‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांचा अनागोंदी कारभार उघड !
मुंबई, ५ सप्टेंबर (वार्ता.) – सरकारचे ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग’ यांच्याकडून मंत्रालयामध्ये ५ आणि ६ सप्टेंबर या दिवशी ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रदर्शन २०२३’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात हरित लवाद आणि ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्था’ यांनी पर्यावरणासाठी अतिशय हानीकारक घोषित केलेल्या कागदी लगद्याच्या मूर्ती ‘पर्यावरणपूरक’ म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण अन् वातावरणीय बदल विभाग यांचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे.
यापूर्वी महाराष्ट्र सरकारने वर्ष २०११ मध्ये कागदी लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन देणारी अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे तत्कालीन समन्वयक पू. शिवाजी वटकर यांनी कागदी लगद्याच्या मूर्ती अतीप्रदूषणकारी असल्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रविष्ट केली होती. यामध्ये तथ्य असल्याचे मान्य करत लवादाने सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती दिली होती.
लवादाने सरकारला दिलेल्या आदेशात ‘कागदी लगद्यापासून मूर्ती बनण्यास प्रोत्साहन देऊ नये’, असे स्पष्ट नमूद केले आहे. याविषयी लवादाने सरकारला अध्यादेशाविषयी ‘कारणे दाखवा’ नोटीसही पाठवली होती.
यावर उत्तर देतांना सरकारने याविषयी अभ्यास केला नसल्याचे मान्य केले. सरकारने हरित लवादाचे म्हणणे मान्य करत अध्यादेश मागे घेतला. त्याच कागदी लगद्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्याकडून पुन्हा प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्तीविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळामध्येच गोंधळ असल्याचे दिसून येत आहे.
या वेळी कागदी लगद्याच्या मूर्ती प्रदर्शनासाठी ठेवलेल्या मूर्तीकारांची दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया घेतली असता त्यांतील एकाने सांगितले, ‘‘कागदाचे लगदे पाण्यात ठेवून त्यांची शाई आम्ही काढून घेतो. त्यानंतर कागदाचे लगदे मातीप्रमाणे बारीक करून मगच मूर्ती केली जाते.’’ कागदी लगद्याच्या मूर्ती प्रदर्शनात ठेवलेल्या अन्य व्यक्तीने सांगितले की, ‘कागदाची मूर्ती पाण्यात विसर्जित करू नका’, असे आवाहन आम्ही करतो.
अन्य संशोधने !
१. मुंबईतील प्रसिद्ध ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्थे’ने केलेल्या संशोधनाच्या अंती ‘१० किलो कागदी लगद्याच्या मूर्तीमूळे १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित होत असल्याचे सिद्ध झाले. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडियम आणि टायटॅनिअम ऑक्साईड असे विषारी धातू आढळले.
२. काही वर्षांपूर्वी सांगली येथील पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरन्मेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले असता, कागद विरघळवलेल्या या पाण्यात ‘ऑक्सिजन’ची मात्रा शून्यावर आल्याचा अत्यंत घातक परिणाम त्यांच्या प्रयोगात स्पष्ट केला.
कागदी लगद्याच्या मूर्ती प्रदूषणकारीच ! – पू. शिवाजी वटकर, हिंदु जनजागृती समितीचे तत्कालीन समन्वयक
सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे मी याचिका प्रविष्ट केली होती. या वेळी हरित लवादाकडून याविषयीच्या अहवालाची मागणी केली. या वेळी माटुंगा येथील ‘शासकीय रसायन तंत्रज्ञान संस्थे’कडे आम्ही कागदी लगद्याची श्री गणेशमूर्ती दिली. ही मूर्ती पाण्यामध्ये काही दिवस ठेवून त्यानंतरच त्या लगद्याचे विश्लेषण करण्यात आले. या अहवालानुसार कागदी लगद्याच्या मूर्ती अतिशय प्रदूषणकारी असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कागदी लगदे काही दिवस पाण्यात ठेवले, तरी ते प्रदूषणकारीच असल्याचे या अहवालातून निष्पन्न झाले आहे. हा अहवाल मी राष्ट्रीय हरित लवादाकडे दिला. या अहवालावरून राष्ट्रीय हरित लवादाने सरकारला नोटीस पाठवली.