नूंह (हरियाणा) येथे विहिंपच्या आजच्या ‘बृजमंडल जलाभिषेक यात्रे’ला हरियाणा सरकारने अनुमती नाकारली !

  • बजरंग दल, विहिंप आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यात्रा काढण्यावर ठाम

  • जमावबंदी आदेश आणि इंटरनेट बंद

नूंह (हरियाणा) – येथे विश्‍व हिंदु परिषदेने २८ ऑगस्ट या दिवशी ‘बृजमंडल जलाभिषेक यात्रा’ काढण्याचे यापूर्वीच घोषित करण्यात आले आहे. येथे यापूर्वी इंटरनेट बंद करण्यात आले असून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मागील यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी या यात्रेवर आक्रमण केले होते. या पार्श्‍वभूमीवर हरियाणा सरकारकडून अद्याप या यात्रेला अनुमती देण्यात आलेली नाही; मात्र विश्‍व हिंदु परिषदेने ‘आम्हाला यात्रा काढण्यासाठी कुणाच्या अनुमतीची आवश्यकता नाही’, असे घोषित केले आहे. त्याच वेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनीही ‘यात्रा काढण्यात येईल’, असे घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, यापूर्वी नूंह येथे झालेल्या हिंसाचारानंतर येथे कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे येथे यात्रा काढण्याऐवजी भाविकांनी स्थानिक मंदिरात जाऊन पूजा करावी.

पोलिसांनी राज्याच्या सीमेवर बंदोबस्त ठेवून यात्रेसाठी येणार्‍यांना रोखण्यासाठी अडथळे निर्माण केले आहेत. यासह सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह संदेश पाठवण्यात येत आहेत का ? याकडेही लक्ष ठेवण्यात येत आहे.

बजरंग दल आणि विहिंप प्रत्येक जिल्ह्यात यात्रा काढणार

बजरंग दल आणि विहिंप यांनी हरियाणा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जलाभिषेक यात्रा काढण्याचे घोषित केले आहे. यात नूंहचाही समावेश आहे. ‘नूंहच्या नल्हड येथे मोठ्या संख्येने गोळा होण्याऐवजी स्थानिक ठिकाणी यात्रा काढावी’, असे आवाहन या संघटनांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

संपादकीय भूमिका 

हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण झाले आणि पुन्हा हिंदु यात्रा काढत असतांना त्यांना अनुमती नाकारली जाते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !