गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निदर्शने : भारतात विलीन करण्याची मागणी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत. निर्दशनांत सहभागी झालेले लोक भारतात विलीनीकरणाची मागणी करत आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानमधील नेत्यांनी पाकिस्तानी प्रशासनाला गृहयुद्धाची चेतावणी दिली आहे.

याविषयी एका वृत्तसंस्थेने दिलेल्या एका वृत्तानुसार, शिया धर्मगुरु आगा बाकीर अल-हुसेनी यांच्या अटकेच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तान हा सुन्नीबहुल देश आहे; पण गिलगिट-बाल्टिस्तान शियाबहुल प्रदेश आहे. गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेश प्रशासकीयदृष्ट्या बाल्टिस्तान, दियामेर आणि गिलगिट या ३ भागांत विभागलेला आहे.