खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करू पहाणारे साम्‍यवादी !

साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी ‘बिझनेस टीव्‍ही’वर मांडलेल्‍या सूत्रांचे खंडण

‘जेव्‍हा ‘आपलेच म्‍हणणे खरे’, असे अहंभावी विचार असतात आणि प्रत्‍यक्षात ते खरे नसतात, तेव्‍हा शब्‍दच्‍छल करून ते खरे करण्‍याच्‍या नादात काही तथाकथित स्‍वयंघोषित विद्वान तोंडघशी पडतात. त्‍यांचा दुतोंडीपणा उघडा पडत असतो. हे ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन शब्‍दांच्‍या संदर्भात ‘बिझनेस टीव्‍ही’वरील एका चर्चेत साम्‍यवादी लेखक देवदत्त पटनायक यांनी मांडलेल्‍या सूत्रांतून आपल्‍याला निश्‍चित शिकायला मिळेल.

हिंदूंनी त्‍यांच्‍या धर्मग्रंथांचा अभ्‍यास केलेला नाही. त्‍यांच्‍यात हिंदु धर्मावर वैचारिक आघात करणार्‍यांच्‍या विचारांची सत्‍यता पडताळण्‍याची तळमळ आणि त्‍यांचे वैचारिक षड्‍यंत्र उघडे पाडण्‍याची विजिगीषु वृत्ती यांचा अभाव आहे. त्‍यामुळे अशा साम्‍यवादी धर्मविरोधी विचारकांचे चांगलेच फावते. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘धर्मनिरपेक्षतावादी आणि सुधारकांचा जातीयवाद यांपासून समाज अन् देश यांना सर्वाधिक धोका, तसेच साम्‍यवादी तथाकथित विचारकांचे सर्व विश्‍लेषण ब्राह्मणद्वेषीच’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/721102.html

टीका ४ 

‘सिंधु’ हा वैदिक शब्‍द असून ‘इंडिया’ हा शब्‍द सिंधूपासून आला आहे. देशांतर्गत आणि बाह्य हा भेद अतिशय ब्राह्मणवादी आहे. ही एक जातीवादी गोष्‍ट आहे. जे आंतरिक आहे, ते शुद्ध आहे आणि जे बाह्य आहे, ते अशुद्ध किंवा म्‍लेंच्‍छ आहे. या अपवित्र लोकांना, अस्‍पृश्‍यांना बाहेर ठेवले पाहिजे. अस्‍पृश्‍यांना गावाबाहेर ठेवले जात होते, ही निरोगी मानसिकता नाही. आंतरिक गोष्‍टी अंगणात ठेवाव्‍यात, असे म्‍हणणारी ब्राह्मण मानसिकता, उदा. सीतेने लक्ष्मणरेखा ओलांडली; म्‍हणून ती अपवित्र झाली. बाहेर वाईट आहे आणि आत चांगले आहे. ही निरोगी मानसिकता नाही.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

खंडण : ‘सनातन धर्माला नष्‍ट करा’, असे म्‍हणणे हा वैचारिक आतंकवादच !

अ. येथेही ओढून ताणून जातीयवाद आणून साम्‍यवादी (साम्‍यवाद्यांच्‍या लेखी ब्राह्मणी) मानसिकता दाखवून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर भेद पाडून ‘फोडा आणि राज्‍य करा’, ही साम्‍यवादी नीती आपण वापरली आहे. तुमच्‍या लेखी छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणी परंपरेचे पाईक होतील; कारण त्‍यांनी परकीय भाषेला नाकारून स्‍वभाषा, स्‍वभाषा शब्‍दकोष, स्‍वकीय चलन आदी प्रचलित केले होते. स्‍वदेशी नाणे चलनात आणले होते, इस्‍लामी आततायी सत्तेविरुद्ध संघर्ष करून स्‍वधर्मीय हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन केले होते. ‘स्‍वकीय आणि परकीय हा भेद जर ब्राह्मणवाद आहे, तर इस्‍लामी, ख्रिस्‍ती, बौद्ध किंवा ज्‍यू देश किंवा अन्‍य धर्मनिरपेक्षतावादी देश असो, सर्व ब्राह्मणी देश आहेत’, हे आधी पटनायक यांना मान्‍य करावे लागेल. भारत सोडून जवळपास अन्‍य सर्व देशांनी परकीय आक्रमकांच्‍या खुणा पुसून त्‍यांच्‍या स्‍वकीय परंपरांना स्‍थापन केले आहे.

परकीय भाषांचे जोखड काढून त्‍यांनी त्‍यांच्‍या भाषा स्‍वीकारल्‍या आहेत. आज तमिळनाडूमध्‍ये कुणी हिंदी भाषिक गेले, तर त्‍याच्‍या प्रश्‍नाला हिंदी भाषेत उत्तर दिले जात नाही. त्‍यामुळे स्‍वकीय आणि स्‍वपरंपरा यांचे रक्षण करणारे द्रविड राजकीय पक्ष हेही ब्राह्मणीच ठरतात. त्‍यांच्‍या विरुद्ध तथाकथित साम्‍यवादी ब्राह्मण लढा उभारणार आहेत का ? ते पटनायक यांनी सांगावे.

