‘शाडू मातीच्‍या श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, हे निवळ थोतांड असण्‍यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा !

सध्‍या श्री गणेशमूर्ती वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍यास समाजातील काही व्‍यक्‍ती, तथाकथित पुरो(अधो)गामी संघटना आणि प्रशासन जलप्रदूषणाच्‍या नावाखाली निर्बंध घालत आहेत. याविषयीची जर वस्‍तूस्‍थिती पाहिली, तर पाण्‍याचे प्रदूषण करणार्‍या इतर बर्‍याच गोष्‍टींकडे प्रशासन आणि तथाकथित पुरो(अधो)गामी दुर्लक्ष करत आहेत, हे लक्षात येते. यांवर विचार न करता श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी समस्‍या निर्माण केली जात आहे. हा बोभाटा थांबणे आवश्‍यक आहे. सर्वसामान्‍य हिंदूंची कशी दिशाभूल होते आणि त्‍याला तो कसा फसतो ? ते या लेखातून लक्षात येईल.

डॉ. अजय जोशी

या लेखामध्‍ये निसर्ग, तसेच पशूपक्षी आणि मानव यांच्‍यासाठी हानीकारक, प्रसंगी जीवघेणे अशा विविध प्रकारच्‍या प्रदूषणांचा विचार केला आहे. तसेच हिंदूंचे आराध्‍य असलेल्‍या गणरायाच्‍या भावभक्‍तीने पुजलेल्‍या मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन केल्‍याने प्रदूषण होते का ? यावर प्रकाश टाकण्‍यात आला आहे.

१. विविध प्रकारे होणारे जलप्रदूषण श्री गणेशमूर्ती विसर्जनाला लागू होते का ?

अ. जलप्रदूषणाचे पुढील मुख्‍य प्रकार आहेत – भूजल प्रदूषण, पृष्‍ठभागावरील जलप्रदूषण, तेल गळती, सूक्ष्मजैविक प्रदूषण, रासायनिक जलप्रदूषण, थर्मल प्रदूषण. असे प्रदूषण गणेशमूर्ती विसर्जन केल्‍यामुळे कुठल्‍याही पद्धतीने होत नाही.

आ. जलप्रदूषण करणार्‍या मुख्‍य प्रदूषकांमध्‍ये सूक्ष्मजीव मोडतात. हे जीव साहजिकच जिवाणू आणि विषाणू अशा दोन्‍ही प्रकारचे असतात अन् ते सांडपाण्‍यामुळे येतात. या व्‍यतिरिक्‍त कीटक, जिवाणू अथवा विषाणू नष्‍ट करण्‍यासाठी ‘पॉयझनस ऑर्गेनिक्‍स’ (विषारी सेंद्रिय) असलेले ‘डीडीटी’ तत्‍सम जंतूनाशक, ‘एंडोसल्‍फान’ आणि ‘मॅलेथिऑन’ नावाचे कीटकनाशक, ‘क्‍लोरडेन’ अशी घातक रसायने असून ती मोठ्या प्रमाणात वापरण्‍यात येतात. त्‍यामुळेही जलप्रदूषण होते. तसेच ‘आर्सेनिक’, ‘क्रोमियम’, शिसे, तांबे आणि लोह यांसारख्‍या जड धातूंचा वापर होत असल्‍यामुळे अन् ते नैसर्गिकरित्‍या काही प्रमाणात खनिजांमध्‍ये आढळत असल्‍याने जलप्रदूषण होते. अशा प्रकारचे कोणतेही प्रदूषण गणेशमूर्ती विसर्जन केल्‍यामुळे होत नाही.

इ. पाण्‍यातील प्रदूषणाचा मुख्‍य स्रोत, म्‍हणजे कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि प्रक्रिया केलेले सांडपाणी हे होत. शेतीच्‍या उपक्रमांमधून पोषक आणि कीटकनाशके, तर उद्योगाद्वारे हवेत सोडले जाणारे प्रदूषक जे नंतर भूमीवर अन् जलप्रवाहात परत येतात, तथाकथित ‘डिफ्‍यूजन’द्वारे (एक प्रकारच्‍या क्रियेद्वारे) प्रदूषण यांसारख्‍या व्‍यापक स्रोतांच्‍या प्रदूषणाचाही पाण्‍यावर विपरीत परिणाम होतो. अशी कोणत्‍याही प्रकारची घातक क्रिया गणेशमूर्ती विसर्जन केल्‍यामुळे जलावर होत नाही.

