख्‍येने मंगल कार्यालये असल्‍याने येथे मोठ्या प्रमाणात विवाह होतात. त्‍यामुळे अनेक वेळा आलेले नातेवाईक हे रस्‍त्‍यावरच वाहने लावतात. ही वाहने अनेक वेळा प्रदक्षिणा रस्‍ता, गोपाळपुरा, चाकण रस्‍ता अशा ठिकाणीही उभी केली जातात. त्‍यामुळे पादचार्‍यांनाही अनेक अडचणी येतात. वाहने लावण्‍यासाठी सुसज्‍ज वाहनतळाची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आळंदी नगर परिषदेकडून वाहनतळाच्‍या शुल्‍क आकारणीसाठी नेमलेल्‍या ठेकेदारांच्‍या कर्मचार्‍यांकडून भाविकांची लूट तर ठरलेलीच असते. अनेक वेळी चारचाकीसाठी ५० रुपये शुल्‍काऐवजी १०० रुपये सर्रास घेतले जातात. या संदर्भात नगर परिषदेकडे तक्रार करूनही विशेष नोंद घेतली नाही.

तरी ‘या संदर्भात शासन आणि प्रशासन स्‍तरावर पाठपुरावा घेऊन उपाययोजना काढाव्‍यात’, अशी मागणी भाविक अन् वारकरी यांच्‍याकडून होत आहे.