पाकिस्तानमध्ये ऑगस्ट मासात आतंकवादी आक्रमणांत ८३ टक्के वाढ !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांत वाढ होत आहे, अशी माहिती ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीज’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये आतंकवादी आक्रमणांत ८३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. पाकमध्ये गेल्या मासामध्ये आतंकवादी आक्रमणाच्या ९९ घटना घडल्या आहेत. नोव्हेंबर २०१४ नंतर एका मासात नोंदवलेली ही सर्वाधिक संख्या आहे.

१. या अहवालात म्हटले आहे की, सर्वाधिक आक्रमणे बलुचिस्तान आणि संघीय प्रशासित जनजातीय क्षेत्र (एफ्.ए.टी.ए.) या भागांत झाली आहेत. बलुचिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांमध्ये ६५ टक्के, तर एफ्.ए.टी.ए.मध्ये १०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलुचिस्तानमध्ये जुलै मासात १७, तर ऑगस्टमध्ये २८ आक्रमणे झाली. एफ्.ए.टी.ए.मध्ये जुलै मासात १८, तर ऑगस्टमध्ये ३७ आक्रमणे झाली. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि तिच्यापासून वेगळ्या झोलेल्या आतंकवादी संघटनांनी या आक्रमणांचे दायित्व स्वीकारले आहे.

२. पाकमध्ये वर्ष २०२३ च्या ऑगस्टपर्यंत २२ आत्मघाती (आतंकवाद्यांनी स्वतःच्या शरिरावर बाँब लावून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमणे झाली. यात २२७ जणांचा मृत्यू झाला, तर ४९७ जण घायाळ झाले.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानने जे पेरले, तेच उगवत आहे ! यातूनच पुढे पाकचा विनाश झाला, त्याची शकले झाली, तर आश्‍चर्य वाटू नये !