सनातन धर्माचा अपमान करणे, म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करणे !

सध्या सनातनधर्माविषयी काहीही बोलणारे आणि लिहिणारे लोक आपल्या अवतीभवती वावरत आहेत. ‘काहीही करावे आणि सनातन धर्माला नावे ठेवून तो धर्म नष्ट करण्याचा आपला मानस व्यक्त करावा’, हे लक्षण बुद्धीवादाचे नाही. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता, संतवाङ्मय याचा अभ्यास नसतांनाही सनातन धर्माच्या विरोधात लिखाण केले वा बोलले जाते, हे पांडित्याचे वा अभ्यासकाचे लक्षण आहे, असे म्हणता येत नाही. सनातन धर्म हा विद्वेष पसरवणारा धर्म नाही. तो सर्वसमावेशक आहे. लोकांनी त्याला अपकीर्त केले. काही जणांनी हेतूत: ‘सनातन धर्म, म्हणजे विकृती’, असा अर्थ लावला. ऋषिमुनींची योग्यता न ओळखता ‘सर्व थोतांड आहे’, असा अपप्रचार करण्यात आला. बुद्धी आणि विज्ञान यांच्या कसोटीवर उतरणारा जगातील एकमेव धर्म, म्हणजे सनातन धर्म आहे. या वास्तवतेकडे डोळे झाक करून सनातन धर्माला अपकीर्त करण्याचे कार्य शेकडो वर्षे सातत्याने चालू आहे. अनेक परकीय आक्रमकांनीही सनातन धर्म नष्ट करण्यासाठी जीवाचा आटापिटा केला; पण त्यात त्यांना यश आले नाही.

समाज जीवनाच्या विविध कालखंडात सनातन धर्मावर वारंवार आघात करण्यात आला; पण तो पूर्वी होता, आजही अस्तित्वात आहे आणि तो पुढेही तसाच अस्तित्वात रहाणार आहे. सनातन धर्माचे हे वैशिष्ट्य जाणून घेण्याचा प्रयत्न करून त्याचा सखोल अभ्यास करण्याची बुद्धी त्याच्यावर टीका करणार्‍यांना होत नाही, याचेच नवल वाटते. समाजातील लबाड माणसे त्यांना हवा तसा अर्थ काढतात. त्यामुळे काही मूलभूत तत्त्वांविषयी संशय निर्माण होतो. मूळ ग्रंथाचे वाचन न करता इतरांनी लावलेला अर्थ लक्षात घेऊन त्यानुसार लेखन करण्याचा प्रयत्न केला, तर नकळतपणे आपण त्या सर्वोत्कृष्ट ग्रंथावर अन्याय करतो. हा साधा विवेक सुद्धा रहात नाही.

ऐकीव गोष्टीवर विश्‍वास ठेवून स्वतःची वैचारिक बैठक कधीही पक्की होणार नाही, ती ठिसूळच राहील. अशा अपरिपक्व विचारांवर आधारित केलेले कोणतेही लेखन वा वक्तव्य हे पांडित्य वा तत्त्ववेत्ते यांच्या तोडीचे असणार नाही. एखादी खोटी गोष्ट, लबाडी जर बेमालूमपणे खपवायची असेल, तर त्याला सत्याचा आधार घ्यावाच लागतो, हे लबाड लोकांना चांगले ठाऊक आहे. त्याचप्रमाणे ज्यांना सनातन धर्माला भ्रष्ट करायचे आहे, त्याच लोकांनी या धर्मातील उत्तमोत्तम तत्त्वांचा विपरीत अर्थ काढला. त्यांची ही लबाडी लपवण्यासाठी त्यांनी केलेली ही क्लृप्ती आहे. ज्याची बुद्धी ठिकाणावर आहे, तो अशा लबाडीला भूलत नाही. तो मुळापर्यंत जाऊन सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. असा प्रयत्न न करता कुणावरही टीका केली जाते, ते बुद्धीवादाचे लक्षण म्हणता येत नाही. सध्या लबाड लोकांनी सनातन धर्माला अपकीर्त करण्याची जी मोहीम चालवली आहे, त्यात सर्वसामान्य जनता प्रवाहपतीत होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे.

