मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उज्जैन येथे श्री महाकालेश्वराचे घेतले दर्शन !

गोव्यातील जनतेचे आरोग्य आणि भरभराट यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी श्रींच्या चरणी केली प्रार्थना !

पणजी, ११ सप्टेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रावण सोमवारच्या निमित्ताने उज्जैन, मध्यप्रदेश येथील श्री देव महाकाल मंदिरात उत्तररात्री २ वाजता झालेल्या भस्म आरतीत सहभाग घेतला आणि नंतर मंदिरात अभिषेक केला. गोव्यातील जनतेचे आरोग्य आणि भरभराट यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी श्रींच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी त्यांच्यासमवेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ. दिव्या राणे आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक उपस्थित होते.

पोर्तुगीज, मोगल आणि इंग्रज हे सनातन धर्म संपवू शकले नाहीत, ते ‘इंडिया’ आघाडीतील सदस्य करणार का ? – मुख्यमंत्री डॉ. सावंत

‘इंडिया’ आघाडीतील सदस्यांनी सनातन धर्माविषयी अपशब्द वापरले आहेत. पोर्तुगीज, मोगल आणि इंग्रज गोव्यात जे काम शतकानुशतके करू शकले नाहीत, ते काम ‘इंडिया’ आघाडीतील सदस्य करू पहात आहेत. धर्मांतराचा उद्देश घेऊन पोर्तुगीज गोव्यात आले; परंतु त्यांना यामध्ये पूर्ण यश आले नाही आणि ‘इंडिया’ आघाडीही हे करू शकणार नाही.

या आघाडीला हाकलून लावणेच योग्य ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत हे होणारच आहे. मागील ७० वर्षांत न झालेली कामे मोदी सरकारने केलेली आहेत. गोवा राज्य समान नागरी संहितेचे पालन करत आहे आणि आता हे स्वीकारण्यासाठी इतर राज्येही पुढे येत आहेत. गोव्यातील ख्रिस्ती लोक चांगल्या नोकरीच्या शोधात विदेशात जात आहेत, तरी हा ख्रिस्ती समुदायाचा स्थलांतराचा प्रश्न नाही, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी इंदूर, मध्यप्रदेश येथे भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत बोलतांना व्यक्त केले.