श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलाखतीद्वारे उलगडलेली सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, वय ८८ वर्षे) यांची ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया !

श्रीमद्भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू आणि सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांची गुणवैशिष्ट्ये उलगडणार्‍या ‘पू. अनंत आठवले यांचे चरित्र : खंड १ (पू. अनंत आठवले यांची गुणवैशिष्ट्ये)’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन ५.१०.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पू. अनंत आठवले यांची त्यांना मिळणार्‍या ज्ञानाविषयी मुलाखत घेतली.

आज निज श्रावण कृष्ण एकादशी (१० सप्टेंबर २०२३) या दिवशी पू. अनंत आठवले यांचा ८८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ही मुलाखत येथे देत आहोत.

पू. अनंत आठवले यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार

१. ‘एखादा विषय स्पष्ट केला पाहिजे’, असे वाटल्यावर पू. भाऊकाकांनी त्यावर लिहिणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : तुमचे ग्रंथ, म्हणजे ज्ञानच आहे. तुम्ही विचार स्पष्ट झाल्यावर लिहिता कि कसे असते ?

पू. अनंत आठवले : एखाद्या गोष्टीविषयी लिहायचे ठरवून मी कधीच काही लिहिले नाही. ‘एखादा विषय स्पष्ट केला पाहिजे’, असे मला वाटले की, मी लिहितो.

प्रारंभापासून आतापर्यंतचे माझे सर्व लेख अतिशय संक्षिप्त आहेत. त्यामुळे ते लोकांच्या लक्षात येत नाहीत. ‘ते अधिक विस्तृत लिहायला हवे होते’, असे मला वाटते. मी आता म्हटले, ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म ।’ (तैत्तिरीयोपनिषद्, ब्रह्मवल्ली, अनुवाक १) म्हणजे ‘ब्रह्म हे सत्य, ज्ञानस्वरूप आणि अनंत आहे.’ यातील ‘सत्य काय आहे ? ज्ञान काय आहे आणि अनंतत्व काय आहे ?’, हे पुन्हा समजवावे लागते. सत्याचे स्वरूप ज्ञान, ब्रह्म अणि अनंतत्व आहे.

१ अ. ‘अनंतत्वा’विषयी केलेले विवरण : अनंतत्व ३ प्रकारचे असते – देशतः, वस्तूतः आणि कालतः. देश म्हणजे स्थान. ईश्‍वराचे स्थान अनंत आहे. त्याला कोणतीही सीमा नाही. वस्तूतः जेव्हा तो ब्रह्मांडाच्या माध्यमातून व्यक्त होतो, तेव्हा त्याची संख्या अमर्याद असते. जर आपण समुद्रकिनारी केवळ वाळूचे कण मोजायचे म्हटले, तर आपले संपूर्ण आयुष्य संपून जाईल; पण आपण ते मोजू शकणार नाही. विश्‍व आणि संपूर्ण ब्रह्मांड अनंत आहे. कालतः म्हणजे त्याला काळाची सीमा नाही. ‘ब्रह्म एवढ्या काळापुरते राहील आणि त्यानंतर समाप्त होईल’, असे नाही. अनंतत्व ३ प्रकारचे असते. त्याप्रमाणे प्रत्येक वस्तू समजून घ्यावी लागते.

२. ‘धर्म म्हणजे काय आहे ?’, यावर लिहिण्याचा विचार केल्यावर त्याविषयीची सूत्रे टप्प्याटप्प्याने स्फुरत जाणे आणि ती पूर्ण लिहून झाल्यावर त्यांत कोणताही पालट करावा न लागणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : पू. भाऊकाकांनी सांगितले आहे, ‘मला आधी अर्थ स्पष्ट होतो आणि नंतर ते लिहितो.’ मी ज्ञानाचे लिखाण करत असतांना मला लिहिता लिहिता आतून अर्थ समजायचा. ईश्‍वर अनेक स्वरूपांत ज्ञान देतो. आपल्या ज्ञानाचे स्वरूप किती नानाविध आहे ना !

