परिस्थिती पाहून निर्णय घेईपर्यंत धीर धरण्याचा तालिबानचा सल्ला !
काबूल (अफगाणिस्तान) – आमच्या समाजालाही स्त्री शिक्षणाची आवश्यकता आहे. आम्ही या सूत्रावर काम करत आहोत; मात्र परिस्थिती पाहूनच कोणताही निर्णय घेतला जाईल. त्यामुळे धीर धरा, अशा शब्दांत अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (ओआयसीच्या) शिष्टमंडळाला सांगितले आहे. सध्या हे शिष्टमंडळ अफगाणिस्तानच्या दौर्यावर आहे. अफगाणिस्तान या संघटनेचा सदस्य असल्याने या संघटनेने तालिबान सरकारवर या वेळी महिलांना शिक्षण देणे चालू करण्यासाठी दबाव टाकला. त्यावर तालिबानने वरील अधिकृत विधान असलेले निवेदन प्रसारित केले आहे. या प्रकरणी तालिबान सरकार आणि ओआयसीचे शिष्टमंडळ यांच्यात आतापर्यंत कोणताही करार झालेला नाही. या शिष्टमंडळात अनेक धार्मिक नेत्यांचा समावेश आहे.
अफगाणी विद्यार्थिनींची तालिबान सरकारवर टीका
अफगाणिस्तानच्या विद्यार्थिनींनी तालिबान सरकारचे निवेदन फेटाळून लावले आहे. त्या म्हणाल्या की, अजून किती धीर धरायचा ? अशा निर्बंधांना आम्ही कंटाळलो आहोत. मुलींना शिक्षण देणार्या सर्व संस्था जवळपास २ वर्षांपासून बंद आहेत. जेव्हा आम्ही तालिबान सरकारशी याविषयी बोललो, तेव्हा त्यांनी लवकरच शाळा आणि महाविद्यालये चालू करण्याचे आश्वासन दिले; परंतु आजपर्यंत तसे झाले नाही.
संपादकीय भूमिका‘इस्लामी देशांच्या संघटनेचेही न ऐकणारा तालिबान कोणते इस्लामी राज्य चालवत आहे ?’, असा प्रश्न जगाला पडतो ! ‘या संघटनेने तालिबान सरकारला मान्यता देऊच नये’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरणार नाही ! |