‘अमृत कलश’ यात्रेतून घराघरांत राष्‍ट्रभक्‍तीची भावना जागृत होईल ! एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

राज्‍यातून ३८७ ‘अमृत कलश’ देहलीतील अमृत वाटिकेत पाठवणार !

बैठकीत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – ‘माझी माती माझा देश’ या अभियानाच्‍या अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्‍य भावनेतून यशस्‍वी करावी. या यात्रेतून राज्‍यातील प्रत्‍येक कुटुंबात, घराघरांत राष्‍ट्रभक्‍तीची भावना जागृत होईल, असे नियोजन करण्‍यात यावे, असे निर्देश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाच्‍या समारोपासाठी आयोजित नवी देहलीतील कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातून ३५१ आणि नागरी क्षेत्रातून प्रत्‍येक जिल्‍ह्याचे ३६ असे राज्‍यातून एकूण ३८७ कलश पाठवण्‍यात येणार आहेत. या कलशासाठी माती किंवा तांदूळ संकलनाची मोहीम ३० सप्‍टेंबरपर्यंत राबवण्‍यात येणार आहे. या अमृत कलश यात्रेविषयी बैठकीत माहिती देण्‍यात आली. बैठकीस मुख्‍य सचिव मनोज सौनिक यांच्‍यासह विविध विभागांचे सचिव उपस्‍थित होते. सांस्‍कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव त्‍याचप्रमाणे मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी या अमृत कलश यात्रेच्‍या नियोजनाविषयी सादरीकरण केले, तसेच यात्रेतील विविध टप्‍प्‍यांची माहिती दिली.

बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्‍त डॉ. आय.एस्. चहल, मुख्‍यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आदी उपस्‍थित होते. विभागीय आयुक्‍त, जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्‍त, गटविकास अधिकारी, मुख्‍याधिकारी आदी दृकश्राव्‍य संवाद प्रणालीच्‍या माध्‍यमातून सहभागी झाले होते.

मुख्‍यमंत्री शिंदे पुढे म्‍हणाले की,

१. प्रत्‍येक घर, प्रत्‍येक नागरिक, विद्यार्थी या सगळ्‍यांचा सहभाग कसा मिळेल ? यासाठी नियोजन करावे. मंत्रालयात सांस्‍कृतिक कार्य विभाग, तसेच माझ्‍या सचिवालयातूनही यावर नियंत्रण ठेवण्‍यात येणार आहे.

२. देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाची ही संकल्‍पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या पुढाकाराने राबवण्‍यात येत आहे. आता आपल्‍या स्‍वातंत्र्यसंग्रामातील हुतात्‍म्‍यांना, तसेच स्‍वातंत्र्यसैनिकांना अभिवादनाची ही संधी आहे. त्‍यामुळे अमृत कलश यात्रेच्‍या नियोजनातही महाराष्‍ट्राचे नाव अग्रक्रमाने घेतले पाहिजे, अशा पद्धतीने नियोजन करण्‍यात यावे.

अमृत कलश यात्रेविषयी… !    

अमृत कलश यात्रेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला आहे. पहिला टप्‍पा १ ते ३० सप्‍टेंबरपर्यंत प्रत्‍येक घर, वॉर्ड आणि गाव येथून माती किंवा तांदूळ कलशांमध्‍ये गोळा करायचा आहे. ग्रामीण भागातून माती आणि शहरी भागातून तांदूळ या कलशात एकत्र करण्‍यात येईल.

१ ते १३ ऑक्‍टोबरपर्यंत तालुकास्‍तरावर आणि पालिका, नगरपंचायती, नगर परिषदा यांच्‍या स्‍तरावर ही सर्व गोळा केलेली माती आणि तांदूळ एकत्र आणून एका मोठ्या कलशामध्‍ये एकत्र करण्‍यात येईल. या वेळी या संबंधित परिसरातील देशासाठी लढलेले आणि उल्लेखनीय कामगिरी केलेले सैनिक, पोलीस, स्‍वातंत्र्यसैनिक किंवा हुतात्‍म्‍यांचे कुटुंबीय यांना बोलावून त्‍यांचा गौरव करण्‍यात येईल.

२२ ते २७ ऑक्‍टोबर या कालावधीत तालुका पातळीवरचे हे कलश मुंबईत एकत्र आणण्‍यात येतील. २७ ऑक्‍टोबरला मुंबईतून विशेष रेल्‍वेने हे कलश देहलीकडे रवाना करण्‍यात येतील. त्‍या वेळीही मोठा सांस्‍कृतिक आणि देशभक्‍तीपर कार्यक्रम आयोजित करण्‍यात येईल. २८ ते ३० ऑक्‍टोबरपर्यंत देशाच्‍या राजधानीत रेल्‍वेद्वारे हे कलश वाजत गाजत पाठवण्‍यात येतील. १ नोव्‍हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते हुतात्‍मा स्‍मारकाजवळ देशाच्‍या वीरांच्‍या स्‍मरणार्थ उभारलेल्‍या ‘अमृत वाटिके’त या कलशांमधील माती विसर्जित करण्‍यात येईल.