(म्हणे) ‘भारतीय उद्योग समूहांचे घोटाळे उघडकीस आणणार !’ – ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’

  • भारतद्वेष्टा अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस, तसेच ‘फोर्ड फाऊंडेशन’ यांचे आर्थिक पाठबळ लाभलेल्या संस्थेची दर्पोक्ती !

  • ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ या संस्थेने केला दावा !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अदानी या भारतीय उद्योगसमूहाने कथित आर्थिक घोटाळा केल्याचा अहवाल अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या आस्थापनाने प्रसिद्ध केला होता. या अहवालाचा अदानी समूहाच्या समभागांवरही परिणाम झाला होता; परंतु काही मासांपूर्वी केंद्र सरकारने हा अहवाल निराधार असल्याचे स्पष्ट केले होते. आता ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधी प्रलक्प) या संस्थेने ‘आम्ही भारतातील उद्योग समूहांनी केलेले आर्थिक घोटाळे बाहेर काढू’, असे म्हटले आहे.

ही संस्था म्हणजे शोध पत्रकारांचे जगभर पसरलेले जाळे आहे. ती गुन्हे आणि भ्रष्टाचार यांची प्रकरणे उघडकीस आणण्याचे काम करते. या संस्थेला भारतद्वेष्टा अब्जाधीश जॉर्ज सोरोसची ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ ही संस्था, तसेच ‘फोर्ड फाऊंडेशन’ आणि ‘रॉकफेलर ब्रदर्स फंड’ यांसारख्या भारतद्वेषी संस्थांचा पाठिंबा आहे. ‘जनतेची फसवणूक होऊ नय आणि तिचे अधिकार अबाधित रहावेत’, असा उद्देश असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. ही संस्था भारतातील काही आस्थापनांसह शोध प्रकाशित करण्याच्या सिद्धतेत असल्याचे ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या शोधामध्ये भारतीय आस्थापनांचे समभाग आणि परदेशी गुंतवणूक यांवरही प्रकाश टाकला जाण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका 

येणार्‍या काळात कट्टर भारतद्वेषी व्यक्ती अन् संघटना एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करतील, हेच यातून सिद्ध होते !