दादर (मुंबई) येथील कथ्‍थक नृत्‍यांगना विद्यावाचस्‍पती (सौ.) रूपाली देसाई यांनी नृत्‍यसाधनेविषयी व्‍यक्‍त केलेले मार्गदर्शक विचार !

वर्ष २०१९ मध्‍ये महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍केे) यांनी कथ्‍थक नृत्‍यांगना विद्यावाचस्‍पती (डॉ.) सौ. रूपाली देसाई यांची त्‍यांच्‍या नृत्‍यवर्गाच्‍या ठिकाणी जाऊन भेट घेतली. तेव्‍हा विद्यावाचस्‍पती (सौ.) रूपाली यांनी त्‍यांच्‍या जीवनात संगीत साधनेचे अनुभवलेले महत्त्व आणि नृत्‍य साधनेविषयी व्‍यक्‍त केलेले विचार येथे दिले आहेत.

दादर (मुंबई) येथील कथ्‍थक नृत्‍यांगना सौ. रूपाली देसाई यांनी कथ्‍थक नृत्‍यात विद्यावाचस्‍पती (पीएच्.डी.(डॉक्‍टरेट)) पदवी प्राप्‍त केली आहे. विद्यावाचस्‍पती (सौ.) रूपालीताई यांनी त्‍यांचे कथ्‍थक नृत्‍याचे शिक्षण विद्यावाचस्‍पती (डॉ.) मंजिरी देव यांच्‍याकडे घेतले. आता त्‍या तालाचे (नृत्‍याचे) पुढील शिक्षण प्रसिद्ध तबलावादक पं. मुकुंदराज देव यांच्‍याकडे घेत आहेत. ‘संस्‍कृती नृत्‍यकला मंदिर’ या नृत्‍यसंस्‍थेच्‍या त्‍या संस्‍थापिका असून त्‍यांच्‍या नृत्‍यशाळेत २५० हून अधिक विद्यार्थिनी नृत्‍य शिकत आहेत.

सौ. रूपाली देसाई

१. संगीत उपचारांविषयी आलेली अनुभूती

‘महाविद्यालयात शिकत असतांना मी २ वर्षे गायन शिकत होते आणि कथ्‍थक नृत्‍य अन् नाटकांत अभिनयही करत होते; परंतु नंतर मी ‘कथ्‍थक नृत्‍य’ हेच माझे कार्यक्षेत्र निवडले.

१ अ. अपघात झाल्‍यामुळे चालता न येणे : वर्ष २००८ मध्‍ये मला मोठा अपघात झाला. अपघातानंतर ‘मी नृत्‍य करू शकेन कि नाही ?’, अशी माझी स्‍थिती झाली होती. तेव्‍हा ३ – ४ मास मी ‘वॉकर’ (चालायला साहाय्‍य करणारे साधन) घेऊन चालत होते. नंतर माझा ‘वॉकर’ सुटला; पण आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्‍हाला भौतिकोपचार तज्ञ (‘फिजिओथेरॅपिस्‍ट’) मिळणार नाही. तुम्‍ही नृत्‍यांगना असल्‍यामुळे चालण्‍याच्‍या दृष्‍टीने तुम्‍हालाच प्रयत्न करावे लागतील.’’

१ आ. गाणी ऐकतांना नृत्‍याच्‍या संरचना सुचत असल्‍यामुळे गाणी ऐकणे बंद केल्‍यावर निराशा येणे, तेव्‍हा आधुनिक वैद्यांनी सकारात्‍मक विचार देऊन धीर देणे : मी नृत्‍य करू शकत नव्‍हते; परंतु गाणी ऐकू शकत होते. गाणी ऐकायला लागल्‍यावर गाणी ऐकतांना मला नृत्‍याची संरचना सुचत असे. त्‍यामुळे मी गाणी ऐकणेही बंद केलेे. ‘मी नृत्‍य करू शकत नाही’, या विचारांमुळे मला पुष्‍कळ निराशा आली. तेव्‍हा आधुनिक वैद्य मला म्‍हणाले, ‘‘तुमच्‍या मनात नकारात्‍मक विचार येतील, तेव्‍हा असा विचार करा की, ‘मला ४ मासांसाठी नृत्‍याच्‍या कार्यक्रमासाठी लंडनला जायचे असून त्‍यासाठी मी सराव करत आहे.’’ त्‍यानंतर माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार आल्‍यावर मी त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे सकारात्‍मक विचार करू लागले. ‘त्‍याचा माझ्‍यावर काय परिणाम होत होता ?’, ते मला ठाऊक नाही; पण ते वाक्‍य मी आठवत असे.

