राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल
पणजी, ११ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यात वर्ष २०११ ते जून २०२३ या कालावधीत ३ सहस्र २८६ लोकांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातून उघडकीस आली आहे.
(सौजन्य : Dainik Gomantak TV)
संपूर्ण भारतात आत्महत्येचे प्रमाण १६.३ टक्के आहे, तर देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात आत्महत्येचे प्रमाण सर्वांत अल्प म्हणजे ४.६ टक्के आहे; मात्र लहानश्या गोव्यात ही आकडेवारी चिंताजनक आहे. देशात अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि मणीपूर येथे आत्महत्येच्या घटना सर्वाधिक घडतात, तर गोव्यासह केरळ आणि तेलंगाणा राज्यांमध्ये हे प्रमाण अल्प आहे. मानसिक आरोग्याची समस्या, नैराश्य, वैवाहिक कलह, प्रेम प्रकरण, आर्थिक हानी, मद्यपानाचे व्यसन, अमली पदार्थाच्या आहारी जाणे आणि काही प्रमाणात बेरोजगारी या कारणांमुळे आत्महत्या करण्यात आल्या आहेत. आत्महत्या करणार्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण अधिक आहे.
शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक !सध्या प्रतिदिन होणार्या आत्महत्या हे जीवनातील नैराश्य, संकट, कसोटीचे क्षण, तणावाचे प्रसंग यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आत्मबळ देण्यास सध्याची शिक्षणप्रणाली, समाजरचना आणि संस्कार अपयशी ठरल्याचेच द्योतक आहे. जीवनातील ८० टक्के दुःखांची मूळ कारणे ही आध्यात्मिक असून त्यांच्यावर केवळ आध्यात्मिक उपायांनी म्हणजेच साधनेने मात करता येते, असे अध्यात्मशास्त्र सांगते. साधनेमुळे प्राप्त होणार्या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. साधनेमुळे केवळ मनाची एकाग्रता साधते असे नव्हे, तर मनःशांतीही मिळते. ‘प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे’, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते. एवढेच नव्हे तर जिद्द, चिकाटी यांसारखे गुण निर्माण होऊन ध्येयपूर्तीसाठी ईश्वरी अधिष्ठान लाभून यशप्राप्तीही होते. त्यामुळे साधना हेच सर्व प्रश्नांवरील अंतिम उत्तर ठरते. त्यामुळे शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण, साधना इत्यादी गोष्टींचा समावेश असणे अत्यावश्यक ठरते. |