१. ‘भगवद्गीता’ हा सनातन धर्माचा आधारभूत ग्रंथ

सनातन धर्म हा प्रलयापूर्वी होता आणि त्यानंतरही अस्तित्वात रहाणार आहे. ‘सनातन’ या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे – ‘सनातनो नित्यनूतन:’ म्हणजेच सनातन नित्यनूतन आहे. याचा अर्थ सनातन धर्मातील तत्त्वे ही त्रिकालाबाधित आहेत. ‘भगवद्गीता’ हा सनातन धर्माचा आधारभूत ग्रंथ, उपनिषदे, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र यांचा ग्रंथ आहे; कारण भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस ‘श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे…’, म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी…’, अशी शब्दरचना करण्यात आली आहे. हा ग्रंथ कधीही कालबाह्य होणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांनी ‘ज्ञानेश्‍वरी’च्या अखेरच्या अध्यायात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे, ‘तैसें हें नित्य नूतन देखिजे। गीतातत्व ॥’ (ज्ञानेश्‍वरी, अध्याय १, ओवी ७१), म्हणजे ‘हे गीतातत्त्व नित्य नूतन आहे.’ ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा ग्रंथ वेद आणि उपनिषदे यांचे सार आहे. अद्वैतवाद हा सनातन धर्माचा गाभा आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

२. सनातन धर्माची शिकवण न आचरता त्याला दोष देणे कितपत योग्य ?

खालील मंत्र ऋषिमुनींना अद्वैतातून सुचला आहे. सर्व जगाशी, चराचरसृष्टीशी आपण एकरूप झाले पाहिजे. ही एकरूपता अनुभवण्यासाठी आपले मन, बुद्धी सर्वांना सुखी करण्यासाठी आतुरलेली असली पाहिजे, तरच हा सर्वोच्च आनंद सहजतेने उपभोगता येईल. असा हा परमानंद उपभोगण्यासाठी काय करावे ? ते पुढील मंत्रात सांगण्यात आले आहे.

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु । मा विद्विषावहै ॥

अर्थ : परमात्मा आम्हा गुरु-शिष्यांचे एकत्र रक्षण करो, आम्हाला जीवनाचा एकत्रितपणे आनंद घेता येवो, आम्हाला एकत्र पराक्रम गाजवता येवो, आम्हा दोघांचे अध्ययन तेजस्वी होवो, आम्हा दोघांमध्ये एकमेकांप्रति द्वेषभावना उत्पन्न होऊ नये.

हा मंत्र केवळ गुरु-शिष्यापुरता मर्यादित नाही, हे आपण प्रथम ध्यानात घेतले पाहिजे. सनातन धर्माने दिलेली ही शिकवण जर लोकांनी आचरणात आणली नाही, तर तो दोष सनातन धर्माचा आहे कि लोकांचा ? रहदारीचे नियम आपण काटेकोरपणे पाळले नाहीत, तर अपघात होणार, अपंगत्व येणार किंवा त्यात प्राणही जाणार. रहदारीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे होणार्‍या हानीत स्वतःचा दोष आहे. रहदारीच्या नियमांचा नाही.

समर्थ रामदासस्वामींनी हा अद्वैताचा सिद्धांत एका ओवीत अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. तो असा,

‘आपणास चिमोट घेतला । तेणें कासाविस जाला ।
आपणावरून दुसयाला । राखत जावें ॥
– दासबोध, दशक १२, समास १०, ओवी २४

अर्थ : आपल्याला कुणी चिमटा घेतला, तर आपला जीव कासावीस होतो. तसे आपल्यावरून लोकांच्या दुःखाची कल्पना करून त्यांना दुःख न होईल, असे वागावे. त्यांना प्रसन्न राखावे.

अशी शिकवण प्रत्येकाने आपल्या आचरणात आणली, तर कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही; पण ही शिकवण, हा विचार, हे संस्कार आपण झिडकारले आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण झाली, दुसर्‍याला पिडा देण्याची प्रवृत्ती वाढली, तर तो दोष ती शिकवण वा संस्कार झुगारणार्‍यांचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सनातन धर्माची शिकवण आपण आपल्या कृतीत आणायची नाही आणि मग त्यातील दोष अकारण दाखवत समाजात वावरायचे, हे सज्जनतेला धरून आहे का ? याचा ज्याचा त्याने विचार करावा.

