महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधिकांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची जाणवलेली आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये आणि सामर्थ्‍य !

ज्‍यांना पाहून स्‍थितप्रज्ञतेची अनुभूती येते ।
असे ऋषितुल्‍य सद़्‍गुरु आम्‍हा लाभले ।
त्‍यांच्‍या मनी नित्‍य कारुण्‍यगंगा वहाते ।
जणू ते श्री गुरूंचे दुसरे रूप असे ॥

असे श्री गुरूंचे (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) दुसरे रूप  म्‍हणजे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा भाद्रपद शुक्‍ल प्रतिपदा, म्‍हणजेच १६ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने साधिकांना जाणवलेली आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये आणि सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ६० व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या संदर्भात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काढलेले उद़्‍गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एकदा सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची ओळख करून देतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्‍हणाले होते, ‘‘सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांच्‍यासारखे संपूर्ण जगात कुणी नाही. (‘तुम्‍ही अशीच ओळख करून देता ना ?’, असेही गुरुदेवांनी विचारले.)

श्री. संदीप शिंदे

सहस्रो संत भारतात आहेत; पण पंचतत्त्वांची अनुभूती देणारे सद़्‍गुरु गाडगीळकाका एकमेव आहेत. विदेशात तर असे कुणी नसतेच.’’

– श्री. संदीप शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे)

कु. अपाला औंधकर

१ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातील अफाट ज्ञान पहातांना स्‍तिमित होणे : ‘कधी कधी मी काढलेली सूक्ष्म चित्रे सद़्‍गुरु गाडगीळकाकांना दाखवण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडे जाते. तेव्‍हा मी ‘गुरुदेवांकडेच जात असून मी काढलेली सूक्ष्म चित्रे श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुदेवच पहात आहेत’, असे मला जाणवते. सद़्‍गुरु गाडगीळकाका त्‍या चित्राचे सूक्ष्म परीक्षण करतांना मला त्‍यांच्‍या जागी गुरुदेव दिसतात. त्‍यांनी सूक्ष्म चित्र पाहिल्‍यानंतर मला ते चित्र अधिक हलके वाटते. सद़्‍गुरु गाडगीळकाका त्‍या सूक्ष्म चित्राचे काही क्षणांत सूक्ष्म परीक्षण करून त्‍यामध्‍ये असणारी स्‍पंदने, सात्त्विकता, सत्‍यता आदी सर्व गोष्‍टी अगदी सहजतेने सांगतात. ते पाहून मला पुष्‍कळ आश्‍चर्य अन् कृतज्ञता वाटते.’

२. कु. शर्वरी कानस्‍कर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे)

कु. शर्वरी कानस्कर

२ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ येतात, तेव्‍हा दैवी सुगंध दरवळणे : ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयात संगीतातील काही संशोधनात्‍मक प्रयोग केले जातात. त्‍या प्रयोगांसाठी सद़्‍गुरु गाडगीळकाका येतात. ते येण्‍यापूर्वीच मला एक दैवी सुगंध येतो. सद़्‍गुरु गाडगीळकाका ये-जा करतांना किंवा त्‍यांच्‍या खोलीतही मला तोच सुगंध येतो. त्‍यामुळे ते येण्‍यापूर्वीच मला ‘सद़्‍गुरु गाडगीळकाका येत आहेत’, असे कळते.

२ आ. ‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या स्‍पर्शाने भ्रमणभाषचे जडत्‍व न्‍यून झाले’, असे अनुभवणे : ‘एका कलाकाराचे छायाचित्र पहाण्‍यासाठी मी माझा भ्रमणभाष सद़्‍गुरु गाडगीळकाकांंकडे दिला होता. त्‍यांनी मला तो परत दिल्‍यावर मला तो हलका जाणवला. यावरून ‘त्‍यांच्‍या केवळ स्‍पर्शानेही वस्‍तूतील जडत्‍व न्‍यून होते’, असे मला जाणवले.’

३. कु. अपाला औंधकर आणि कु. शर्वरी कानस्‍कर, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

३ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या संदर्भात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काढलेले उद़्‍गार !