पू. अनंत आठवले : धार्मिक संस्था धर्म शिकवतात; मात्र त्यांतील कुणालाही धर्माचा अर्थ ठाऊक नाही. मी ‘धर्म म्हणजे काय आहे ?’, यावर लिहिण्याचा विचार केला. तेव्हा ३ – ४ सूत्रे माझ्या मनात आली. त्यानंतर योगायोगाने मला विदेशात (ऑस्ट्र्रेलियाला मुलाकडे) जावे लागले. तेथे मला आणखी सूत्रे सुचली आणि मी लिहिणे चालू केले. प्रथम सूत्र लिहीत असतांनाच दुसरे सूत्र बुद्धीमध्ये आले. मी ते लिहिले. नंतर मला तिसरे सूत्र सुचले, चौथे सूत्र सुचले. असे करता करता मी लिहीत गेलो. ही सूत्रे लिहिल्यानंतर त्यांत कोणताही पालट करावा लागला नाही.

३. ज्ञान मिळो अथवा ना मिळो, मनाची स्थिती सारखीच असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : आम्हाला जे सुचते, ते आम्ही लिहून ठेवत असतो. आम्ही कुठेही असलो, तरी आम्हाला विचार सुचत असतात. कधी सुचले नाही, तर आम्ही ईश्‍वराला प्रार्थना करतो आणि तो ज्ञान देतो. हे सर्व ईश्‍वर आमच्याकडून आपोआप करवून घेतो. यालाच ‘ज्ञान’ म्हणतात.

पू. अनंत आठवले : मी ईश्‍वराला प्रार्थनाही करत नाही.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : ‘ज्ञानाचे लिखाण करत असतांनाची मनाची स्थिती आणि लिखाण करत नसतांनाची मनाची स्थिती’, यांत काही भेद असतो का ?

पू. अनंत आठवले : तसे नसते. ज्ञान मिळो अथवा ना मिळो, मनाची स्थिती सारखीच असते.

४. २६ – २७ वर्षांपूर्वी ज्ञान मिळवतांना पू. भाऊकाकांना त्रास होणे

पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्याशी संवाद साधून पू. काकांच्या ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया समजून  घेतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : जेव्हा आम्हाला ज्ञान मिळते, तेव्हा कधी आमच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होते. त्यामुळे आम्हाला ‘मन असमाधानी असणे, डोके दुखणे’, असे त्रास होतात. आपणही कधी असे अनुभवले आहे का ? ‘शरीर आणि मन अस्वस्थ आहे, तरीही ज्ञान मिळत आहे; तसेच ज्ञान मिळत असतांना मनाची विचलित अवस्था आहे’, अशी स्थिती आपण अनुभवली आहे का ?

पू. अनंत आठवले : २६ – २७ वर्षांपूर्वी ज्ञान मिळवतांना मलाही त्रास झाले होते.

५. क्रमाने एकेक ग्रंथ वाचतांना मनातील एकेका प्रश्‍नाचे उत्तर मिळत जाणे

पू. अनंत आठवले : सेवानिवृत्त झाल्यावर मी ‘ब्रह्म म्हणजे काय ? ईश्‍वर म्हणजे काय ?’, हे जाणून घेण्याचा निश्‍चय केला होता. तेव्हा माझ्याकडे उपनिषदे, योगवासिष्ठ, गीता, दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्‍वरी, हे ग्रंथ होते. तेव्हा मी ठरवले, ‘केवळ हेच ग्रंथ वाचायचे. इतर काहीही वाचायचे नाही आणि काही करायचेही नाही.’ त्या वेळी माझ्या मनात काही प्रश्‍न होते. जेवढे मला आज कळते, तेवढे तेव्हा समजत नव्हते. जेव्हा मला पहिला प्रश्‍न पडला, तेव्हा मी ‘कोणता ग्रंथ प्रथम वाचायचा ?’, हे ठरवले नव्हते. योगायोगाने मी पहिला ग्रंथ वाचला आणि त्यातून मला पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर समजले. त्यानंतर माझ्या मनात दुसरा प्रश्‍न आला. तेव्हा मी दुसरा ग्रंथ वाचला. त्यातून मला दुसर्‍या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. असे लागोपाठ ९ वेळा झाले. मला माझ्या शेवटच्या प्रश्‍नाचेही उत्तर मिळाले. ‘काळाचे स्वरूप काय आहे ?’, हा माझा शेवटचा प्रश्‍न होता. या प्रश्‍नाचे उत्तर मला ‘भागवत पुराण’ या ग्रंथामध्ये मिळाले. मी हा ग्रंथ शेवटी वाचायला घेतला होता.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : या ग्रंथांची नावेही तुम्हाला आतूनच स्फुरत होती का ?