३. समाजात दोष निर्माण झाल्याने श्रेष्ठ आणि कनिष्ठ भावना निर्माण होणे

ऋषिमुनींनी कोणतीही गोष्ट स्वतःसाठी मागितली नाही. संपूर्ण मानवजात आणि जीवसृष्टी सुखाने जगावी, यासाठी ऋषींनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजातील सर्वसामान्य जनतेच्याच नव्हे, तर थोरामोठ्यांच्याही दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जे योगदान देतात, कष्ट घेतात अशा कष्टकरी समाजाला रुद्रसूक्तात विनम्र प्रणिपात केला आहे. यात सुतार, रथ बनवणारे, कुंभार, लोहार, पारधी, मच्छीमार, बाण आणि धनुष्य सिद्ध करणारे, शिकारी कुत्रे बाळगणारे या सर्वांनाच वंदन करण्यात आले आहे. (संदर्भ : रुद्राध्याय)

ईश्‍वराच्या दृष्टीने कुणीही श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही. समाजामध्ये दोष निर्माण झाला की, श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही भावना बळावते. ही भावना बळावू नये; म्हणूनच सनातन धर्माचे संस्कार करणे नितांत आवश्यक आहे. सनातन धर्म नष्ट करण्यासाठी तत्पर असलेल्या लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे नितांत आवश्यक आहे.

४. मूर्तीपूजेचे महत्त्व

सनातन धर्मात मूर्तीपूूजा श्रेष्ठ मानण्यात आली आहे. यालाच अनेकांचा विरोध आहे. विरोध करणार्‍यांनी मूर्तीपूजनामागची भूमिका लक्षात घेतली नाही. आपल्या प्रत्येकाला आपली माता श्रेष्ठ वाटते, यात कोणताही दोष नाही; पण जसजसा स्वतःचा विकास होऊ लागतो, तसतसा आपल्याला मातेविषयीचा आदर बाळगूनही आपण भारतमातेला श्रेष्ठ मानू शकतो. हा आपला बौद्धिक आणि भावनिक विकास आहे. भारतमातेचे पूजन केले म्हणून आपली जन्मदात्री माता कनिष्ठ वा दुर्लक्षित ठरत नाही. विविध देवीदेवतांची उपासना करत आपण आपला विकास साधायचा आहे. हा विकास करत करत आपण विश्‍वात्मक देवाची मूर्ती पूजली पाहिजे. योगशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे झाले, तर यम-नियमांपासून आरंभ करून समाधीपर्यंतचा प्रवास करणे, हा विकास होय. मूर्तीपूजेच्या मागची ही विकासाची कल्पना दुर्लक्षित करून चालत नाही.

५. सनातन धर्म हा सूक्ष्मातीसूक्ष्म, अनंत आणि विद्वानांसह सर्वसामान्यांसाठी असणे

सनातन धर्म हा असा सूक्ष्मातीसूक्ष्म असूनही अनंत आहे. सनातन धर्माने सगुण आणि निर्गुण या दोन्ही उपासना मार्गांचा अवलंब केला आहे. निर्गुणाला सगुणाची साथ मिळाल्यावाचून माणूस संतोष (समाधान) मिळवू शकत नाही किंवा संतुष्ट होऊ शकत नाही. याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे माणसाला भूक लागते. ती भूक निर्गुण आहे. ती भूक शांत करण्यासाठी सगुण अन्न पोटात जावे लागते, तेव्हा माणूस तृप्त होतो. म्हणून निर्गुण आणि सगुण या दोन्ही उपासना मानवासाठी नितांत आवश्यक आहेत. या दोन्हींपैकी कोणत्याही एका गोष्टीचा त्याग केला, तर तृप्त होणार नाही वा समाधान लाभणार नाही. मूर्ती पूजेमागचा हा भाव लक्षात न घेता मूर्तीपूजेला नावे ठेवून सनातन धर्माचा अपमान करणे, म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करणे होय.

