सर्वसमावेशक सनातन धर्मावर टीका करणे; म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार !

दैनिक ‘लोकसत्ता’च्या १६ सप्टेंबर या दिवशीच्या अंकात ‘सनातनी (धर्म) संकट !’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्यात सनातन धर्म हा ‘स्त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्यवस्था मानणारा’ असे चित्र रंगवण्यात आले आहे. तसेच या लेखात याविषयी काही आक्षेप, शंका आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. साम्यवाद्यांकडून सध्या हीच सूत्रे उगाळत बसून हिंदु धर्मावर आघात करण्यात येत आहे. ‘हिंदूंमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांचा बुद्धीभेद करायचा आणि त्यांचे वैचारिक धर्मांतर करायचे’, हे साम्यवाद्यांचे षड्यंत्र आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्याचे खंडण येथे देत आहोत.

(टीप : ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखातील भाषा आणि व्याकरण यात पालट न करता तसेच ठेवण्यात आले आहे.)

(क्रमशः)

१. भारत ही श्रद्धावानांची भूमी असल्यामुळे सनातन धर्म मानणारे आणि त्यानुसार आचरण करणार्‍यांची संख्या अधिक !

आक्षेप : आपल्याला डेंग्यू, मलेरिया आणि त्यांचे परिणाम तर नको आहेत, हे उघडच आहे, मग ‘सनातन धर्म तरी आपल्याला हवा आहे का?’, याचेही उत्तर देता येत नाही; कारण त्यासाठी सनातन धर्म म्हणजे काय हे तरी आपल्याला कोठे माहीत !

खंडण

वर्ष २०११ मध्ये केलेल्या जनगणनेच्या आधारे भारतात धर्म न मानणारे म्हणजे निरीश्वरवाद्यांची संख्या २९ लाख (०.२४ टक्के) आहे. ही आकडेवारी म्हणजे ‘सनातन धर्म तरी आपल्याला हवा आहे का ?’, याचे उत्तर देता येत नाही’, असे म्हणणार्‍यांना चपराक आहे. भारत ही श्रद्धावानांची भूमी आहे. आजही सनातन धर्म समजून उमजून त्यानुसार कृती करणारे आणि धर्मशास्त्र मानणारे यांची संख्या पुष्कळ अधिक आहे.

२. हिंदु धर्मात अनेक उपासनापद्धत असल्यामुळे त्याचा अभ्यास न करता त्यावर टीका करणे, हा हिंदुद्वेष !

आक्षेप : हिंदू धर्मात येऊ इच्छिणार्‍या एखाद्याला या धर्मात यायचे म्हणजे नेमके काय करायचे हे जसे समजू शकत नाही, तसेच हा सनातन धर्म नक्की कोणती तत्त्वे सांगतो आणि त्याचे पालन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? तो हिंदू धर्माचाच भाग आहे की त्यापेक्षा वेगळा हे शोधण्याचा हा पामर प्रयत्न.

खंडण

१. सनातन किंवा हिंदु धर्मात धर्मांतर करून कुणी प्रवेश करत नाही. सनातन धर्मात पुनर्प्रवेश असतो; कारण इस्लाम किंवा ख्रिस्ती पंथ यांच्या उदयापूर्वी जगात सर्वत्र हिंदु धर्म होता. हिंदु धर्मात ज्यांनी पुनर्प्रवेश केला आहे, त्यांना ‘तुम्ही सनातन धर्मात का प्रवेश केला ?’, असे विचारले असते, तर लोकसत्ताकारांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही आपोआप मिळाले असते.

२. ‘हिंदु धर्मात नेमकी कोणती तत्त्वे आहेत ?’, असा (फुकाचा) प्रश्न लोकसत्ताकारांना पडला आहे. सनातन धर्मात आदिशंकराचार्यांनी सांगितलेले अद्वैत तत्त्वज्ञानही आहे आणि निर्गुण निराकार परात्म्याला सगुण रूपात पाहून त्याला पूजन करण्याचे तत्त्वज्ञानही सांगितलेले आहे. या धर्मात ‘स्व’चे ज्ञान देणारा ज्ञानयोगही आहे, तर देवाच्या भक्तीत तल्लीन व्हायला शिकवणारा भक्तीयोगही आहे. निरपेक्ष कर्म करायला शिकवणारा कर्मयोगही याच धर्मात शिकवला आहे. सनातन धर्माच्या किती छटा वर्णाव्यात !

३. असे असतांना मनुष्य जन्माचे ध्येय म्हणजे सत् चित् आनंद मिळवण्यासाठी स्वतःला जो मार्ग सोपा आणि सुलभ वाटेल, त्याद्वारे मार्गक्रमण करण्याची अनुमती हा धर्म देतो.

४. ‘सनातन धर्म’ हाच हिंदु धर्म आहे. हिंदुद्वेष्ट्यांकडून हेतूपुरस्सर असे प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करण्याचा डाव आहे. जसे एखाद्या व्यक्तीला लहानपणी नावाने हाक न मारता टोपणनावाने हाक मारली जात असली, तरी ती व्यक्ती एकच असते. तसेच ‘सनातन धर्म’ आणि ‘हिंदु धर्म’ यांचे आहे.

५. ‘सनातन धर्म’ कुणा एका ग्रंथात सामावणारा नाही. सनातन धर्म जिज्ञासा जागृत करतो. विचार थोपत नाही. सनातन धर्म तुमच्या प्रश्नांची थेट उत्तरे देण्यापेक्षा तो तुमच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण करतो आणि त्याची उत्तरे शोधायला उद्युक्त करतो. तुम्हाला त्याची उत्तरे (अनुभूतीतून) मिळतात’, असे एके ठिकाणी सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटले आहे.

एकंदरीत अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करून लोकसत्ताकार हिंदूंमध्ये धर्माविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

– एक धर्मप्रेमी, गोवा