श्री क्षेत्र तपोभूमी येथील यज्ञोपवित विधीची ‘एशिया बुक’मध्ये नोंद

फोंडा, ३० ऑगस्ट (वार्ता.) – कुंइई येथील श्रीक्षेत्र तपोभूमी येथे ३० ऑगस्ट या दिवशी श्रावणविधी झाला. या वेळी यज्ञोपवित धारण करण्याच्या कार्यक्रमात ५ सहस्र २०० भाविकांचा सहभाग होता. मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने या कार्यक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी तपोभूमी येथील पिठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी म्हणाले, ‘‘गोवा ही भोगभूमी नव्हे, तर योगभूमी आहे. गोमंतकीय संस्कृती सर्वदूर पोचत असतांनाच गोव्याची एक वेगळी ओळख यज्ञोपवितधारण श्रावण विधीतून समोर येत आहे. ही गोमंतकियांसाठी निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे.’’

या कार्यक्रमाला रोम, इटली येथील सूर्यचंद्र योग आश्रमाचे शिवानंद सरस्वती, हरिद्वार येथील गौरीशंकर मंदिर गोशाळेचे अधिपती श्री बाबा हटयोगीजी, हरिद्वार येथील चेतन ज्योति आश्रमाचे महंत श्री ऋषीश्वरानंद स्वामीजी, देहली येथील श्री योगी आशुतोषजी, अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील श्री दशरथ महलचे श्री महंत कृपालुदासजी आदी संतांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात यज्ञोपवित धारण, उत्सर्जन, उपाकर्म, मिंदवते होम, यमप्रार्थना, गोपूजन, रक्षाबंधन आदी विधी झाले.