कोकण समुद्र किनारपट्टींवर सापडलेल्या चरस प्रकरणात रत्नागिरी पोलीस ‘इंटरपोल’चे साहाय्य घेणार !

रत्नागिरी – कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ७ समुद्र किनारपट्टींवर अनुमाने २५० हून अधिक किलोचे चरस (अमली पदार्थ) वहात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या सापडलेल्या चरसची बाजारभावाप्रमाणे किंमत अनुमाने १० कोटी रुपये आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबाग आणि रेवदंडा येथेही चरसची अनुमाने ५ कोटी रुपयांची पाकिटे सापडली आहेत. समुद्रातून वहात आलेल्या चरसच्या पाकिटांच्या बॅगेवर ‘पाकिस्तान’ आणि ‘अफगाणिस्थान’ असे लिहिलेले आहे. या प्रकरणी आता रत्नागिरी पोलीस ‘इंटरपोल’चे (‘इंटरपोल’ म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारांना पकडण्यासाठी कार्यरत असणारी पोलिसांची संघटना) साहाय्य घेणार आहेत.

रत्नागिरी पोलिसांकडून या संदर्भात ‘पर्पल नोटीस’ (गुन्हेगारांद्वारे वापरल्या जाणाच्या कार्यपद्धती, वस्तू, उपकरणे आणि लपवण्याच्या पद्धती यांविषयी माहिती शोधणे किंवा प्रदान करणे) प्रसिद्ध करण्याची विनंती ‘इंटरपोल’ला केली आहे. सर्व किनारपट्टींवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.