शेकडो नागरिक अडकले, बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण !
नागपूर – ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट यांसह आलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. मध्यरात्रीपासून चालू असलेल्या पावसामुळे नागपूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे. शेकडो नागरिक अडकले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत प्रशासनाच्या संपर्कात आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ‘एन्.डी.आर्.एफ्.’ (राष्ट्रीय आपत्ती निवारणदल) आणि ‘एस्.डी.आर्.एफ्.’ (राज्य आपत्ती निवारणदल) यांच्या पथकाकडून बचावकार्य चालू आहे.
‘एन्.डी.आर्.एफ्.’ आणि ‘एस्.डी.आर्.एफ्’च्या चमूंनी आतापर्यंत ४०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मूक-बधीर विद्यालयातील ७० विद्यार्थी, एल्.ए.डी. महाविद्यालयातील ५० विद्यार्थिनींनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. मोरभवन बसस्थानकात फसलेल्या १४ प्रवाशांसह शहराच्या विविध भागांत फसलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
१. ‘एस्.डी.आर्.एफ्.’च्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.
२. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांतील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. बसस्थानकामधील बस पाण्यात बुडल्या.
३. शहरातील सखल आणि खोलगट भागांतील वस्त्यांसह नागरी वस्त्यांतील घराघरात जवळपास गुडघाभर पाणी साचले आहे. आपत्कालीन सेवेसाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
४. २२ सप्टेंबरच्या रात्री नागपूर येथे अवघ्या ४ घंट्यांत १०६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शहरातील बर्डी, रामदासपेठ रोड, शंकरनगर चौक रस्ता, तसेच नरेंद्रनगर, मनीषनगर भुयारी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला.
५. अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. पावसामुळे वाहने पाण्याखाली गेल्याने अनेक वाहनांची मोठी हानी झाली आहे.
६. मूक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. शाळा आणि महाविद्यालये यांना सुटी घोषित करण्यात आली आहे. ‘आवश्यकता नसेल, तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये’, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
७. ‘कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका’, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, तसेच वृद्ध नागरिकांना सर्व साहाय्य तातडीने द्यावे, असेही त्यांनी सांगितले.