सनातनची साधिका कु. मधुरा मोहन चतुर्भुज यांना तीव्र आध्यात्मिक त्रास असतांनाही त्यांनी साधनेचे प्रयत्न कसे केले ? आणि त्यामुळे त्यांच्यात झालेला पालट येथे देत आहोत.
१. वाईट शक्तींच्या तीव्र त्रासामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होणे
‘वर्ष २००४ मध्ये माझी मुलगी कु. मधुरा चतुर्भुज हिला वाईट शक्तींचा तीव्र त्रास चालू झाला. त्यामुळे तिला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रासही व्हायचा. ती नामजपादी उपायांसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात जायची. वाईट शक्तींचा तीव्र त्रास होत असतांना तिला शारीरिक त्रासही झाले; पण त्यांतून ती सुखरूप बाहेर पडली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाल्यावर त्यांच्यावर काव्य रचणे आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात संतांनी केलेल्या नामजपादी उपायांमुळे त्रास न्यून होणे
मधुरा १० वर्षांची असल्यापासून आम्ही परात्पर गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) साधनेविषयीची प्रवचने ऐकायचो. त्यानंतर आम्ही पुण्यात आलो. तेव्हा तिची इयत्ता ८ वी ते १० वीपर्यंतची वर्षे छान गेली. वर्ष २००५ मध्ये आमची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यानंतर तिने परात्पर गुरुदेवांवर काव्य रचले आणि तिच्यात बालकभाव जागृत झाला. तिला तशा अनुभूतीही आल्या. वर्ष २००७ आणि वर्ष २००८ या कालावधीत आम्ही देवद आश्रमात होतो. तेथे संतांच्या नामजपादी उपायांमुळे तिचा त्रास न्यून झाला आणि तिला विविध अनुभूतीही आल्या.
३. पाच वर्षे तीव्र त्रास होणे
वर्ष २००४ ते वर्ष २००९ हा तिच्यासाठी पुष्कळ त्रासाचा काळ होता. वर्ष २०१० मध्ये तिला रुग्णालयात भरती केले होते. वर्ष २०१२ पासून तिचा त्रास न्यून होऊ लागला.
४. तीव्र आध्यात्मिक त्रास होत असूनही मराठी वाङ्मयाची पदवीधर आणि सुगम संगीतात ‘विशारद’ होणे
तिचे शिक्षण ‘मराठी वाङ्मय’ या विषयामध्ये झाले. वर्ष २०१३ मध्ये ती मराठी वाङ्मयाची पदवीधर झाली. त्यानंतर काही कालावधीने आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलो. तेव्हा मधुराने परात्पर गुरुदेवांना सांगितले, ‘‘माझी संगीताच्या माध्यमातून साधना करण्याची इच्छा आहे.’’ परात्पर गुरुदेवांच्या कृपेने तिची इच्छा पूर्ण झाली. ती वर्ष २०१७ मध्ये सुगम संगीतात ‘विशारद’ झाली. या शिक्षणाच्या कालावधीत तिचा आध्यात्मिक त्रास नियंत्रित होता; परंतु अधूनमधून तिला तीव्र त्रास होत असे.
५. रात्रंदिन पुष्कळ त्रास होत असतांना देवानेच कु. मधुरा यांना सांभाळल्याची अनुभूती येणे
तिला रात्रंदिन पुष्कळ त्रास होत होता. आम्ही दोघेही (आई-वडील) तिच्या समवेत असायचो. तेव्हा आम्ही दिवसा आश्रमातील इतर सेवाही करत होतो. देवच आमच्याकडून सर्वकाही करून घेत होता. आश्रमातील चैतन्य तिला सहन होत नसले की, अधूनमधून आम्ही आश्रमातून घरी यायचो. देवच तिला सांभाळत होता.
६. रामनाथी आश्रमात ८ घंटे नामजपादी उपाय चिकाटीने पूर्ण करणे, प.पू. देवबाबा यांनी केलेले मार्गदर्शन अन् उपाय यांमुळे त्रास उणावणे आणि संगीत-साधनेला दिशा मिळणे
वर्ष २०१६ मध्ये रामनाथी आश्रमात आल्यावर तिला ८ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले होते. ते तिने चिकाटीने केले, तसेच संगीत-साधनेमुळे तिच्या भोवतीचे वाईट शक्तीचे आवरण जाऊन तिचा उत्साह वाढला. वर्ष २०१८ मध्ये किन्नीगोळी (कर्नाटक) येथील संत प.पू. देवबाबा यांनी सांगितलेले उपाय आणि त्यांचे मार्गदर्शन, यांमुळे तिच्या संगीत-साधनेला दिशा मिळाली. प.पू. देवबाबांनी सांगितलेल्या उपायांचा तिला पुष्कळ लाभ झाला. त्यांनी सांगितलेले विधी केल्यामुळे तिचा त्रास उणावला. कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ४५ वर्षे) आणि सौ. अनघा शशांक जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४२ वर्षे) यांनी तिची सर्वतोपरी काळजी घेतली. त्यांच्याकडून तिला बरेच शिकायला मिळाले.
७. आठ वर्षे न चुकता सतत मंत्रजप केल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होणे
त्रासामुळे तिचे वजन पुष्कळ वाढले होते. हे जेव्हा एका संतांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे त्रासदायक शक्तीचे वजन आहे.’’ तेव्हा तिच्या मनावरचा ताण दूर झाला. तिला जेव्हा आध्यात्मिक त्रास व्हायचा, तेव्हा ती आश्रमात अल्प वेळ आणि घरीच अधिक वेळ होती. तिने ८ वर्षे सतत न चुकता मंत्रजप केल्यामुळे तिचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून झाले.
८. वडिलांच्या निधनाच्या वेळी देवावर श्रद्धा ठेवून स्थिर रहाणे
वर्ष २०२१ मध्ये तिच्या वडिलांचे (कै. मोहन चतुर्भुज (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे)) निधन झाले. त्या वेळी ती स्थिर होती. तिची देवावर श्रद्धा होती. हळूहळू मला तिच्यातील पालट जाणवत होते. मी सेवेला गेल्यावर ती घरी स्वयंपाक बनवत असे, तसेच ती घर आवरणे आणि इतर साहाय्यही करत होती. ‘तिची प्रत्येक कृती भावाच्या स्तरावर होत होती’, असे मला जाणवत होते.
९. वडिलांच्या निधनाच्या वेळी आईला आधार देणे आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे
माझ्या यजमानांचे (कै. मोहन चतुर्भुज यांचे) निधन झाल्यावर मधुराने मला पुष्कळ आधार दिला. त्यानंतर आम्ही रामनाथी आश्रमात आल्यावर तिने भावाच्या स्तरावर प्रयत्न केले. त्यामुळे तिचा त्रास न्यून होत गेला. इतर संत आणि साधक यांनीही तिच्यासंबंधी सांगितले, ‘‘तिच्यामध्ये पुष्कळ पालट जाणवत आहेत.’’ हे सर्व देवाच्याच कृपेने अनुभवायला मिळाले.
१०. कु. मधुरा यांच्यामध्ये झालेले पालट
अ. आता वर्ष २०२३ मध्ये तिला केवळ ४ घंटेच नामजपादी उपाय करायला सांगितले आहेत.
आ. पूर्वी तिच्याकडून सेवा नीट होत नव्हती. आताही तिचा संघर्ष होतो; पण ‘परात्पर गुरुदेवांनी ‘त्यामध्ये सातत्य कसे ठेवायचे ?’, हे शिकवले’, असा तिचा भाव आहे.
इ. तिने केलेल्या प्रयत्नांमुळे तिला प्रगतीच्या संदर्भातील स्वयंसूचना घेण्यास सांगण्यात आल्या. त्या सूचना संक्षिप्त स्वरूपात येथे दिल्या आहेत.
१. उपाय होतात.
२. स्वयंसूचनांची सत्रे होतात.
३. स्वावलंबन वाढले.
४. सकारात्मकता वाढली.
५. चिडचिड न्यून झाली.
६. आत्मनिवेदन वाढले.
७. आत्मविश्वास वाढला.
८. घरच्यांबद्दलचा पूर्वग्रह आणि अपेक्षा न्यून झाल्या.
९. भावजागृतीचे प्रयत्न वाढले.
१०. इतरांचा विचार वाढला.
११. चुकांची जाणीव तीव्रतेने होते.
१२. उपायांना बसल्यावर नामजप चांगला होतो.
१३. संगीताच्या सरावाचे सकारात्मक परिणाम होऊन आवाजात आणि गायनात चांगला पालट झाला.
१४. वडिलांच्या निधनानंतर स्थिर रहाता आले.
ई. तिच्यामध्ये पालट झालेला पाहून संतांनी तिच्यासाठी प्रसाद पाठवला.
उ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या एका सत्संगात ते मला म्हणाले होते, ‘‘मधुराची चिंता करू नका.’’
‘हे गुरुदेवा, ‘मधुराकडून असेच प्रयत्न होऊ देत आणि तिला प्रत्येक ठिकाणी आनंद अनुभवता येऊ दे’, अशी तुमच्या कोमल चरणी कोटीशः प्रार्थना अन् कृतज्ञता !’
– श्रीमती माधवी चतुर्भुज (कु. मधुरा चतुर्भुज यांची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.२.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |