धनगर आरक्षणासाठी पुणे-सातारा महामार्ग १ घंटा रोखून धरला !

आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या जनावरांना घेऊन जमलेला धनगर समुदाय

सातारा, २१ सप्‍टेंबर (वार्ता.) – धनगर समाजाच्‍या आरक्षणासाठी राज्‍यभरातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. राज्‍यस्‍तरीय आंदोलनाचा आरंभ सातारा येथील खंडाळा तालुक्‍यातील खंबाटकी घाटातून करण्‍यात आला. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्‍याची चेतावणी ‘धनगर समाज आरक्षण लढा समिती’च्‍या प्रमुखांनी दिली आहे. २० सप्‍टेंबर या दिवशी तीव्र आंदोलन करत अनुमाने १ घंटा पुणे-सातारा महामार्ग धनगर समाज बांधवांनी रोखून धरला.

खंडाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आंदोलनाला प्रारंभ करण्‍यात आला. नंतर मोर्चा काढत धनगर समाज बांधव महामार्गावरती एकत्र आले आणि महामार्ग रोखून धरला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी काही वर्षांपूर्वी खंडाळा येथे साखळी उपोषण करण्‍यात आले होते; मात्र याविषयी शासनस्‍तरावर कोणताही निर्णय झाला नसल्‍यामुळे आंदोलनाचा मार्ग स्‍वीकारावा लागला आहे. या आंदोलनासाठी जिल्‍ह्यातील विविध ठिकाणांहून धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.