कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यास विरोध !

वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर

पुणे – संरक्षण संशोधन आणि विकास संस्‍थेचे संचालक, तसेच वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्‍तानी गुप्‍तचर यंत्रणेला पाठवलेली माहिती गोपनीय नाही. संबंधित माहिती सार्वजनिक संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे, असा दावा कुरुलकरांचे अधिवक्‍ता ऋषिकेश गानू यांनी विशेष न्‍यायालयात केला. सुनावणी दरम्‍यान संबंधित माहिती प्रसारित झाल्‍यास देशाच्‍या सार्वभौमत्‍वाला हानी पोचू शकते. त्‍यामुळे कुरुलकर प्रकरणाची सुनावणी बंद खोलीत घेण्‍यात यावी, असा अर्ज राज्‍य आतंकवादविरोधी पथकाने विशेषण न्‍यायालयात दिला होता; मात्र या अर्जास अधिवक्‍ता गानू यांनी विरोध दर्शवला.

कुरुलकर यांच्‍या अन्‍वेषणात मिळालेली माहिती आणि ए.टी.एस्.ने न्‍यायालयात सादर केलेली कागदपत्रे मिळावीत असा अर्ज बचाव पक्षाचे अधिवक्‍ता ऋषिकेश गानू यांनी न्‍यायालयात दिला, त्‍याला सरकारी अधिवक्‍ता विजय फरगडे यांनी विरोध दर्शवला. पुढील सुनावणीवेळी कायदेशीर तरतुदींअन्‍वये बचाव पक्षाला गोपनीय कागदपत्रे सादर केली जातील, असे लेखी म्‍हणणे सरकारी अधिवक्‍त्‍यांंनी न्‍यायालयात सादर केले आहे. या प्रकरणाची पुढील जुनावणी ८ सप्‍टेंबर या दिवशी होणार आहे.