(म्हणे) ‘मंदिरात माझ्यासमवेत जातीभेद करण्यात आला !’ – के. राधाकृष्णन्, मंदिर व्यवहारमंत्री, केरळ

  • केरळचे माकपचे दलित आमदार आणि मंदिर व्यवहारमंत्री के. राधाकृष्णन् यांचा आरोप

  • मंदिराने नाव सांगण्याचे टाळले !

के. राधाकृष्णन्

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळचे माकपचे आमदार आणि मंदिर व्यवहारमंत्री के. राधाकृष्णन् यांनी त्यांच्या समवेत एका मंदिरात जातीभेद करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ‘ही घटना कोणत्या मंदिरात झाली’, याची माहिती दिली नाही; मात्र या घटनेवरून त्यांनी हिंदु धर्मावर टीका केली. के. राधाकृष्णन् माकपमधील एक दलित नेते आहेत.

(म्हणे) ‘हिंदु धर्माचा अर्थ एकच आहे तो म्हणजे लोकांमध्ये भेदाभेद निर्माण करणे !’  

  • मंत्र्यांच्या एका प्रसंगावरून आणि तोही खरा आहे कि खोटा, हे स्पष्ट नसतांना ते हिंदु धर्माविषयी अशा प्रकारचे विधान करत आहेत, यावरून त्यांची हिंदुद्वेषी मानसिकता स्पष्टपणे लक्षात येते !
  • अशा कथित प्रसंगावरून मंत्री राधाकृष्णन् हिंदु धर्मावर टीका करत असतील, तर त्यांनी जिहादी आतंकवादामुळे जगभरातील लक्षावधी नागरिकांना ठार केले जाते, तो कोणत्या धर्मामुळे आहे, यावरही त्यांनी विधान करून दाखवले पाहिजे !

मंदिर व्यवहारमंत्री के. राधाकृष्णन् यांनी एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले, ‘मी जेव्हा एका मंदिरात कार्यक्रमासाठी गेलो होतो, तेव्हा मला दीपप्रज्वलन करण्यासाठी बोलवण्यात आले; पण त्यावेळी मला दीपप्रज्वलन करण्यासाठी कोणताही दिवा हाती देण्यात आला नाही. तिथल्या पुजार्‍यांनी दिवे आणले होते; मात्र माझ्या हातात त्यांनी एकही दिवा दिला नाही. पुजार्‍यांनी दीप प्रज्वलन केले आणि त्यानंतर त्यांच्या हातात असलेला दिवा भूमीवर ठेवून दिला. त्यांची अपेक्षा अशी होती की, मी भूमीवर ठेवलेला दिवा उचलावा आणि दीपप्रज्वलन करावे. मला अपेक्षा नव्हती की, मंदिरात गेलो असतांना असे काही घडेल. हिंदु धर्माचा अर्थ एकच आहे तो म्हणजे लोकांमध्ये भेदाभेद निर्माण करणे.’ (साम्यवाद्यांची हिंदुद्वेषी मानसिकता यातून दिसून येते. हिंदु धर्मात जातीव्यवस्था नाही, तर वर्णाश्रमव्यवस्था आहे. साम्यवादी हिंदु धर्मावर जाणूनबुजून टीका करत आहेत ! – संपादक)

(म्हणे) ‘माझा निधी चालतो; पण मला अस्पृश्य मानतात !’

के. राधाकृष्णन् यांनी आरोप केला की, माझ्याकडून जेव्हा निधी घेतात, तेव्हा तो निधी त्यांना अस्पृश्य वाटत नाही; मात्र मी त्यांना अस्पृश्य ठरलो. मला त्यांच्या वागणुकीतून त्यांनी हेच दाखवून दिले आहे. (मंत्री जो काही निधी देतात, तो स्वतःच्या खिशातून नाही, तर सरकारचा असतो, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

के. राधाकृष्णन् हे राज्याचे मंदिर व्यवहारमंत्री आहेत, तर त्यांनी मंदिराचे नाव सांगितले पाहिजे. अशा प्रकारे मंत्र्यांचा कुणी जातीमुळे अवमान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र जातीच्या नावाखाली जर हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूंनी त्याचा वैध मार्गाने विरोध करणेही आवश्यक आहे !