‘अ‍ॅमेझॉन’कडून पाकिस्ताच्या ध्वजाची विक्री : नागपूरमध्ये मनसेकडून ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयाची तोडफोड !

‘अ‍ॅमेझॉन’वर फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी

नागपूर – पाकिस्तानच्या ध्वजाची विक्री केल्याच्या प्रकरणी अ‍ॅमेझॉन या हिंदु आणि भारतद्वेषी आस्थापनाच्या बैद्यनाथ कार्यालयाची मनसेने २२ ऑगस्ट या दिवशी तोडफोड केली.

अ‍ॅमेझॉनकडून पाकिस्तानच्या ध्वजाचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्याची सत्यता पडताळण्यासाठी कार्यकर्त्यांनी ‘अ‍ॅमेझॉन’वरून पाकिस्तानच्या ध्वजाची मागणी केली. ‘अ‍ॅमेझॉन’वरून कार्यकर्त्यांना तो प्राप्त झाला. यामुळे संतप्त होऊन १५ ते २० कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या व्यवस्थापकांना पाकिस्तानच्या ध्वजविक्रीविषयी खडसावले आणि कार्यालयाची तोडफोड केली.

‘सैनिक देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत. ते पाकिस्तानाकडून येणार्‍या आतंकवाद्यांना रोखत आहेत आणि ‘अ‍ॅमेझॉन इंडिया’ पाकिस्तानच्या ध्वजाची विक्री करून देशात दहशत निर्माण करत आहे’, असा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘पाकिस्तानच्या ध्वजाची विक्री करण्याचा प्रकार देशद्रोही आहे. या प्रकारामुळे भविष्यात देशात दंगे झाल्यास त्यासाठी केवळ ‘अ‍ॅमेझॉन इंडिया लिमिटेड’ आस्थापनच उत्तरदायी राहील. त्यामुळे या आस्थापनावर फौजदारी गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्यात येईल’, असे मनसेचे शहराध्यक्ष चंदू लाडे आणि विशाल बडगे यांनी सांगितले.

  • ‘डेडली भगवद्गीता’ या हिंदुविरोधी पुस्तकाची विक्री होत असल्याविषयी अ‍ॅमेझॉनचा निषेध !
  • ‘डेडली भगवद्गीता’ या हिंदुविरोधी पुस्तकाची संकेतस्थळावरून विक्री होत असल्याविषयीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनचा निषेध केला.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

शत्रूराष्ट्राची तळी उचलणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’वर सरकारने आता तरी तात्काळ बंदी आणावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !