मी भारतीय वंशाचा असल्याचा मला गर्व ! – पंतप्रधान ऋषी सुनक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सपत्निक अक्षरधाम मंदिरात जाऊन घेतले दर्शन !  

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सपत्निक अक्षरधाम मंदिरात पूजा करताना

नवी देहली – ‘जी-२०’ परिषदेसाठी भारतात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या पत्नी अक्षता यांच्यासमवेत येथील अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच पूजा केली. सुनक यांनी भूमीवर डोके टेकवून देवाला नमस्कार केला. या दांपत्याने येथे आरतीही केली. ते सकाळी १०.३० वाजता येथे पोचले होते. ते येथे ४५ मिनिटे थांबले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी ट्वीट करून म्हटले की, मला मी भारतीय वंशाचा आणि भारताशी विशेष नाते असल्याचा गर्व आहे. एक गर्व असलेल्या हिंदूचा अर्थ आहे की, भारत आणि भारतातील लोक यांच्याशी माझे संबंध नेहमीच रहातील.

यापूर्वी सुनक यांनी म्हटले होते की, मला मी हिंदु असल्याचा गर्व आहे. या मार्गाने माझे पालनपोषण झाले आणि मी असाच आहे. मी रक्षाबंधन साजरे केले. वेळेअभावी जन्माष्टमी साजरी करता आली नाही; पण मंदिरात जाऊन याची भरपाई होईल, अशी आशा आहे. विश्‍वासच आपल्याला शक्ती देतो.