मराठा समाजाच्‍या कल्‍याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करील ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

मुंबई – मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मंत्रीमंडळातील अन्‍य सहकार्‍यांच्‍या उपस्‍थितीत मागे घेतले, ही समाधानाची गोष्‍ट आहे. मराठा आरक्षणाविषयी आम्‍ही प्रारंभीपासून सातत्‍याने प्रयत्नरत राहिलो. आम्‍ही ते दिले आणि उच्‍च न्‍यायालयात टिकले होते. सर्वोच्‍च न्‍यायालयात ते का टिकले नाही ? यावर मत व्‍यक्‍त करण्‍याची आज ही वेळ नाही; मात्र सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्‍क प्रतिपूर्ती योजना, अण्‍णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्‍या माध्‍यमातून उद्योजकतेला प्रोत्‍साहन, अधिसंख्‍य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्‍यात आल्‍या. आजही या सर्व गोष्‍टींत अतिशय गतीने काम चालू आहे. भविष्‍यातही मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या नेतृत्‍वाखाली मराठा आरक्षण, तसेच मराठा समाजाच्‍या कल्‍याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करील, असे उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्‍वीट करून ही प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्‍टपासून चालू केलेले ‘आमरण उपोषण’ १४ सप्‍टेंबर या दिवशी मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी आपला लढा चालूच रहाणार आहे; मात्र आपण सर्वांच्‍या आग्रहास्‍तव उपोषण मागे घेत आहोत, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी अंंतरवाली सराटी येथे केली होती. मनोज जरांगे पाटील त्‍यांचे मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन त्‍याच जागी चालू ठेवणार आहेत.