हिंदु जनजागृती समितीचे ‘समन्‍वयक’ म्‍हणून पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांनी ईश्‍वरी अधिष्‍ठान ठेवून केलेले अविरत धर्मरक्षण कार्य !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास

२५ ऑगस्‍ट २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘पू. शिवाजी वटकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्‍या माध्‍यमातून धर्मरक्षणाचे कार्य करतांना धर्महानीच्‍या कृती तत्‍परतेने कशा थांबवल्‍या ? आणि निद्रिस्‍त हिंदूंना जागृत करण्‍यासाठी धर्मजागृतीपर मोहिमा कशा राबवल्‍या ?’ यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू.

(भाग १३)

२८. धर्मजागृतीसाठी सार्वजनिक ठिकाणी हिंदु धर्मावरील अत्‍याचारांचे फलक प्रदर्शन (फॅक्‍ट) लावणे

पू. शिवाजी वटकर

२८ अ. प्रसिद्ध हिंदुत्‍वनिष्‍ठ फ्रेंच पत्रकार फ्रान्‍सुआ गोतिए यांनी विलेपार्ले (मुंबई) येथील एका महाविद्यालयात सभेच्‍या निमित्ताने लावलेले हिंदूंवरील अत्‍याचाराचे फलक प्रदर्शन पहाणे : ‘वर्ष २००६ मध्‍ये विलेपार्ले (मुंबई) येथील एका महाविद्यालयात प्रसिद्ध हिंदुत्‍वनिष्‍ठ फ्रेंच पत्रकार फ्रान्‍सुआ गोतिए यांनी एक सभा आयोजित करून त्‍या ठिकाणी श्री श्री रविशंकर यांना बोलावले होते. मी आणि श्री. रमेश शिंदे (हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते) तो कार्यक्रम पाहून त्‍यांना संपर्क करण्‍यासाठी तिथे गेलो होतो. तिथे हिंदु धर्मावरील अत्‍याचाराविषयीचे एक फलक प्रदर्शन लावण्‍यात आले होते. या प्रदर्शनात काश्‍मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवर झालेले अनन्‍वित अत्‍याचार दाखवले होते. हे प्रदर्शन पाहून आम्‍ही प्रभावित झालो. त्‍या प्रदर्शनाला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि श्रोते यांचा अत्‍यल्‍प प्रतिसाद होता.

२८ आ. श्री. फ्रान्‍सुआ गोतिए यांच्‍याकडे फलक प्रदर्शनाची मागणी करणे आणि त्‍यांनी त्‍यासंदर्भातील ध्‍वनीचित्र-चकती (‘सीडी’) दिल्‍यावर त्‍यानुसार फलक छापून घेणे : आम्‍ही श्री श्री रविशंकर आणि श्री. फ्रान्‍सुआ गोतिए यांची सदिच्‍छा भेट घेऊन त्‍यांना हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याची माहिती सांगितली. त्‍यांनी लावलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण प्रदर्शनाला ‘अल्‍प प्रतिसाद आहे’, हेही त्‍यांच्‍या लक्षात आणून दिले. कार्यक्रम आणि प्रदर्शन यांसाठी साधारणपणे १०० लोकांची उपस्‍थिती होती. आम्‍ही श्री. फ्रान्‍सुआ गोतिए यांना ‘आम्‍हाला हे प्रदर्शन मिळाले, तर आम्‍ही अनेक ठिकाणी ते लावू शकतो’, असे सांगून त्‍यांना ते देण्‍याची विनंती केली. त्‍यांनी आम्‍हाला या फलक प्रदर्शनाची ध्‍वनीचित्र-चकती (‘सीडी’) दिली. आम्‍ही त्‍यानुसार फलक छापून घेतले.

२८ इ. हिंदु जनजागृती समितीने महाराष्‍ट्रातील अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये प्रदर्शने लावून हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांविषयी जागृती करणे : हिंदु जनजागृती समितीने ही प्रदर्शने महाराष्‍ट्रातील अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये लावण्‍याचे नियोजन केले. गावोगावच्‍या सभागृहांमध्‍ये हे प्रदर्शन लावण्‍यात आले. त्‍यानंतर गुरुपौर्णिमा महोत्‍सव, हिंदु जनजागृती समितीच्‍या सभा, हिंदूसंघटन मेळावेे, समितीच्‍या वतीने आयोजित केलेली अधिवेशने इत्‍यादी सहस्रोे ठिकाणी ही प्रदर्शने लावण्‍यात आली. याद्वारे काश्‍मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांविषयी लाखो हिंदूंमध्‍ये जागृती करण्‍यात आली.

