१. १०.५.२०२३ या दिवशी आलेल्या अनुभूती
१ अ. ‘रथामध्ये आरूढ झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्मरण करतांना ते सतत साधकांसमवेत आहेत’, असे जाणवणे : ‘सकाळपासून माझे मन स्थिर होते आणि ‘या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथामध्ये बसलेले असतांना कसे दिसतील ?’, याची कल्पना करत मी दिवसभर भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी ‘प्रत्येक क्षणी गुरुदेव आमच्या समवेत आहेत’, याची अनुभूती मला सतत येत होती.
१ आ. रथ ओढण्याचा सराव करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीही रथ ओढल्यामुळे साधकांकडून रथ ओढण्याची सेवा भावपूर्ण होणे : पटांगणात रथ ओढण्याचा सराव करत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी माझ्या हातातील दोरी घेऊन ‘आम्हीही ओढतो’, असे म्हटले. त्या आमच्या हातातील दोरी घेऊन आमच्या पुढे होत्या आणि आम्ही त्यांच्या मागे राहून रथ ओढत होतो. त्या वेळी माझे मन त्यांच्या चरणी शरण गेले आणि ‘साक्षात् दोन देवींना समोर बघून माझा जन्म धन्य झाला आहे’, या विचाराने मला कृतज्ञता वाटत होती. साक्षात् देवींनी रथाला हात लावल्यामुळे रथाचे वजनही पूर्णपणे हलके झाले होते आणि परत रथ ओढतांना माझे मन उत्साही अन् कृतज्ञताभावात होते. ‘गुरूंसाठीच माझा जन्म आहे’, याची मला जाणीव होऊन रथ ओढण्याची सेवा भावपूर्ण झाली.
२. ११.५.२०२३ या दिवशी आलेल्या अनुभूती
२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना रथात बसलेले पाहून ‘त्यांच्या दर्शनाविना दुसरे काहीच नको’, असे वाटणे : ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून माझे मन गुरुदेवांना बघण्यासाठी आतूर झाले होते. ‘मी कधी एकदा माझ्या गुरूंना बघणार ? आणि ते बसलेला रथ कधी ओढणार ?’, याची मी वाट पहात होतो. शेवटी तो क्षण जवळ आला आणि साक्षात् श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेवांना रथात बसलेले पाहून माझे मन पूर्णपणे त्यांच्या चरणी समर्पित झाले. त्यांना पहाता क्षणी ‘या जिवाला त्यांच्या दर्शनाविना काहीच नको’, असे वाटून माझे मन कृतज्ञताभावात होते.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथात बसण्यापूर्वीच्या वातावरणाची अनुभूती यापूर्वी घेतलेली नसणे : ‘प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण भूतलावर येतांनाचे वातावरण कसे होते ?’, हे मला ठाऊक नाही; पण गुरुदेव रथात बसण्याच्या आधीच्या वातावरणाची अनुभूती मला घेता आली. ही अनुभूती मी यापूर्वी कधीच घेतलेली नव्हती.
२ इ. रथात विराजमान झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून भावजागृती होणे : ‘रथात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना विराजमान झालेले पाहून ‘त्यांच्या चरणी माझे सर्वस्वही अर्पण केले, तरी ते अल्पच पडणार’, असे मला वाटले. ‘त्यांच्यासाठी मी काहीच करत नाही, तरीही देवाने मला त्यांच्या चरणाजवळ घेतले’, याची माझ्या मनाला जाणीव झाली आणि माझी भावजागृती झाली.
२ ई. ‘रथोत्सव वैकुंठधामात होत आहे’, या विचाराने मन आनंदित होणे : ‘शंखनाद झाल्यावर वैकुंठातील ऋषिमुनी आणि देवता साधकांच्या रूपात आल्या आहेत’, असे मला वाटले. ‘रथोत्सव वैकुंठधामात होत आहे’, असे मला वाटले आणि मन आनंदित झाले.
२ ए. रथाचे पहिले चाक पुढे येताक्षणी ‘संपूर्ण ब्रह्मांड चैतन्याने भारित झाले आहे आणि आतापर्यंत सनातनमध्ये साधना करणारे साधक, संत, सद्गुरु, धर्मप्रेमी आणि भविष्यात होणारे सर्व साधक यांना प्रथम पावलाने गुरुदेवांनी भरभरून चैतन्य प्रदान केले’, असे मला वाटले.
२ ऐ. रथाचा पहिला फेरा पूर्ण झाल्यावर गुरुदेवांना व्यासपिठाच्या दिशेने घेऊन जात असतांना ‘साक्षात् श्री गुरूंना रथातून खाली उतरवून सिंहासनावर बसवून मी त्यांची आरती करत आहे आणि गुरूंविना जीवन अपूर्ण आहे’, याची मला जाणीव झाली.
गुरुदेवांनी या अनुभूती दिल्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राजेश दोंतुल (वय २० वर्षे), रामनाथी आश्रम, फोंडा, गोवा. (१६.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |