आज स्वामी वरदानंद भारती यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
१. महाभारतात द्रौपदीने धर्मराजाला विचारले, ‘कौरव अधर्माने वागतात, तरी सुख भोगतात. तुम्ही मात्र धर्माचरण करून दुःख भोगता. धर्माचरणाचे हेच फल का ?’ त्यावर धर्मराजाने उत्तर दिले, ‘मी व्यापार म्हणून धर्माचरण करत नाही. धर्माचरण इष्ट आणि कर्तव्य आहे म्हणून करतो.’ धर्माराजाचे हे उत्तर चिंतनीय आणि अनुकरणीय आहे.
२. धर्मस्थापनेसाठी करावे लागणारे राजकारण कुशलतेने करावे लागते. त्याचा महान आदर्श श्रीकृष्णाने आपल्या वर्तनाने निर्माण केला आहे. ‘दुष्ट घातकी दुर्जनांशी ‘जशास तसे’ हीच नीती’, हे लक्षात न ठेवल्यामुळेच आपल्या राष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे.
३. परंपरागत धारणांनी काही प्रमाणात प्रभावी असलेला हिंदू समाज अद्यापही बहुसंख्येने नांदत असल्यामुळे निरनिराळ्या पक्षाचे शासन काही काळ आले; पण ते रक्तरंजित झालेले नाही. सत्तालोलुप शासनकर्ते अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी धर्मनिरपेक्षतेचा उद़्घोष करत असले, तरी तेही हिंदू अजूनही मोठ्या प्रमाणात बहुसंख्य असल्यानेच शक्य होत आहे. तरुण पिढीचे योग्य प्रबोधन झाले, तर भवितव्य निश्चितपणेच उज्ज्वल होईल. श्रीकृष्णाचे जीवन त्यासाठी उत्तम मार्गदर्शन करणारे आहे.
४. सामान्य माणसे प्रापंचिक उपाधी वाढवतात. त्यांना ती गोष्ट आवश्यक वाटते आणि ‘हे कशाला ?’, असे म्हणून ते परमार्थाकरता कराव्या लागणार्या कंटाळा करतात, तिथे त्यांना साधेपणाचे महत्त्व पटत असते. संतांचे नेमके उलट असते.
– ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती