सध्‍याच्‍या गणेशोत्‍सवाचे स्‍वरूप आणि समाजात नैतिक परिवर्तनाची नितांत आवश्‍यकता !

‘सध्‍याच्‍या गणेशोत्‍सवाचे स्‍वरूप पहाता ‘लोकमान्‍य टिळकांचे दूरदर्शीत्‍व आणि त्‍यांची स्‍वप्‍ने यांना आपण तिलांजली तर देत नाही ना ?’, अशी शंकेची पाल चुकचुकल्‍या वाचून रहात नाही.

१. सध्‍या सामान्‍यपणे दिसणार्‍या दृश्‍यांचे स्‍वरूप

अ. मुलांचा गोंगाट, लोकांनी रस्‍ता अडवणे आणि मंडपात चित्रपट चालू असणे : एका ठिकाणी गणपतीची लहान सुबक मूर्ती सुशोभित मखरात विराजमान होती. तेथे पुष्‍कळ गर्दी होती. मुलांचा गोंगाट चालू होता. लोकांनी सर्व रस्‍ता अडवला होता. त्‍या रस्‍त्‍याने जाणार्‍या वाहनांना मुळीच वाट नव्‍हती. बरेचसे लोक आल्‍या वाटेने परत जात होते. काही जण मंडपातील व्‍यासपिठावर चालू असलेला चित्रपट पहाण्‍याकरता घुटमळत होते.

आ. वक्‍त्‍यांच्‍या भाषणास श्रोत्‍यांची अनुपस्‍थिती ! : अन्‍य एका गल्लीत मंचावर २० फुटी भव्‍य गणेशमूर्तीने अर्धे व्‍यासपीठ व्‍यापले होते आणि उर्वरित व्‍यासपिठावर कार्यक्रम चालू होता. आसंदीत अध्‍यक्ष विराजमान होते. एक वक्‍ते हातवारे करून माईक समोर तावातावाने भाषण करत असतांना दिसले. समोरच्‍या पटांगणातील सतरंजीवर ५ श्रोते बसून वक्‍त्‍याचे भाषण ऐकत होते. माझ्‍या लक्षात आले की, ही ५ माणसे इकडची तिकडची नसून मंडळाच्‍या कार्यकारणीतील पदाधिकारी आहेत.

अन्‍य ठिकाणच्‍या एका कार्यक्रमात व्‍यासपिठावर मंद प्रकाशात एका बाजूला टेबलासमोर आसंदीत सभेचे अध्‍यक्ष विराजमान झाले होते. अध्‍यक्षांचे दोन्‍ही बाजूला प्रत्‍येकी ५-५ वक्‍ते बसले होते. त्‍यात काही महिलाही उपस्‍थित होत्‍या. एकूण रचनेवरून वादविवाद स्‍पर्धेचा कार्यक्रम चालू होता, असे वाटत होते. व्‍यासपिठाच्‍या दर्शनी भागात सतरंजीवर ८-१० श्रोते आपापसांत कुजबूज करत मोठ्या अनिच्‍छेने बसलेले दिसत होते. बहुतः वक्‍त्‍यांच्‍या परिवारातील ही मंडळी असावीत. एकूण व्‍यासपीठ बहुसंख्‍येने व्‍यापले होते, तर श्रोतृवर्ग अल्‍पसंख्‍य होता.

इ. व्‍यासपिठावर तरुणींचा ‘डिस्‍को डान्‍स’ : पुढील चौकात पुन्‍हा अलोट गर्दी असल्‍याचे आढळले. व्‍यासपिठाकडे दृष्‍टी गेली, तेव्‍हा झगझगीत पालटत्‍या रंगीबेरंगी प्रकाशाच्‍या झोतामध्‍ये हावभावपूर्ण तरुणींचा शृंगारिक ‘डिस्‍को डान्‍स’ चालू होता.

ई. गुणवंत विद्यार्थ्‍यांचा पुरस्‍कार समारंभ आणि स्‍पर्धांचे कार्यक्रम : पुढच्‍या एका गणेश मंडळाच्‍या कार्यक्रमात विद्यार्थी वर्ग बहुसंख्‍येने आढळला. तपासांती कळले की, गुणवंत विद्यार्थ्‍यांचा राहून गेलेला ‘पुरस्‍कार समारंभ’ हा ‘विवाह सोहळ्‍यात सोडमुंज उरकून घ्‍यावी, तसा हा कार्यक्रम गणेश मंडळाने त्‍याचे श्रेय पदरी पाडून घेण्‍याच्‍या दृष्‍टीने उरकून घेतला असावा’, असे वाटत होते.

अन्‍य एका गणेश मंडळात तरुण-तरुणींचा विनोदाचा हास्‍यकल्लोळ ऐकू येत होता. लक्षात आले की, त्‍या ठिकाणी कॅरम, पत्ते, बुद्धीबळ आणि अन्‍य बैठ्या खेळांंच्‍या स्‍पर्धांचा कार्यक्रम चालू आहे.