१. ‘सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या खोलीतील सर्व वस्‍तू जागच्‍या जागी आणि नीटनेटकेपणाने ठेवलेल्‍या असतात. त्‍यांच्‍या खोलीतील प्रत्‍येक वस्‍तूत चैतन्‍य आणि सात्त्विक स्‍पंदने जाणवतात.

२. त्‍यांच्‍या खोलीत नेहमीच एक दैवी सुगंध येतो.

३. त्‍यांच्‍या खोलीत कधी थंडावा, तर कधी प्रसन्‍नता जाणवते. त्‍यांच्‍या खोलीत चैतन्‍य, आनंद अन् शांती यांची अनुभूती येते.

४. त्‍यांची खोली अधिक प्रकाशमान वाटते. त्‍यांच्‍या खोलीत साक्षात् भगवंताचेच अस्‍तित्‍व जाणवते. कधी कधी असे वाटते, ‘सद़्‍गुरु गाडगीळकाकांना भेटण्‍यासाठी सूक्ष्मातून सर्व देवीदेवता आल्‍या आहेत !’

५. सद़्‍गुरु गाडगीळकाकांची खोली पूर्वीच्‍या काळातील ऋषिमुनींच्‍या कुटीसारखी सात्त्विक आणि दैवी जाणवते.

३ आ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘जे आपल्‍याला ठाऊक आहे, ते इतरांना सांगितल्‍यावर भगवंत आपल्‍याला पुढचे ज्ञान देतो’, असे सांगून समष्‍टी सेवेतील आनंद घेण्‍यास शिकवणे : आम्‍ही सद़्‍गुरु गाडगीळकाकांकडे गेल्‍यावर ते ‘आम्‍हाला आलेल्‍या अनुभूतींविषयी’ किंवा ‘मी काढलेल्‍या सूक्ष्म चित्राचा अभ्‍यास कसा करायचा ?’, अशी सूक्ष्म ज्ञानाविषयी माहिती सांगतात. प्रत्‍येक वेळी ते आम्‍हाला एखादे नवीन सूत्र सांगतात. एकदा ते आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘जे आपल्‍याला ठाऊक आहे, ते सर्व आपण इतरांना सांगितले पाहिजे. मग भगवंत आपल्‍याला अजून अजून देणार !’’ यामुळे प्रत्‍येक नवीन गोष्‍ट शिकल्‍यानंतर ‘ती दैवी बालकांच्‍या सत्‍संगात किंवा सहसाधकांना सांगायला हवी’, याची जाणीव होऊन तशी कृती होते. त्‍यामुळे समष्‍टी सेवेतील आनंद मिळतो.

३ इ. ‘कलाकार भावपूर्णपणे त्‍याची कला प्रस्‍तुत करतो, तेव्‍हा तेवढ्या कालावधीपुरती त्‍याची आध्‍यात्मिक पातळी वाढते’, हे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍याकडून शिकता येणे : एकदा आम्‍ही एका भरतनाट्यम् नृत्‍यांगनेच्‍या नृत्‍याची ध्‍वनीचित्रफीत पहात होतो. आम्‍हाला ‘त्‍यांचे नृत्‍य आध्‍यात्मिक स्‍तरावर होत आहे’, असे वाटले; म्‍हणून आम्‍ही ती ध्‍वनीचित्रफीत सद़्‍गुरु गाडगीळकाकांना दाखवली. ती ध्‍वनीचित्रफीत पाहून सद़्‍गुरु गाडगीळकाका म्‍हणाले, ‘‘नृत्‍य पहातांना सात्त्विकता, थंडावा आणि भावही जाणवतो.’ त्‍यांनी त्‍या नृत्‍यांगनेची सूक्ष्मातून आध्‍यात्मिक पातळी पाहिली. त्‍यांना ती ६० टक्‍के जाणवली. तेव्‍हा आम्‍ही त्‍यांना त्‍या नृत्‍यांगनेचे छायाचित्र दाखवले. त्‍यांनी नृत्‍यांगनेच्‍या छायाचित्रावरील आणि स्‍वतःवरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढले. नंतर त्‍यांनी पुन्‍हा त्‍या नृत्‍यांगनेचे छायाचित्र पाहून त्‍यांची सूक्ष्मातून आध्‍यात्मिक पातळी काढली. तेव्‍हा त्‍यांना ती ५५ टक्‍के जाणवली. ते आम्‍हाला म्‍हणाले, ‘‘कलाकार त्‍याची कला भावपूर्णपणे प्रस्‍तुत करतो, तेव्‍हा तेवढ्या कालावधीपुरती त्‍याची आध्‍यात्मिक पातळी वाढते. नंतर तो पुन्‍हा नेहमीच्‍या पातळीला येतो.’’ यातून ‘कलेत किती सामर्थ्‍य आहे ?’, हे आम्‍हाला शिकता आले.