पू. अनंत आठवले : नाही. मी क्रमाने एकेक ग्रंथ वाचत गेलो. ‘काळाचे स्वरूप काय आहे ?’, हा प्रश्‍न माझ्या मनात राहिला. तेव्हा मी ‘भागवत पुराण’ वाचणे चालू केले. त्यात मला माझ्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. ‘गुणव्यतिकराकारो कालः ।’, म्हणजे ‘गुणांमध्ये परिवर्तन हे काळाचे स्वरूप आहे’, असे ते उत्तर होते. हे उत्तर मला शब्दांमध्ये समजले; पण काळाचे स्वरूप समजले नव्हते. नंतर मी विचार करत राहिलो. नंतर मला वाटले, ‘हे ज्ञान आपल्या आवाक्यातील गोष्ट नाही. हे सोडून देऊया. भक्तीयोग सोपा मार्ग आहे’, असे सर्व जण म्हणतात, तर भक्तीच करूया.’ मी नामजप करत राहिलो; परंतु चित्तामध्ये शांती नव्हती. तिसरा दिवस उजाडला. मला प्रश्‍नाचे उत्तर मिळाले नाही. तेव्हा मला वाटले, ‘भक्ती ही माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही.’ मला उत्तर तर पाहिजे होते. ग्रंथात होते, ‘गुणव्यतिकराकारो कालः ।’, तर ‘गुणांमध्ये व्यतिकार (परिवर्तन) करून काळ मिळतो का ?’, ते पाहूया. मी तसे करून पाहिले आणि मला काळ मिळाला. (स्वभावदोष दूर केल्यावर कालातीत होतो.)

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : किती दिवसांनी काळ मिळाला ?

पू. अनंत आठवले : तिसर्‍या दिवशी मिळाला ! ही प्रक्रिया फार जुनी झाली. त्या वेळी उत्तर मिळण्यासाठी मला चिंतन करावे लागले. आता मला विचार करावा लागत नाही.

६. चैतन्याच्या कृपेने अध्यात्मशास्त्रातील गोष्टी लक्षात रहाणे; मात्र व्यवहारात वयोमानाप्रमाणे विस्मृती होणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : ‘ज्ञान मिळणे’, ही ईश्‍वरी बुद्धी तर आहेच; पण तुम्हाला श्‍लोक जसेच्या तसे पाठ आहेत. तुम्ही व्यावहारिक जीवनातही एकपाठी होता का ?

पू. अनंत आठवले : श्‍लोकांचे महत्त्व माझ्या मनावर बिंबले आहे. त्यामुळे ते माझ्या लक्षात राहिले आहेत. सहस्रो श्‍लोक आहेत; पण ते मनावर बिंबल्याने माझ्या लक्षात राहिले. वयोमानाने विस्मृती होते; परंतु त्या चैतन्याच्या कृपेने मी अध्यात्मशास्त्रातील गोष्टी विसरलो नाही. इतर गोष्टी माझ्या लक्षात रहात नाहीत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : गुरुदेवांनी आम्हाला शिकवले होते की, ईश्‍वरी बुद्धीने कार्य करणार्‍यांना स्मृतीभ्रंश होत नाही. याचे पू. भाऊकाका साक्षात् उदाहरण आहे.

७. सदैव समाधी अवस्थेत रहाता न येणे; परंतु ज्ञानप्राप्ती झाली की, ज्ञान सदैव समवेत रहाणे

पू. अनंत आठवले : समाधी लागत नाही; म्हणून लोकांना दुःख होते. समाधी ही एक अवस्था आहे. तुम्ही कितीही निर्विचार किंवा निर्विकल्प समाधी लावली, तरी तुम्ही जेव्हा व्यवहारात परत येता, तेव्हा त्यात खंड पडतो. ज्ञानाचे तसे नाही. एकदा तुम्हाला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान झाले की, ते ज्ञान सदैव तुमच्या समवेत रहाते. ते स्थायी होऊन जाते. समाधी स्थायी (कायमची) रहात नाही. देवपूजा स्थायी रहात नाही. ज्ञान जीवात्म्यामध्ये बिंबल्यामुळे ते स्थायी झाले आहे.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.