१ इ. प्रतिदिन संगीतातील स्‍वर म्‍हणू लागल्‍यावर उपचार होऊन पाय लवकर सुधारणे : नंतर मी ‘सा रे ग म प ध नी सा’, हे स्‍वर म्‍हणायचेे ठरवले. महाविद्यालयात शिकत असतांना मी २ वर्षे गायन शिकले होते, त्‍याचा मला उपयोग झाला. संगीतामुळे मला मानसिक स्‍थैर्य लाभले. तेव्‍हा माझ्‍या मनात केवळ संगीत हा एकच विचार होता, तसेच ‘मला उठायचे आहे आणि व्‍यायाम करायचा आहे’, हा विचारही प्रबळ होता. मी प्रतिदिन संगीतातील स्‍वर म्‍हणू लागल्‍यावर माझे पाय २५ – ३० दिवसांऐवजी १५ दिवसांतच बरे झाले !

२. नृत्‍यवर्गात शिकायला येणार्‍यांविषयी आलेल्‍या अनुभूती

२ अ. नृत्‍यवर्गात येणार्‍या एका बहिर्‍या मुलीने नृत्‍य शिकून नृत्‍यविशारद होणे : माझ्‍या नृत्‍यवर्गामध्‍ये एक बहिरी आणि मुकी मुलगी नृत्‍य शिकायला येत होती. तिला ओठांच्‍या हालचालींवरून ‘आपण काय बोलतो ?’, ते थोडेफार कळायचे. मी तिला स्‍पर्शातून नृत्‍य शिकवत होते. ‘पाय कसे ” वाजवायचे ? जोर कुठे द्यायचा ? आणि कुठे न्‍यून करायचा ?’, हे सर्व मी तिला स्‍पर्शातून शिकवत होते. तिला ऐकता आणि बोलता येत नसले, तरीही केवळ संगीताच्‍या जाणीवेमुळे अन् स्‍पर्शातून शिकवल्‍यामुळे आज ती नृत्‍यविशारद झाली आहे. आज तिचे नाव ‘लिम्‍का वर्ल्‍ड रेकॉर्ड’मध्‍ये आहे !

२ आ. आत्‍मविश्‍वास पूर्णपणे गमावलेल्‍या मुलीने नृत्‍यामुळे पुन्‍हा आत्‍मविश्‍वास मिळवणे : माझ्‍याकडे एक मुलगी नृत्‍य शिकायला यायची. ‘तिच्‍या आयुष्‍यामध्‍ये काय घटना घडल्‍या होत्‍या ?’, ते मला ठाऊक नाही; पण मी नृत्‍य शिकवायला तिच्‍याजवळ जायचे, तेव्‍हा ती थरथर कापायची. मी तिला त्‍याविषयी काही विचारले नाही. मी तिला नृत्‍य शिकवले. एक वर्षात तिच्‍यामध्‍ये पुष्‍कळ सुधारणा झाली. मी तिला म्‍हणाले, ‘‘तू केवळ नृत्‍यामुळे हा आत्‍मविश्‍वास मिळवला आहेस. तो टिकवून ठेव.’’ तेव्‍हा ती मला म्‍हणाली, ‘‘माझ्‍यावर मानसोपचार करणारे तज्ञही मला म्‍हणाले, ‘‘तुझ्‍यामध्‍ये पुष्‍कळ सुधारणा झाली आहे.’’ तिने त्‍यांना सांगितले, ‘‘केवळ नृत्‍यशिक्षिका रूपालीताई आणि तुमचे उपचार यांमुळे माझ्‍यामध्‍ये ही सुधारणा झाली आहे.’’ तेव्‍हा मी तिला म्‍हणाले, ‘‘तुला नृत्‍यामुळे आत्‍मविश्‍वास मिळाला आहे. तो घेऊन तुला पुढे जायचे आहे आणि तुला तो वाढवायचा आहे.’’

