संत किंवा उत्तरदायी साधक यांनी चुका सांगण्यामागील दृष्टीकोन समजून घ्या !

पू. संदीप आळशी

‘संत किंवा उत्तरदायी साधक यांनी काही साधकांना चुका सांगितल्यावर किंवा त्यांच्या सेवांचा आढावा घेतल्यावर काही साधकांना अपमानास्पद वाटून वाईटही वाटते. ‘सेवेत चुका तर होणारच. आम्ही जमेल तेवढी सेवा करतोच, तरीही संत किंवा उत्तरदायी साधक आमच्या सेवेचा आढावा का घेतात ?’, अशी प्रतिक्रिया साधकांच्या मनात येते. साधकांनी त्यांना जमते त्यापेक्षा अधिक, परिपूर्ण आणि दायित्व घेऊन सेवा केल्याने त्यांची सेवेची फलनिष्पत्ती वाढून साधनेत लवकर प्रगती होते; म्हणून संत किंवा उत्तरदायी साधक हे साधकांना चुका सांगतात आणि त्यांच्या सेवांचा आढावा घेतात.

माझ्या भाग्याने मला, तसेच सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु अनुराधा वाडेकर, श्री. दिनेश शिंदे अशा काही जणांना ४ – ५ वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. त्यांनीच आम्हाला विविध सेवा करायला शिकवल्या. सेवा करतांना आमच्याकडून लहानसहान पुष्कळ चुका होत असत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर प्रत्येक वेळी त्या आम्हाला दाखवत आणि काही वेळा तर सर्वांसमक्ष आम्हाला रागावूनही चुका सांगत. त्या वेळी आम्ही सर्व जण साधनेत नवीन असतांनाही आम्हा कुणालाच त्याविषयी कधीच वाईट वाटले नाही. उलट ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आम्हाला हक्काने चुका सांगतात, रागावतात’, याविषयी आम्हाला चांगले वाटे. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या चुकांकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पहात असू. त्यांनी दाखवलेल्या बहुतेक चुका आजही आमच्या स्मरणात आहेत. त्यांनी चुका दाखवल्यामुळेच आम्ही परिपूर्ण सेवा करण्यास शिकलो. इतरांनी चुका लक्षात आणून देण्याचे हे महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आम्हाला सेवा देतांना ‘ती किती वेळेत पूर्ण करायची’, हे सांगत आणि नंतर त्या सेवेचा आढावाही घेत. आमच्याकडून सेवा पूर्ण होण्यास उशीर झाल्यास त्याची जाणीवही करून देत. अशा प्रकारे आमची सेवेची फलनिष्पत्ती वाढवण्याविषयी ते नेहमी दक्ष असत. केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमुळेच आम्ही सेवा आणि साधना करण्यास सक्षम होऊ शकलो. यासाठी आम्ही त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहोत.

सर्व साधकांनी वरील दृष्टीकोन लक्षात ठेवून साधनेत वाटचाल केली, तर त्यांना नेहमी सकारात्मक रहाता येऊन त्यांच्या सेवेची फलनिष्पत्तीही वाढेल.’

– पू. संदीप आळशी (६.७.२०२३)