उद्या २७.८.२०२३ या दिवशी (कै.) श्रीमती पुष्पलता नेसवणकर यांचे पाचवे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची कनिष्ठ कन्या सुश्री (कु.) कुंदा नेसवणकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आजींच्या मृत्यूनंतर साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सुश्री (कु.) कुंदा नेसवणकर, ठाणे सेवाकेंद्र (नेसवणकरआजींची मुलगी)
१ अ. नीटनेटकेपणा : ‘माझी आई एकदम नीटनेटकी आणि स्वच्छ रहायची. सकाळी उठल्यावर आणि सायंकाळी तोंड धुतांना ती केस पूर्ण विंचरायची, तसेच रात्री झोपतांना आणि सकाळी केसांना तेल लावायची. अगदी मृत्यूच्या क्षणापर्यंत तिचा चेहरा स्वच्छ होता आणि केस व्यवस्थित विंचरलेल्या स्थितीत होते.
१ आ. हिमोग्लोबीन न्यून असल्याने शारीरिक थकवा असूनही दिवसभर उत्साही असणे : तिची दिनचर्या आदर्श होती आणि तिचा काम करण्याचा उत्साहही आदर्श होता. वयाच्या ८९ व्या वर्षापर्यंत ती कामे करत होती. मृत्यूच्या आधी ७ दिवसापर्यंत तिने मला भाजी निवडून दिली. आधुनिक वैद्य म्हणायचे, ‘‘आता त्या उठून बसणे’, हेही पुष्कळ झाले.’’ तिचे हिमोग्लोबीन न्यून असल्याने तिला थकवा होता.
१ इ. स्पष्टपणे चुका सांगणे : माझे कधी माझ्या भाच्याशी भांडण झाले, तर ती मला ‘गप्प रहा’, असे सांगायची. चूक झाल्यावरही ती स्पष्ट शब्दात ‘कुंदा, तुझे चुकले’, असे मला सांगायची. कधी कधी ती मला ‘तू नामजप कर, ‘तुझे विचार सुधार’, असे सांगून ‘कशा प्रकारे वागायला हवे ?’, हेही सांगायची.
१ ई. मुलीला साधना करण्यास साहाय्य करणे : वर्ष २०१६ मध्ये मी पूर्णवेळ साधना करू लागले, तेही आईमुळेच ! स्वत:चे वय ८४ वर्षे असूनही घरातील सर्व कामे सांभाळणार्या मुलीला आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी पाठवणे, खरेतर पुष्कळ कठीण होते. तिच्या त्यागाला तोड नव्हती. ती त्यागाची मूर्तीच होती.
१ उ. व्यष्टी साधना : सकाळी उठायच्या वेळी ती देवाला प्रार्थना करूनच उठायची. नामजप करणे, स्तोत्रे म्हणणे आणि सूर्यदेवाला प्रार्थना करणे, यानंतर तिच्या दिवसाचा प्रारंभ व्हायचा. तिच्या प्रत्येक कृतीचा प्रारंभ प्रार्थनेनेच व्हायचा. ती सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक कृती देवाला आळवून भावपूर्ण करायची.
१ ऊ. सेवेची तळमळ
१ ऊ १. समष्टी नामजप करण्याची सेवा मनापासून करणे : आईला साधक आणि सेवा यांसाठी नामजप करायची सेवा मिळत असे. आई नामजपाची सेवा मनापासून करायची. नामजप विसरायला नको; म्हणून ती तो लिहून ठेवायची. तिला समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा मिळाल्यावर ती सकाळीच नामजपाची सेवा पूर्ण करायची. तिने अनेक वर्षे ही सेवा केली.
१ ऊ २. देवाला आळवून भावपूर्ण नामजप करणे : आई वयाच्या ८९ वर्षापर्यंत नियमित सकाळी ६ वाजता किंवा त्याच्याआधी उठून नामजप करायची. आम्ही उठायचो, तेव्हा तिचा नामजप पूर्ण झालेला असायचा. क्वचितच तिच्याकडून नामजप झाला नाही, तर तिला त्याची खंत वाटायची आणि राहिलेला नामजप ती दिवसभरात पूर्ण करायची.
१ ए. अल्प अहं : वर्ष २०१८ मध्ये तिची ६५ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. तिला आध्यात्मिक त्रास नव्हता. तिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असूनही तिने कधीही स्वतःचा वेगळेपणा दाखवला नाही. सूक्ष्मातील कळूनही तिने तसे कधी दाखवले नाही.
१ ऐ. कृतज्ञताभाव : मी आईची सेवा करायचे. त्यामुळे तिला माझ्याविषयीही पुष्कळ कृतज्ञता वाटून तिच्या डोळ्यांतून पाणी यायचे.
१ ओ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांना सतत प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करणे : ती गुरुदेवांच्याप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता व्यक्त करणारे गीत सतत गायची. ती गुरुदेव आणि सद़्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करायची. ती ‘माझा कर्तेपणा अर्पण करून घ्या’, अशी आर्त प्रार्थना करायची. अंतिम क्षणापर्यंत रुग्णाईत असतांनाही मी तिला नियमित सकाळ, दुपार आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करतांना पाहिले आहे.’
२. साधकांना आलेल्या अनुभूती
अ. ‘आम्ही अंत्यविधीसाठी स्मशानात आलो’, असे मला मुळीच वाटत नव्हते. तिथे आनंद आणि उत्साह जाणवत होता.’
– श्री. यशवंत रांजणे, भांडुप (पूर्व), मुंबई
आ. ‘नेसवणकरआजी गेल्यानंतर ४ – ५ दिवसांनी मी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा घरी कुठल्याही प्रकारचे दडपण किंवा दाब जाणवत नव्हता. मला त्यांच्या घरी एकदम शांत आणि आनंदी वाटत होते.’
– श्रीमती वसुधा पाटील, भांडुप, मुंबई.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |