म्हापसा, ३० ऑगस्ट (वार्ता.) – १८ वर्षांखालील जे विद्यार्थी वाहन चालवतात, त्यांच्या पालकांना वाहतूक नियमांच्या आधारे कारावासाची शिक्षा ठोठावता येते. संबंधित विद्यार्थ्यांनी हे ध्यानात ठेवावे, अशी माहिती कळंगुट पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाचे साहाय्यक उपनिरीक्षक बशिर मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना दिली. पर्वरी येथील संजय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा आणि वाहतूक याविषयी जागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘१८ वर्षांखालील मुले वाहन चालवतांना पकडले गेल्यास त्यांच्या पालकांना ३ वर्षे कारागृह आणि ५ सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते, तसेच असे युवक किंवा युवती यांना वयाची २५ वर्षे होईपर्यंत वाहन चालवण्यासाठी परवाना (लायसन्स) मिळू शकणार नाही. या प्रकरणी संबंधित वाहनाची नोंदणीही एका वर्षासाठी रहित केली जाईल.’’