२८ ई. आषाढी वारीच्‍या वेळी पंढरपूर येथे हिंदूंवरील अत्‍याचाराचे प्रदर्शन लावणे : जत्रा सुनियोजनाचा भाग म्‍हणून हिंदु जनजागृती समितीने पंढरपूर येथे आषाढी वारीच्‍या निमित्ताने भव्‍य नियोजन केले होते. वारीच्‍या मार्गावर मोठ्या स्‍वागत कमानी उभ्‍या केल्‍या होत्‍या आणि चौकांमध्‍ये मोठे फलक लावले होते. ग्रंथ प्रदर्शन, काश्‍मीर आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्‍याचार यांची प्रदर्शने लावली होती. पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात प्रचार करण्‍यात आला.

२९. हिंदु जनजागृती समितीचे ‘समन्‍वयक’ म्‍हणून केलेले कार्य !

२९ अ. हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘न्‍यायालयीन अन्‍याय निवारण समिती’चा ‘समन्‍वयक’ म्‍हणून दायित्‍व पहाणे : वर्ष २००८ मध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या ‘न्‍यायालयीन अन्‍याय निवारण समिती’ची स्‍थापना झाली. १९.१२.२००८ या दिवशी याची माहिती देण्‍यासाठी मुंबई येथे पत्रकार परिषद घेण्‍यात आली. ईश्‍वरी कृपेने मला ‘महाराष्‍ट्र राज्‍याचे समन्‍वयक’ म्‍हणून दायित्‍व मिळाले. त्‍या कालावधीत सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या खंडपिठाने ‘भारतात साक्षात् ईश्‍वर अवतरला, तरी हा देश बदलू शकणार नाही. भारताचे चारित्र्य संपुष्‍टात आले आहे. आम्‍ही हतबल झालो आहोत’, असे उद़्‍गार काढले होते. भारतीय नागरिकांना अचूक आणि वेळेत न्‍याय मिळत नाही. न्‍याय मिळाला, तर त्‍याची कार्यवाही काटेकोरपणे होत नाही. या पार्श्‍वभूमीवर ‘अन्‍याय निवारण समिती’ची स्‍थापना झाली होती. समितीकडून जनतेला विनामूल्‍य कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन करण्‍यात आले.

२९ आ. ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्‍या कार्यालयातील समन्‍वय करणे : वर्ष २०१२ मध्‍ये गोवा येथे झालेल्‍या ‘प्रथम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’मध्‍ये हिंदु विधीज्ञ परिषदेची स्‍थापना झाली. ही राष्‍ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणारी अधिवक्‍त्‍यांची सेवाभावी संघटना आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेची स्‍थापना झाल्‍यानंतर जवळ जवळ २ वर्षे मी त्‍यांच्‍या कार्यालयामध्‍ये समन्‍वय करण्‍यासाठी जात होतो.

२९ इ. ‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’मध्‍ये ‘समन्‍वयक’ म्‍हणून सहभागी होणे : जून २०१२ मध्‍ये ‘प्रथम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ झाले. गुरुकृपेने मला या अधिवेशनामध्‍ये समन्‍वयक म्‍हणून सेवा करण्‍याची संधी मिळाली. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने मला या ऐतिहासिक अधिवेशनात सहभागी होण्‍याचे भाग्‍य लाभले. त्‍यानंतर झालेल्‍या ३ अधिवेशनांमध्‍येही मला सहभागी होण्‍याचे भाग्‍य लाभले.

२९ ई. ‘जनसुराज्‍य अभियान’ आणि ‘आरोग्‍य साहाय्‍य समिती’ या उपक्रमांत सेवा करणे : सप्‍टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या ६ मासांच्‍या कालावधीत मला हिंदु जनजागृती समितीच्‍या अंतर्गत चालू असलेल्‍या ‘जनसुराज्‍य अभियान’ आणि ‘आरोग्‍य साहाय्‍य समिती’ या उपक्रमांत सेवा करण्‍याची संधी लाभली. मी माहितीच्‍या अधिकाराखाली अर्ज करून शासनाने ‘जिवो फिल्‍म फेस्‍टिवल २०१४’ या कार्यक्रमातून अल्‍प करमणूक कर वसूल करणे, ज्‍वारीपासून मद्यनिर्मिती करणे इत्‍यादी विषयांवर माहिती मिळवली. त्‍यावर लेख लिहिले आणि शासनाला देण्‍यासाठी निवेदने सिद्ध केली.

२९ उ. धर्मरक्षणाचे कार्य करतांना झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे

२९ उ १. ईश्‍वरी अधिष्‍ठान ठेवून कार्य केल्‍यास ते व्‍यापक आणि सहजतेने होणे : साधना म्‍हणून धर्मप्रसार किंवा धर्मरक्षण कार्य केले, तर समाजात वैचारिक क्रांती घडू शकते. देवाचे साहाय्‍य घेतले, तर कोणतेही कार्य सहज शक्‍य होते. यासाठी ईश्‍वरी अधिष्‍ठान ठेवून व्‍यापक कार्य केले पाहिजे. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी आरंभापासून हे तत्त्व सांगितले आणि त्‍यानुसार माझ्‍याकडून समष्‍टी सेवा करून घेतली आहे.

२९ उ २. शंकराचार्य, संत आणि धर्माचार्य यांचा सत्‍संग मिळून धर्म अन् राष्‍ट्र यांविषयीचा अभिमान जागृत होणे : समितीच्‍या अंतर्गत आम्‍ही प.पू. गगनगिरी महाराज, त्‍यांचे शिष्‍य आबानंद महाराज, नाणीजधाम येथील जगद़्‍गुरु रामानंदाचार्य श्री स्‍वामी नरेंद्राचार्यजी महाराज, श्री श्री रविशंकर, कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्‍वती, ज्‍योतिर्मठ पिठाचे शंकराचार्य स्‍वरूपानंद सरस्‍वती, अशा अनेक संतांकडे जाऊन त्‍यांना राष्‍ट्र आणि धर्मरक्षण यांविषयी माहिती देणे, निवेदने देणे, अशा सेवा करत होतो. मी घाटकोपरचे प.पू. जोशीबाबा, नारायणगावचे प.पू. काणे महाराज इत्‍यादी संतांकडे जायचो. त्‍यांनी मला पुष्‍कळ प्रेम दिले आणि माझ्‍यातील धर्म अन् राष्‍ट्र यांविषयीचा अभिमान जागवला. मला त्‍यांचा सत्‍संग मिळाला आणि त्‍यांच्‍याकडून पुष्‍कळ शिकायला मिळाले.

२९ उ ३. अनेक संत, संप्रदाय किंवा हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना यांच्‍या संपर्कात येऊनही परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या कृपेने कुणातही न गुंतणे : मी संत, हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना, लोकप्रतिनिधी आणि उद्योगपती यांच्‍या संपर्कात असायचो. मी त्‍यांचे कार्य, लोकसंग्रह आणि मोठेपणा यांच्‍यामुळे प्रभावित होत असे; मात्र परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी मला कुणामध्‍येही अडकू दिले नाही. त्‍यांनी मला ईश्‍वरी तत्त्वाशी आणि त्‍यांच्‍यातील गुरुतत्त्वाशी जोडून ठेवले. मागील ३० वर्षांपासून ते माझ्‍याकडून अशा प्रकारे साधना करून घेत आहेत; पण त्‍यांनी मला कुणातही अडकू न देता थेट ईश्‍वरी तत्त्वाशीच जोडले आहे. यातूनच ‘ते स्‍वतःच ईश्‍वर आहेत’, याची मला प्रचीती आली.

२९ उ ४. लाचार अधिकार्‍यांनी खोट्या गुन्‍ह्यांत अडकवण्‍याचा प्रयत्न करूनही ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो’, या वचनाची नित्‍य अनुभूती घेणे : हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने अनेक मोहिमा आणि आंदोलने राबवली गेली. त्‍यामुळे मी पुरोगामी, बुद्धीवादी, धर्मद्रोही, हिंदुद्वेष्‍टे, अहंकारी राजकारणी, भ्रष्‍ट प्रशासन अधिकारी, पोलीस इत्‍यादींच्‍या संपर्कात आलो. त्‍यांचे प्रबोधन करणे, वैध मार्गाने विरोध करणे आणि धर्मरक्षणाचे कार्य करणे, हे सर्व माझी बुद्धी आणि कल्‍पना यांच्‍या पलीकडचे होते. दुष्‍प्रवृत्ती असलेल्‍या लाचार अधिकार्‍यांनी काही वेळा मला खोट्या गुन्‍ह्यांत अडकवण्‍याचा प्रयत्न केला; मात्र गुरुकृपारूपी चैतन्‍याच्‍या सामर्थ्‍यापुढे त्‍यांचे काही चालले नाही. ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’ (मनुस्‍मृति, अध्‍याय ८, श्‍लोक १५), म्‍हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो’, या वचनाची मी नेहमीच अनुभूती घेतली आहे.

(क्रमशः)

– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक