पुणे येथील मानाचे गणपति सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील !

‘अखिल मंडई मंडळा’चे अध्‍यक्ष अण्‍णा थोरात यांनी दिली माहिती !

पुणे – अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्‍ट मंडळ, हुतात्‍मा बाबू गेणू गणपति मंडळ आणि श्री जिलब्‍या मारुति गणेश मंडळ ट्रस्‍ट ही पुणे येथील मानाची गणपति मंडळे सायंकाळी ६ वाजल्‍यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील. कार्यकर्ते आणि भाविक यांच्‍या श्रद्धांचा विचार करून प्रतिवर्षीप्रमाणे नियोजित समयमर्यादेत विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होऊ, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्‍यक्ष अण्‍णा थोरात यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये दिली. अखिल मंडई मंडळाचे अध्‍यक्ष अण्‍णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्‍ट मंडळाचे विश्‍वस्‍त आणि उत्‍सव प्रमुख पुनीत बालन, हुतात्‍मा बाबू गेणू गणपति मंडळाचे बाळासाहेब मारणे आणि श्री जिलब्‍या मारुति गणेश मंडळ ट्रस्‍टचे भूषण पंड्या हे पत्रकार परिषदेस उपस्‍थित होते.

श्री. अण्‍णा थोरात म्‍हणाले की, पोलीस आणि प्रशासनाला साहाय्‍य करूया. सर्वांनी शिस्‍त पाळूया. लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्‍याचा प्रयत्न करू. मानाच्‍या गणपति मंडळांच्‍या मिरवणुकीनंतर इतर गणपति मंडळे लक्ष्मी रस्‍त्‍याने मिरवणुकीमध्‍ये सामील होतील. त्‍यामुळे ती मंडळे पुढे जाईपर्यंत इतर मंडळांना लवकर जाणे शक्‍य नाही. त्‍यासाठी आम्‍ही नेहमीच्‍या वेळेतच सहभागी होऊ.