ई. जल प्रदूषकांचे एकूण जे प्रकार आहेत, ज्‍यातून पाणी दूषित होणे स्‍वाभाविक असते, ते सूक्ष्मजीव, विषाणू, ‘पायरोजेन्‍स’ (तापमानवाढ करणारा घटक), विरघळलेले अजैविक ‘आयन’, विरघळलेली सेंद्रिय संयुगे, वायू हे गणेशमूर्ती विसर्जन केल्‍यामुळे रोगजनक किंवा घातक प्रकारचे नसतातच, असे लक्षात येईल.

उ. कीटकनाशके किंवा औद्योगिक कचरा यांसारखी हानीकारक रसायने जलस्रोतांमध्‍ये अमर्याद सोडली जातात. त्‍यामुळे रासायनिक प्रदूषण होते. असे कोणत्‍याही आधुनिक कारणांचे प्रदूषण श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे होत नाही.

ऊ. ‘डाय (रंग)’, ह्युमिक पदार्थ (शेतपिकाच्‍या भरघोस वाढीसाठी वापरले जाणारे रसायन), फिनोलिक संयुगे, पेट्रोलियम, सर्फेक्‍टंट्‌स (एक प्रकारचे रसायन), कीटकनाशके आणि ‘फार्मास्‍युटिकल्‍स’ यांसह सेंद्रिय दूषित घटक जे भूमीच्‍या माध्‍यमातून झिरपून जलप्रदूषण वाढते. याकडे कुणाचे लक्षही जात नाही. मग श्री गणेशमूर्ती विसर्जनामध्‍ये प्रदूषणाचा ऊहापोह कशासाठी ?

ए. ‘नायट्रेट्‌स’ आणि ‘फॉस्‍फेट्‌स’ (शेतीची रासायनिक खते), सांडपाणी, विविध बांधकामांच्‍या प्रकल्‍पातून झिरपणारे पाणी आणि भूमी स्‍वच्‍छ करण्‍याच्‍या प्रकल्‍पांमधून वाहून जाणारे अज्ञात घटक, तसेच मीठ – गोड्या पाण्‍याचे क्षारीकरण हे मिठाच्‍या खाडीमुळे होते. हे खारट पाणी गोड्या पाण्‍यातील परिसंस्‍था दूषित करते. अशा अमर्याद प्रदूषणाला गणेशमूर्ती विसर्जनामध्‍ये वाव नाही.

२. जलप्रदूषणावर प्रशासन प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कधी करणार ?

जलप्रदूषणामुळे अतिसार, कॉलरा, आमांश (डायरिया), ‘टायफॉईड’ (विषमज्‍वर), ‘हिपॅटायटीस ए’ आणि ‘पोलिओ’ हे जिवाणू दूषित पाण्‍यात आढळतात. याचा मुख्‍य स्रोत हा रोगी मनुष्‍यच आहे. यासाठी गणेशमूर्ती विसर्जनाला दोष देण्‍यात काहीच अर्थ नाही. कुपोषण, कर्करोग आणि पाण्‍याशी संबंधित इतर आजारही प्रदूषणामुळे होऊ शकतात. जलप्रदूषण वर्षातील ३६५ दिवस होत असते, त्‍यातही ते पावसाळ्‍यात अधिक प्रमाणात होत असते. असे असूनही प्रशासन यावर प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करत नाही.

गणेशमूर्ती विसर्जन हे गणेशोत्‍सव काळातच होते. या काळात गाव आणि शहरातील नदी-नाल्‍यांची स्‍वच्‍छता मोहीम ही केवळ लोकाग्रहास्‍तव किंवा एक औपचारिकता म्‍हणून केली जाते. या उत्‍सवामुळे नदी, नाले याच्‍या किनार्‍यांची पर्याप्‍त आणि आवश्‍यक स्‍वच्‍छता करण्‍यात येते. अन्‍यथा नदी, नाले किंवा त्‍यांच्‍या किनार्‍यांची स्‍वच्‍छता कुणीच केली नसती. अशा स्‍वच्‍छतेमुळे प्रदूषण न्‍यून करण्‍यास एक प्रकारे साहाय्‍यच होत आहे.

३. जलप्रदूषण रोखण्‍यासाठी काही उपाययोजना !

गणेशमूर्तींमुळे होणार्‍या जलप्रदूषणाच्‍या नावाखाली सध्‍या ज्‍या काही उठाठेवी केल्‍या जात आहेत, त्‍याऐवजी खरे जलप्रदूषण रोखण्‍यासाठी प्रशासनाने पुढील प्रयत्न करावेत :

अ. कचरा उचला आणि कचराकुंडीत फेका.