सनातन धर्म हा केवळ विद्वानांसाठी नाही, तर सर्वसामान्यांसाठीही आहे. ज्याची जशी बौद्धिक, मानसिक, वैचारिक क्षमता असेल, त्याला अनुसरून त्याने त्यातील कोणत्याही गोष्टीचा अवलंब करावा आणि स्वतःचा विकास साधावा. सनातन धर्माच्या कृतज्ञतेची भावना प्रत्येकाने आपल्या मनात जतन करावी, यासाठीच सूर्य, समुद्र, वनस्पती, सर्प यांची पूजा असे पूजेचे अनेक प्रकार सनातन धर्माने स्वीकारले आहेत. ‘सनातन धर्म दगडाला देव मानत नाही; पण दगडात देव पहातो’, ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. जी जी गोष्ट उपयुक्त आहे, ती ती देवासारखी पवित्र शुद्ध म्हणून तिचा स्वीकार करण्याचे संस्कार सनातन धर्म करतो.

६. वेद ज्ञानगंगा आहे !

ज्ञानाला विशेष महत्त्व आहे. ज्ञानावाचून भक्ती आंधळी ठरते. भक्तीवाचून ज्ञान कोरडे ठरते. ज्ञान आणि भक्ती कर्मात अवतीर्ण झाल्यावाचून जीवनाला अर्थ निर्माण होत नाही. म्हणून जाणकार म्हणतात, ‘ज्ञानाची गंगा भक्तीच्या यमुनेत मिसळली पाहिजे आणि कर्ममय सरस्वतीला भक्तीचा अन् ज्ञानाचा स्पर्श झाला पाहिजे. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा संगम मानवाच्या जीवनात झाल्यावर मानवाचे जीवन प्रयागक्षेत्रासारखे शुद्ध, पवित्र अन् पावन होते.’

७. सनातन धर्मावर टीका करणार्‍यांनी स्वबुद्धी पडताळावी !

सनातन धर्माने अनेक देवीदेवता निर्माण केल्या आहेत. त्या एकाच शक्तीची विविध रूपे आहेत. सनातन धर्माची ही संकल्पना विज्ञानाच्या संकल्पनेप्रमाणेच शास्त्रशुद्ध आणि तर्कशुद्ध आहे. विद्युत् ऊर्जा ही एक प्रकारची ऊर्जा आहे. ती जेव्हा विजेच्या दिव्यात प्रवेश करते, त्या वेळी तिचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होते. हीच विद्युत् ऊर्जा जेव्हा ध्वनीक्षेपकामध्ये प्रवेश करते, तेव्हा तिचे रूपांतर ध्वनी उर्जेत होते. हीच विद्युत् ऊर्जा जेव्हा यंत्रात प्रवेश करते, तेव्हा तिचे गतीत रूपांतर होते. विद्युत ऊर्जेची ही विविध रूपे जशी आहेत, तशीच विश्‍वातील एका महाशक्तीची विविध देवता ही रूपे आहेत. विज्ञान सांगते ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. सनातन धर्म तेच सांगतो ईश्‍वर जन्माला आला नाही, तसेच त्याला अंतही नाही; मात्र त्याची विविध रूपे आपल्याला दिसतात. त्या विविध रूपांमध्ये असलेली शक्ती आपल्याला साहाय्य करते. अशा शक्तीची उपासना अन् तिची पूजा करणे, ही कृतज्ञतेची भावना आहे. भावना आणि बुद्धी यांचा सुंदर मेळ घालणारा सनातन धर्म आहे. सनातन धर्माची ही खरी ओळख लक्षात न घेता त्यावर टीका करणार्‍यांनी स्वतःची बुद्धी पडताळून पहावी. त्यासाठी त्यांना साहाय्यभूत ठरणारा परिच्छेद खालीलप्रमाणे…

‘सावरकर विज्ञाननिष्ठ होते. वेदांविषयी सावरकर म्हणतात, ‘‘वेदमंत्रांमध्ये जो ओज आहे, गंभीर अर्थ आहे तो जर कळला, तर वेदविद्या जिवंत ठेवायची कि नाही ? हा प्रश्‍नच येणार नाही. वेदविद्या गेली, तर हिंदुत्व गेले. वेद विद्या संसाराच्या सर्व गोष्टींचे मूळ आहे. वटवृक्षाचे बीज लहान असले, तरी वृक्ष प्रचंड असतो. त्याप्रमाणे वेदांत औद्योगिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक थोडक्यात म्हणजे सर्व जैवनिक (चराचरसृष्टीचे) तत्त्वज्ञान आहे.’’ (संदर्भ : ‘सावरकरांची सामाजिक भाषणे-३३-वेदामृत सर्वांना पिऊ द्या !, ‘समग्र सावरकर’ खंड ९)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२०.९.२०२३)