आ. हिंदु धर्मात अस्‍पृश्‍यता कुठेही नाही. कोण्‍या एका व्‍यक्‍तीची चुकीची विचारसरणी असेल, तर ती शिक्षेस पात्र ठरू शकते. ज्‍यांनी चुकीने का असेना, ही अस्‍पृश्‍यता मानली होती, त्‍यांच्‍या लेखी अस्‍पृश्‍यता ही केवळ स्‍पर्श टाळण्‍यापर्यंत मर्यादित होती; परंतु ‘द्रमुक’चे उदयनिधी स्‍टॅलिन आणि ए. राजा, काँग्रेसचे प्रियांक खर्गे अन् मल्लिकार्जुन खर्गे असे जे कुणी ‘सनातन धर्माला उखडून फेकले पाहिजे’ किंवा ‘जागतिक स्‍तरावर सनातन धर्माला नष्‍ट करा’, असे ‘ऑनलाईन’ संमेलन घेणारे तथाकथित साम्‍यवादी अभ्‍यासक ब्राह्मण जे ‘सेक्‍युलर’, ‘सुधारक’ अशी बिरुदावली लावतात, त्‍यांना काय म्‍हणणार ? हा तर वैचारिक आतंकवादच झाला. त्‍यामुळे ते पक्‍के वैचारिक आतंकवादीच ठरतात.

टीका ५

भारत हा एक बहुधर्मीय देश आहे. बटाटे बाहेरून आले आणि आम्‍ही ते स्‍वीकारले. घोडे बाहेरून आले आणि आम्‍ही ते स्‍वीकारले. आर्य बाहेरून आले आणि आम्‍ही स्‍वतःला ‘आर्यदेश’ म्‍हणतो. आमच्‍यातील प्रत्‍येक जण आफ्रिकेतून आला आहे. त्‍यामुळे आम्‍ही सर्व तांत्रिक आणि अनुवांशिक दृष्‍ट्या आफ्रिकन आहोत.

खंडण : ब्राह्मणद्वेषाच्‍या आडून हिंदु धर्म नष्‍ट करण्‍याचे साम्‍यवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी यांचे षड्‍यंत्र !

अ. बाहेरच्‍या देशातून आलेले बटाटे, घोडे स्‍वीकारले आणि आर्य बाहेरून आले, अशी बोंब मारून साम्‍यवाद्यांनी हिंदुविरोधी चळवळ उभारली. भारताने जर आर्य देश स्‍वीकारला आहे, तर ‘इंडिया’ नावाच्‍या आग्रहासाठी देवदत्त पटनायक आपण आणि आपल्‍या विचारसरणीचे लोक एवढी राळ कशासाठी उठवत आहात ? करू दे ना देशाचे नाव ‘भारत’ ! त्‍यात काय बिघडले ? हे तुमचे दाखवायचे दात आहेत. वास्‍तविक हिंदूंना बाहेरचे ठरवून हिंदु धर्माला नष्‍ट करून टाकण्‍याच्‍या षड्‌यंत्रात सर्व साम्‍यवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी सुधारक, अभ्‍यासक सहभागी आहेत, हे सत्‍य तुम्‍ही कसे नाकारणार ?

आ. पटनायक, तुम्‍हाला साम्‍यवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि सुधारक अभ्‍यासकांची वैचारिक दिवाळीखोरी दाखवू का ? तुम्‍ही म्‍हणता, ‘आर्य बाहेरून आले.’ अर्थात् आर्य-द्रविड असा खोटा सिद्धांत ठेवून भारतातील जनतेला ‘फोडा, झोडा आणि राज्‍य करा’, या उक्‍तीनुसार भांडण लावून आपण सर्व मोकळे झाला आहात. त्‍यात मूलनिवासी आणि बाहेरून आलेले आर्य, हा संघर्ष साम्‍यवादी धर्मनिरपेक्षतावादी सुधारक विचारवंतांनी निर्माण केला आहे. किती हे पाप !

आ १. ‘आर्यन इनव्‍हेजन थेअरी’चा (आर्य आक्रमणाचा सिद्धांत) फोलपणा दाखवणारे देवदत्त पटनायक ! : शेवटी तुम्‍ही म्‍हणता, ‘सर्व मानवांची उत्त्पत्ती आफ्रिकेत झाली आणि तेथून ते विश्‍वात सर्वत्र गेले’, म्‍हणजे भारतात आर्य असो वा द्रविड, आपल्‍या लेखी सर्व बाहेरूनच आले आहेत. मग ‘आर्यन इनव्‍हेजन थेअरी’ हे भारतविरोधी षड्‌यंत्र आहे’, असे आपण घोषित करा. आर्य-द्रविड दोन्‍ही बाहेरूनच आले. त्‍यामुळे भारतात मूलनिवासी कुणीच नाही, हे घोषित करा ! तसेच जे साम्‍यवादी ब्राह्मण या खोट्या प्रचाराद्वारे समाजात भेद निर्माण करून संघर्ष करू पहात आहेत, त्‍यांना कठोर शिक्षा करण्‍यास सरकारला भाग पाडा ! आहे का सत्‍याची कास धरायची तुमची सिद्धता ?

आ २. सनातन धर्मशास्‍त्रानुसार भारत वर्ष ही देवभूमी असून येथून मानवाची, तसेच सजीवांची उत्‍पत्ती झाली आणि ते संपूर्ण विश्‍वात व्‍यापले. येथे कुणी स्‍थानिक नाही, कुणी बाहेरचे नाही. म्‍हणूनच ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ (संपूर्ण पृथ्‍वी कुटुंब आहे.) हा घोष वेदांनी दिला आहे. हे कळून न स्‍वीकारणारे साम्‍यवादी ‘फूट पाडा आणि सत्ता घ्‍या’, या स्‍वार्थासाठी मानवतेची आणखी किती हत्‍या करणार आहेत ? थोडीशी तरी माणुसकी दाखवणार आहेत का ?

– (सद़्‍गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (८.९.२०२३)

(समाप्‍त)