उ. मौजमजा करणे : पुढे एक भव्‍य फ्‍लॅट स्‍कीमच्‍या पटांगणात प्रत्‍येकी १० – १२ टेबलांवर पाणीपुरी, दहीवडा, इडली डोसा, सांबार-वडा, उत्तपा, बिर्याणी, कटलेट इत्‍यादी विविध चमचमीत पदार्थांचे जणू छोटे कक्ष लावले होते. खवय्‍य्‍यांची एकच झुंबड उडाली होती. प्रत्‍येक विक्रेता पैशांचा गल्ला भरत होता. पलिकडे एका बोर्डावर फुगे लटकवून लहान मुलांचा ‘एअरगन’ने ते फोडण्‍याचा खेळ चालू होता. पलिकडे पैसे लावून रमी पत्त्यांचा डाव रंगात आला होता. एकंदरीत फेस्‍टच्‍या (आनंदमेळा) कार्यक्रमात अबाल-वृद्ध सहभागी होऊन विविध खाद्यपदार्थांच्‍या प्‍लेटस् वर प्‍लेटस् मागवून ताव मारून मनसोक्‍त आनंद लुटत होते.

२. सध्‍याच्‍या गणेशोत्‍सवाचे विकृत स्‍वरूप समाज आणि देश यांच्‍या हितासाठी थांबणे अपरिहार्य !

प्रतिकात्मक छायाचित्र

काही वर्षांपूर्वी गांधी टोपीचा गणपति, सूटबूट-टाय घातलेला तथा जवाहरलाल नेहरू, म. गांधी आदी राष्‍ट्रपुरुषांचे रूप धारण करणारे गणपति बसवण्‍याची पद्धत (टूम) होती. कालांतराने ती विरळ झाली; पण अभिनेत्‍यांच्‍या रूपात गणेशमूर्ती दिसतात. आता दुसर्‍याच विकृतीने पुन्‍हा डोके वर काढलेले दिसते. अलिकडे अनेक सुशिक्षित तरुणांना नोकरी अभावी नैराश्‍याने आणि परिणामतः व्‍यसनांनी ग्रासले आहे. गणेशोत्‍सवाच्‍या संधीचा लाभ घेऊन अशी काही तरुण मंडळी एकत्र येतात. त्‍या निमित्ताने रितसर पावती पुस्‍तके छापून अमाप वर्गणी गोळा करतात. आपला भोळा समाज पापभीरू नसला, तरी गणेशोत्‍सवाच्‍या वर्गणीला सहसा नाही म्‍हणत नाही. याचा अपलाभ घेऊन वर्गणीतून गोळा केलेला पैसा गणेशोत्‍सवाकरता तात्‍पुरता व्‍यय (खर्च) करून बेहिशोबी चंगळ करण्‍यासाठी  व्‍यय केला जातो, असेही आढळते. या सर्व प्रकारच्‍या कुप्रथा आणि गणेशोत्‍सवाला दिवसेंदिवस प्राप्‍त होणारे विकृत स्‍वरूप समाज अन् देश यांचे हित लक्षात घेता थांबलेच पाहिजे. सुबद्ध, सुशिक्षित, निष्‍ठावान समाजाने मला काय त्‍याचे ? ही बघ्‍याची भूमिका घेऊन चालणार नाही. तशीच सुबुद्धी गणरायाने सर्व गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि जनतेला द्यावी, जेणेकरून सार्वजनिक गणेशोत्‍सवांना जे विकृत अन् विसंगत स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे, ते नाहीसे व्‍हावे.

३. स्‍वाभिमानी राष्‍ट्र निर्माण होण्‍यासाठी गणेशोत्‍सवातून देशभक्‍तीचे जागरण होणे आवश्‍यक !

उपरोक्‍त दृश्‍यांवरून सुजाण व्‍यक्‍तींच्‍या लक्षात येईल की, आपला समाज भोगवादी आणि चंगळवादी विकृतीकडे झपाट्याने गतीमान होत आहे. म्‍हणूनच गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून करमणुकीच्‍या नावाखाली लाड पुरवले जातात. ‘लोकमान्‍य टिळकांच्‍या उदात्त हेतूला मूठमाती दिली जात आहे’, असे प्रकर्षाने जाणवते. करमणुकीच्‍या माध्‍यमातूनही कथा, कीर्तने, शाहिरी पोवाडे, परिसंवाद, देशभक्‍ती आणि भावगीते यांच्‍या कार्यक्रमातून समाज प्रबोधन करता येते. तशी दिशा मंडळांनी आपल्‍या कार्यक्रमांना द्यावी, हीच या लेखन प्रपंचामागची तळमळ ! वस्‍तूतः अशा उत्‍सवातून राष्‍ट्रीय अस्‍मितेची जाण, आपल्‍या धर्म संस्‍कृतीचे संस्‍मरण आणि देशभक्‍तीचे जागरण व्‍हावे, ही लोकमान्‍य टिळकांची दृढ इच्‍छा होती. आजच्‍या देशातील सर्व प्रकारची दुरवस्‍था पहाता समाजात नैतिक परिवर्तन होण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. असे झाले, तरच सबल, स्‍वाभिमानी राष्‍ट्र निर्माण होऊ शकेल आणि ते टिकेल. अन्‍यथा पुन्‍हा देश विभाजनाची टांगती तलवार शिरावर आहेच.’

– अधिवक्‍ता य. बा. फडणीस

(साभार : मासिक ‘श्री गजानन आशिष’, सप्‍टेंबर २०१३)

संपादकीय भूमिका

गणेशोत्‍सवातून राष्‍ट्रीय अस्‍मितेची जाण, धर्म संस्‍कृतीचे संस्‍मरण आणि देशभक्‍तीचे जागरण व्‍हावे, हीच लोकमान्‍य टिळक यांची इच्‍छा !