संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर सातार्‍यातील विद्यालयाच्या इमारतीवरील दादोजी कोंडदेव यांचे शिल्प काढले !

माने-देशमुख विद्यालय

सातारा, १ सप्टेंबर (वार्ता.) – पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या माने-देशमुख विद्यालयाच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांचे शिल्प उभारण्यात आले होते. सोन्याच्या फाळाने भूमी नांगरतांनाचे हे शिल्प होते; मात्र संभाजी ब्रिगेडच्या विरोधानंतर हे शिल्प विद्यालयाच्या इमारतीवरून काढले.

संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेत माने-देशमुख विद्यालयाला निवेदन देऊन शिल्प हटवण्याविषयी आवाहन केले होते. संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटणकर यांनी संचालक मंडळाशी चर्चा करून विद्यालयाच्या इमारतीवरून हे शिल्प हटवले.

१. संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे की, ‘दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु किंवा मार्गदर्शक असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही’, असा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या इतिहास संशोधक समितीने काही वर्षांपूर्वी दिला आहे.

२. या कारणामुळे राज्यशासनाने दादोजी कोंडदेव यांच्या नावे दिला जाणारा ‘क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कारही बंद केला आहे.

३. शालेय पाठ्यपुस्तकातील इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमातून दादोजी कोंडदेव यांच्याशी संबंधित लेखन वगळण्यात आले आहे.

दादोजी कोंडदेव

यापूर्वी पुणे महानगरपालिकेनेही हटवले आहे दादोजी कोंडदेव यांचे शिल्प !

यापूर्वी संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या आक्षेपामुळे पुणे महानगरपालिकेने लाल महालातील राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या सोन्याच्या फाळाने भूमी नांगरत असल्याच्या समूह शिल्पातून दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवले आहे.