३ ई. सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांच्‍यातील अनुभवलेले सामर्थ्‍य !

३ ई १. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका कलाकाराच्‍या छायाचित्रावरील आवरण काढल्‍यावर आवरण जाऊन छायाचित्रात पालट जाणवणे : एकदा आम्‍ही सद़्‍गुरु गाडगीळकाकांना एका कलाकाराचे भ्रमणभाषवरील छायाचित्र दाखवले. बाहेरील रज-तमामुळे त्‍या कलाकारावर आवरण आले होते. ते पाहून सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी स्‍वतःच्‍या हातांनी त्‍या कलाकाराच्‍या छायाचित्रावरील त्रासदायक शक्‍तीचे आवरण काढले. त्‍यानंतर त्‍यांनी आम्‍हाला पुन्‍हा त्‍या कलाकाराच्‍या छायाचित्राकडे पहाण्‍यास सांगितले. तेव्‍हा आम्‍हाला त्‍या छायाचित्रात पालट जाणवला. छायाचित्रावरील आवरण आणि दाब जाऊन त्‍या कलाकाराचा चेहरा चांगला अन् पिवळसर दिसला. यातून ‘सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी एखाद्या व्‍यक्‍तीच्‍या छायाचित्रावरील आवरण काढले, तरी त्‍या व्‍यक्‍तीच्‍या छायाचित्रात पालट होतो !’, हे आम्‍हाला शिकता आले.’

‘हे श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुदेवा, आपल्‍याच अनंत कृपेमुळे आम्‍हा सर्व साधकांना ‘सद़्‍गुरु गाडगीळकाकांंसारखे उच्‍च आध्‍यात्मिक पातळीचे आणि ऋषितुल्‍य सद़्‍गुरु लाभले’, यासाठी आम्‍ही आपल्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’ (२८.८.२०२३)


पितृतुल्‍य सद़्‍गुरु लाभले आम्‍हा साधक जिवांना ।

सौ. सायली करंदीकर

पितृतुल्‍य सद़्‍गुरु लाभले आम्‍हा साधक जिवांना ।
त्‍यांचा सहवास लाभे अविरत गुरुधामा ॥ १ ॥

चैतन्‍याची उधळण करीतसे त्‍यांच्‍या प्रत्‍येक हालचाली ।
सहजतेने ते करतात भगवत्लीला सारी ॥ २ ॥

त्‍यांचे नामजपादी उपाय म्‍हणजे संजिवनी वाटे सर्वांना ।
त्रास दूर करण्‍याची क्षमताच पुरवतात ते आम्‍हा ॥ ३ ॥

गिरवुनी अध्‍यात्‍माचे धडे गुरुविश्‍वास त्‍यांनी मिळवला ।
त्‍यांच्‍या प्रत्‍येक वागण्‍यातूनी साधनेचा मार्ग त्‍यांनी दाखवला ॥ ४ ॥

प्रेमळस्‍वरूप गुरुमाऊली त्‍याच्‍या रूपे आम्‍हास भेटली ।
त्‍याच्‍यामुळेच अजूनही आम्‍ही साधनेची कास नाही सोडली ॥ ५ ॥

अजून काय सांगावे माझ्‍या गुरुपित्‍याविषयी देवा ।
अखंड कृतज्ञ आहे मी तव चरणी गुरुराया ॥ ६ ॥

वडील नाही प्रत्‍यक्ष तू भगवंतच पाठवलास ।
मला साधनेसाठी घडवूनी, माझा सांभाळ करण्‍यास  ॥ ७ ॥

– सौ. सायली सिद्धेश करंदीकर (सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची कन्‍या), फोंडा, गोवा. (१५.९.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.