आ. कीटकनाशके, तणनाशके, खतांचा वापर न्‍यूनतम करा.

इ. पिकांवर रासायनिक कीटकनाशके आणि पोषक घटकांचा वापर अत्‍यावश्‍यक तेवढाच करा.

ई. सांडपाणी आणि मैला यांचे थेट प्रदूषण न्‍यून कसे होईल, यासाठीचे प्रयत्न करा अन् त्‍यावर सुरक्षितपणे प्रक्रिया करा.

४. श्री गणेशमूर्ती विसर्जनाने प्रदूषण, हा बागुलबुवा !

या लेखातून हे लक्षात येईल की, गणेशमूर्तींच्‍या विसर्जनामुळे प्रदूषण होत असल्‍याचा जो बागुलबुवा केला जातो, ते निवळ थोतांड आहे. वैज्ञानिक स्‍तरावरही हे सिद्ध झालेच आहे की, शाडू माती, तसेच प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसच्‍या गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होत नाही. उलट कागदी लगद्याच्‍या कथित पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) मूर्तींमुळेच पुष्‍कळ मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि त्‍यातून घातक घटक सिद्ध होतात. यावर राष्‍ट्रीय हरित लवादानेही वर्ष २०१६ मध्‍ये शिक्‍कामोर्तब केले आहे.

५. श्री गणेशमूर्ती विसर्जनामागील शास्‍त्रीय कारण !

महत्त्वाचे म्‍हणजे गणेशोत्‍सवाच्‍या १० दिवसांत ज्‍यांच्‍या घरी उत्‍सव होतो, त्‍यांना हे चैतन्‍य स्‍वाभाविकरित्‍या मिळते; कारण या काळामध्‍ये १ सहस्र पटींनी गणेशतत्त्व कार्यरत झालेले असते. त्‍या मूर्तीची शास्‍त्रोक्‍त पद्धतीने प्राणप्रतिष्‍ठा, तसेच अन्‍य धार्मिक कृती केलेली असल्‍यामुळे त्‍या मूर्तीत दैवी चैतन्‍य कार्यरत होते. अशी चैतन्‍यमय मूर्ती १० दिवसांनंतर जेव्‍हा आपण विसर्जित करतो, तेव्‍हा ती वहात्‍या पाण्‍यात केल्‍यामुळे ते चैतन्‍य प्रवाहाद्वारे सर्वदूर प्रक्षेपित होते, हे विशेष आहे. आज बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी यांनी याचा काडीमात्र अभ्‍यास न केल्‍यामुळे (असे लोक या उत्‍सवात सहभागी नसतात) त्‍यांच्‍यापर्यंतही हे चैतन्‍य आपोआपच जाते; पण त्‍यांच्‍यातील नकारात्‍मक विचारांमुळे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

६. श्री गणेशमूर्तीच्‍या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, ही चुकीची आणि कुचकामी धारणा !

श्री गणेशमूर्तीच्‍या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते, ही चुकीची धारणा कुचकामी अर्थात् निरर्थक आहे. वास्‍तविक वरील माहितीतून इतर घटकांमुळे ३६५ दिवस जे सतत प्रदूषण होत असते, त्‍यावर मुख्‍यतः उपाययोजना अत्‍यावश्‍यक आहे. ते सोडून काही लोक आपली दिशाभूल करत आहेत. गंगा नदी दूषित आहे, असे म्‍हणणे वेगळे; पण ती आध्‍यात्मिकदृष्‍ट्या पवित्र आहे हे वेगळे ! ही पवित्रताच नदीद्वारे दैवी चैतन्‍य प्रक्षेपित करते. आपण या पवित्रतेविषयी संवेदनशील असायला हवे आणि प्रदूषणाच्‍या नावाखाली आपली दिशाभूल होऊ नये, यासाठी सतर्क रहायला हवे. या दैवी चैतन्‍याच्‍या माध्‍यमातून सात्त्विकता प्रदान होते आणि ती विश्‍वशांतीसाठी आवश्‍यक आहे. श्री गणेश विघ्‍नहर्ता आहे, हेच यातून लक्षात येते. खर्‍या अर्थाने गणेशोत्‍सव शास्‍त्रानुसार साजरा करून समाजास दैवी चैतन्‍य दिले पाहिजे. ज्‍यांना याची जाणीव नाही, त्‍यांना तेच ज्ञात करून देणे हे महत्त्वाचे !

– आधुनिक पशूवैद्य (डॉ.) अजय गणपतराव जोशी, फोंडा, गोवा. (८.९.२०२३)