तमिळनाडूमध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !

नवी देहली – तमिळनाडू राज्यामध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर बंदी कायम असणार आहे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाने यापूर्वी यावर बंदी घातली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. याच वेळी न्यायालयाने ‘नैसर्गिक मातीपासून बनवण्यात आलेल्या मूर्तींचा वापर करता येणार आहे’, असेही स्पष्ट केले.

१. मूर्तीकारांचे अधिवक्ता श्याम दिवाण यांनी युक्तीवाद करतांना सांगितले होते की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अनेक वर्षांपासून बनवल्या जात आहेत. यासाठी मूर्तीकार कर्ज काढतात. त्यामुळे कृपया यावर विचार केला जावा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावर नाही, तर त्याच्या विसर्जनावर बंदी घातलेली आहे.

२. सरकारी अधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी अधिवक्ता दिवाणी यांच्या युक्तीवादानंतर प्रतिवाद करतांना म्हटले की, मंडळाची प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बनवण्यावरही बंदी आहे. मंडळाच्या नियमावलीनुसार पर्यावरणपूरक मूर्तीही कृत्रिम हौदात विसर्जन केल्या पाहिजेत.