२ इ. नृत्‍य शिकल्‍यामुळे अनेक जणी शारीरिक आणि मानसिक त्रासांतून बाहेर येणे : ‘ज्‍यांना आयुष्‍यात कुटुंबियांकडून शारीरिक आणि मानसिक त्रास झाले आहेत अन् ज्‍यांना जीवनात संगीताचा आनंद घ्‍यायचा आहे’, अशा बर्‍याच स्‍त्रिया माझ्‍याकडे नृत्‍य शिकण्‍यासाठी येतात. थोडे वय वाढलेल्‍या स्‍त्रियांना वाटते, ‘आता या वयामध्‍ये मी नृत्‍य करू शकत नाही.’ मी त्‍यांना सांगते, ‘तुम्‍ही केवळ ताल आणि लय यांकडे लक्ष द्या.’ असे सांगून सांगून आता बर्‍याच जणी बर्‍यापैकी नृत्‍य शिकून मनाच्‍या नकारात्‍मक स्‍थितीतून बाहेर पडल्‍या आहेत.

२ ई. आयुष्‍याला कंटाळलेल्‍या आणि निराश झालेल्‍या मानसशास्‍त्राच्‍या प्राध्‍यापिका नृत्‍यामुळे सकारात्‍मक होणे : मानसशास्‍त्राच्‍या एक प्राध्‍यापिका माझ्‍याकडे आल्‍या होत्‍या. त्‍या मला म्‍हणाल्‍या, ‘‘मी आयुष्‍याला कंटाळले असून निराश झाले आहे.’’ त्‍यांना कथ्‍थक नृत्‍य शिकायचे होते. नृत्‍य शिकल्‍यामुळे त्‍यांच्‍यातील सकारात्‍मकता वाढून आता त्‍या नृत्‍याची ५ वी परीक्षा देत आहेत.

३. संगीत साधनेविषयी असलेले विचार !

३ अ. नृत्‍यामुळे आत्‍मविश्‍वास आणि मनःशांतीमिळणे : पैसा हे सर्वस्‍व नाही. ‘नृत्‍यातून किती पैसे मिळतात ?’, यापेक्षा आत्‍मीय समाधानासाठी मी नृत्‍य करते. ‘नृत्‍य साधनेतून आत्‍मविश्‍वास आणि मनःशांती मिळते’, हे मी स्‍वतः अनुभवले आहे.

३ आ. ‘नृत्‍यातील संरचना देवापर्यंत पोचणार आहे’, या भावाने मनापासून करणे : मी सतत देवासमोर बसू शकत नाही; पण मी नृत्‍यात ज्‍या काही रचना करते, त्‍या मी मनापासून बसवते. ‘ते नृत्‍य देवापर्यंत पोचणार आहे’, असा माझा भाव असतो आणि त्‍याची मी अनुभूती घेतली आहे.

३ इ. नृत्‍यामधील ‘तत्‍कार’ केल्‍यावर मन शांत होणे : आपण एखादा नामजप मन शांत करण्‍यासाठी करतो. तसे आम्‍ही नृत्‍यामधील ‘तत्‍कार’(टीप) हा प्रकार मन शांत करण्‍यासाठी करतो. ‘तत्‍कार’ करून घाम येतो; पण आतून आंतरिक स्‍थिरता अनुभवता येते.

टीप – तालाच्‍या मात्रांमध्‍ये पावलांचे विशिष्‍ट प्रकारे संचलन करून पायांच्‍या आघातांद्वारे जे बोल काढले जातात किंवा नृत्‍याच्‍या काही बोलांवर पदन्‍यास केले जातात, त्‍यांना ‘तत्‍कार’, असे म्‍हणतात.

४. संगीत साधनेविषयी सांगितलेली काही मार्गदर्शक सूत्रे

४ अ. नृत्‍य किंवा संगीत यांतील ताल आणि लय यांच्‍याशी एकरूप झाल्‍यावरच नृत्‍य किंवा संगीत यांतून साधना होणे : नृत्‍य किंवा संगीत यांतून साधना होण्‍यासाठी आपण त्‍याचा नियमित सराव करायला हवा. सतत काही वर्षे, म्‍हणजे विशारद, अलंकार किंवा एम्.ए. झाल्‍यानंतरही आपण सतत सराव केला पाहिजे. सराव करतांना आपण ताल आणि लय यांच्‍याशी पूर्ण एकरूप व्‍हायला हवे. ‘यामध्‍ये आपले अनेक घंटे कधी संपतात’, हे आपल्‍याला कळत नाही, तेव्‍हा ती साधना होते.

४ आ. ‘नृत्‍य ‘समे’(टीप १) वर येणे’, हे नृत्‍य कलाकाराच्‍या दृष्‍टीने महत्त्वाचे असते. त्‍यामुळे ‘सम’ ही कलाकाराच्‍या दृष्‍टीने देव असते.

टीप १- तालाच्‍या पहिल्‍या मात्रेला ‘सम’, असे म्‍हणतात.

४ इ. अजून चांगले करण्‍याचा प्रयत्न सतत करायला हवा : ‘बक्षिस’ हे ध्‍येय ठेवू नये, ‘प्रयत्न’ हे ध्‍येय असायला हवे. ‘अजून चांगले कसे करता येईल ?’, असा आपण सतत विचार करायला हवा.

४ ई. आपण नृत्‍यातून इतरांना आनंद आणि सकारात्‍मक स्‍पंदने देऊ शकतो.

४ उ. नृत्‍यातील आनंद घेण्‍याची प्रत्‍येक व्‍यक्‍तीची पद्धत निराळी असणे : नृत्‍य ‘समे’वर आले, तर जाणकार प्रेक्षक आनंदाने टाळ्‍या वाजवतील; पण अध्‍यात्‍मातील व्‍यक्‍ती टाळ्‍या वाजवणार नाहीत. त्‍यांची नृत्‍यातील आनंद घेण्‍याची पद्धत वेगळी असते. प्रत्‍येकाच्‍या अभ्‍यासानुसार त्‍याला संगीतातील अनुभूती येते.

५. नृत्‍यात घुंगरू बांधण्‍याची पद्धत का आली ?

५ अ. घुंगराच्‍या नादाने वाईट शक्‍ती निघून जात असल्‍यामुळे नृत्‍यात घुंगरू बांधले जाणे : ‘नृत्‍यात घुंगरू वादनाची पद्धत का आली ?’, याविषयी एक कथा आहे, ‘शंकर-पार्वती यांना नृत्‍य करतांना पाहून श्री गणेशाला नृत्‍य करण्‍याची इच्‍छा झाली. तेव्‍हा तो लहान असल्‍यामुळे त्‍याचे पाय दुखतील; म्‍हणून पार्वतीने त्‍याला कौतुकाने उचलून घेतले. पार्वती श्री गणेशाला उचलून घेतांना श्री गणेशाने पाय झटकले. तेव्‍हा त्‍याच्‍या पायातील वाळ्‍याचे (लहान मुलांना पायात घालत असलेला चांदीचा घुंगरू असलेला दागिना ) नुपूर (घुंगरू) पडले. त्‍या घुंगरात ‘नुपूर’ नावाचा राक्षस होता. त्‍याचा वध करण्‍यासाठी श्री गणेश पाय झटकत होता. तेव्‍हापासून वाईट शक्‍ती निघून जाण्‍यासाठी घुंगरांचा नाद केला जातो.’

याचा अर्थ, ‘आंतरिक सुख मिळवण्‍यासाठी आणि अंतरातील कलुषित विचार (वाईट शक्‍ती) घालवण्‍यासाठी नृत्‍यसाधना करायला हवी.’

६. आध्‍यात्मिक साधनेविषयी व्‍यक्‍त केलेले विचार

अ. देवापुढे बसून ध्‍यान किंवा नामजप केल्‍याने त्‍यातून आपल्‍यात सकारात्‍मक स्‍पंदने निर्माण होतात.

आ. स्‍वतःमधील स्‍वभावदोष काढल्‍याविना देव मिळणार नाही.

इ. ‘संसार करणे चुकीचे नाही; पण त्‍यात तुम्‍ही किती अडकता ?’, हे पहाणे आवश्‍यक आहे.’

– सौ. रूपाली देसाई (पीएच्.डी. कथ्‍थक), दादर, मुंबई. (६.९.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.