हरितालिका व्रत भावपूर्ण केल्याने पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘फोंडा, गोवा येथील सौ. शकुंतला आत्माराम जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी त्यांच्या निवासस्थानी भाद्रपद शुद्ध तृतीयेला (१२.९.२०१८ या दिवशी) ‘हरितालिका व्रत’ केले. श्री. सिद्धेश करंदीकर यांनी पूजाविधीचे पौरोहित्य केले. ‘हरितालिका व्रत केल्याचा पूजकाला (सौ. शकुुंतला जोशी यांना), तसेच त्या व्रताचा पूजाविधी सांगणार्‍या पुरोहितांना (श्री. सिद्धेश यांना) आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी सौ. जोशी यांच्या निवासस्थानी पूजनस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

सौ. शकुुंतला जोशी यांनी केलेल्या पूजनाच्या मांडणीचे छायाचित्र

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत हरितालिका-पूजनाची मांडणी, पूजक (सौ. शकुुंतला जोशी) आणि पुरोहित (श्री. सिद्धेश करंदीकर) यांच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१ अ. पूजनानंतर श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे : श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यामध्ये आरंभी अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. (त्यांच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) पूजनानंतर श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ आ. हरितालिका-पूजनाची मांडणी आणि सौ. शकुुंतला जोशी यांच्यामध्ये पूजनापूर्वी अन् पूजनानंतर नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

१ इ. पूजनानंतर हरितालिका-पूजनाची मांडणी,सौ. शकुंतला जोशी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

टीप – श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यामध्ये पूजनापूर्वी अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ नव्हती. (त्यांच्या संदर्भात ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला.)

सौ. मधुरा कर्वे

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. हरितालिका व्रत : ‘पार्वतीने हे व्रत करून शिवाला प्राप्त करून घेतले; म्हणून मनासारखा वर मिळण्यासाठी, तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करतात. त्या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आणून त्या शिवलिंगासह पुजल्या जातात, रात्री जागरण करतात, दुसर्‍या दिवशी सकाळी उत्तरपूजा करून लिंंग आणि मूर्ती विसर्जित करतात.’

(संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे (१६.८.२०१९)

२ आ. पूजनाची मांडणी भावपूर्ण आणि धर्मशास्त्रानुसार असल्याने पूजनापूर्वीच तिच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूजक आणि पुरोहित यांच्या तुलनेत अधिक असणे

२ आ १. पूजन होण्यापूर्वी पूजनाच्या मांडणीचे साधकांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

अ. ‘पूजनाच्या मांडणीत ठेवलेल्या पार्वतीदेवी आणि तिची सखी यांच्या मूर्तींकडे पाहून माझी भावजागृती झाली.’ – सौ. प्रियांका गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर), डोंबिवली.

आ. ‘पूजनाच्या मांडणीची रचना धर्मशास्त्रानुसार असल्याने तिच्याकडे ईश्‍वरी चैतन्य १० टक्के अधिक प्रमाणात आकृष्ट आणि प्रक्षेपित होते.

इ. सर्वसाधारणतः पूजनाच्या मांडणीच्या रचनेतून कनिष्ठ ईश्‍वरी शक्ती (पृथ्वीतत्त्व) लहरींच्या स्वरूपात प्रक्षेपित होते; पण

सौ. जोशी यांनी पूजनाची मांडणी भावपूर्ण केली असल्याने, त्यातून तुलनेत उच्च ईश्‍वरी शक्ती (आपतत्त्व) वलयाच्या स्वरूपात सर्वत्र प्रक्षेपित होत होती.’

–  श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (वर्ष २०२३ ची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०१८)

२ आ २. भावपूर्ण आणि धर्मशास्त्रानुसार केलेल्या पूजनाच्या मांडणीतून पूजनापूर्वीच चैतन्य प्रक्षेपित होणे : पूजनाच्या मांडणीत निर्जीव वस्तूंचा उपयोग केला जातो. निर्जीव वस्तूंमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही. असे असूनही पूजनाची मांडणी भावपूर्ण, तसेच धर्मशास्त्रानुसार केल्याने तिच्यात पूजनापूर्वीच पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण झाल्याचे सूक्ष्म परीक्षण आणि वैज्ञानिक चाचणी यांतून लक्षात येते. वर्तमानकाळात पूजनाच्या मांडणीची रचना धर्मशास्त्रानुसार करण्यास दुय्यम स्थान देऊन, हवी तशी रचना केली जाते. त्यामुळे पूजनाच्या मांडणीतून चैतन्य प्रक्षेपित होत नाही किंवा ते अत्यल्प होते. याउलट अयोग्य मांडणीतून रज-तमात्मक स्पंदने प्रक्षेपित होऊ शकतात. भावपूर्ण पूजनाच्या मांडणीचा लाभ केवळ उपासक आणि पुरोहित यांनाच नाही, तर वास्तू, वायूमंडल, घरातील अन्य कुटुंबीय सर्वांनाच होतो. त्यामुळे पूजनाची मांडणी भावपूर्ण आणि धर्मशास्त्रानुसार करणे महत्त्वाचे आहे.

२ इ. सौ. शकुंतला जोशी यांनी हरितालिका पूजनाची सर्व सिद्धता भावपूर्ण करणे : सौ. शकुंतला जोशी यांनी हरितालिका पूजनाची सर्व सिद्धता भावपूर्ण केली. त्यांनी पूजेची मांडणीही सात्त्विक पद्धतीने केली, तसेच पूजेच्या वेळी पुरोहितांनी सांगितलेल्या धार्मिक कृती भावपूर्ण केल्या. त्यामुळे पूजनस्थळी चैतन्य निर्माण झाले. पूजनाच्या मांडणीच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पूजनानंतर वाढ झाल्याचे दिसून आले. यातून पूजेची सिद्धता सात्त्विक पद्धतीने करणे, तसेच भावपूर्ण पूजनाचे महत्त्व लक्षात येते.

२ ई. सौ. शकुंतला जोशी यांनी हरितालिका व्रत भावपूर्ण केले. त्यांनी पूजेतील चैतन्य ग्रहण केल्याने पूजनानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

२ उ. श्री. सिद्धेश करंदीकर यांनी पूजाविधीचे पौरोहित्य शास्त्रशुद्ध आणि भावपूर्ण करणे : श्री. सिद्धेश करंदीकर यांनी पूजाविधीचे पौरोहित्य शास्त्रशुद्ध आणि भावपूर्ण केले. त्यांनी पूजेतील चैतन्य ग्रहण केल्याने पूजनानंतर त्यांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली. यातून ‘पौरोहित्य भावपूर्ण केल्यास ते केवळ उपजीविकेचे साधन रहात नसून, त्यातून ‘साधना’ होते’, हे लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.८.२०१९)

इ-मेल : mav.research२०१४@gmail.com