केंद्रशासन जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज !

केंद्रशासनाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी देहली – जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यास केंद्रशासन कधीही सज्ज आहे. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमधील नागरिकांची मतदारसूची अद्ययावत करण्याचे काम चालू होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही ठिकाणी मात्र हे काम शेष आहे. येथे निवडणूक आयोगाकडून हे काम केले जात आहे, अशी माहिती केंद्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. ‘जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेणार ?’ असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी केंद्रशासनला विचारला. यावर आता केंद्रशासनाने वरील उत्तर दिले.

केंद्रशासनाने न्यायालयाला सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये ३ निवडणुका प्रलंबित आहेत. येथे प्रथमच त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पंचायतींसाठी पहिली निवडणूक पार पडेल. जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या आहेत. लेहची निवडणूक प्रक्रियाही पार पडली आहे. ‘कारगिल हिल डेव्हलपमेंट काऊन्सिल’च्या निवडणुका सप्टेंबर मासाच्या अंती होणार आहेत. त्यानंतर पालिका निवडणुका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील.