अझरबैजान येथे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंद याला हरवून मॅग्नस कार्लसन जगज्जेता ठरले. ३२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहेत. विविध जागतिक बुद्धीबळ स्पर्धांमध्ये त्यांनी तब्बल १५ वेळा जगज्जेतेपद पटकावले आहे. आक्रमकता आणि बचाव यांची उत्तम सांगड असणारा हा खेळाडू. अंतिम स्पर्धेच्या वेळी त्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. तरीही पहिले २ सामने अनिर्णित राखण्यात त्यांनी यश मिळवले. त्यामुळे तिसर्या दिवशी ‘टायब्रेक’मध्ये (अनिर्णित स्थितीत) कार्लसन यांनी प्रज्ञानंद याला पराभूत केले. कार्लसन यांनी स्वतःचा अनुभव पणाला लावत ते एका जगज्जेत्याप्रमाणे खेळले. असे असले, तरीही प्रज्ञानंद याचे विशेष अभिनंदन ! मागील काही वर्षांत त्याचा उंचावत चाललेला खेळ कौतुकास्पद आहे. जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत प्रज्ञानंद याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. उपांत्य फेरीत त्याने जागतिक क्रमवारीत तिसर्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारूआना यांना हरवले. त्या आधीच्या फेरीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या हिकारू नाकामुरा यांना हरवले होते. हे दोन्ही दिग्गज खेळाडू. या दोघांकडे प्रज्ञानंद याच्यापेक्षा अनुभवाची शिदोरीही मोठी; मात्र अंगी असणारे उपजत कौशल्य आणि आतापर्यंत घेतलेले कष्ट यांमुळे प्रज्ञानंद त्यांच्यावर मात करू शकला. या जागतिक स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात तो उपविजेता ठरला असला, तरी त्याच्यासारख्या प्रज्ञावंत खेळाडूचे भविष्य उज्ज्वल आहे.
कठोर परिश्रमाचा परिणाम !
प्रज्ञानंद याच्या वयाचे युवक मौजमजा करणारे, आपल्या भावविश्वात रममाण असणारे आणि आयुष्याचा ‘आस्वाद’ घेणारे असतात. प्रज्ञानंद याने अगदी लहान वयात वेगळी वाट चोखाळली. येथे कष्ट आणि त्याग करण्याची सिद्धता असणे आवश्यक होते. ही बिकट वाट प्रज्ञानंद याने चोखाळली. जेव्हा त्याचे प्रशिक्षक आर्.बी. रमेश यांनी त्याला ‘तुला सामाजिक माध्यमे आणि भ्रमणभाष यांपासून लांब रहावे लागेल’, असे सांगितले, त्या वेळी त्याने ते स्वीकारले. ‘माझ्या वयाची मुले मौजमजा करत असतांना मी थोडा वेळही ती का करायची नाही ?’, असा प्रश्न त्याने विचारला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने बुद्धीबळाचे प्रशिक्षण चालू ठेवले. त्याचे फळ त्याला आज मिळत आहे. एवढ्या लहान वयात जागतिक बुद्धीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आतापर्यंत ३ जण पोचले आहेत. प्रज्ञानंद हा चौथा खेळाडू. त्यामुळे त्याने गाठलेला पल्ला किती मोठा आहे, हे आपल्या लक्षात येईल. बुद्धीबळ हा भारतीय खेळ; मात्र भारतात दुर्लक्षित झालेला खेळ. विश्वनाथन् आनंद यांच्यामुळे या खेळाला भारतात पुन्हा लौकिक मिळाला. आता प्रज्ञानंद याच्या वाटचालीमुळे या खेळाला भारतात पुन्हा सुगीचे दिवस येतील.
सुसंस्कारी खेळाडू !
जगातील महान बुद्धीबळपटूंची सूची पुष्कळ मोठी आहे. कापाब्लांका, अलेक्सझेंडर अलेकाईन, व्लादिमिर क्रॅमनिक, अनातोली कारपोरोव्ह, गॅरी कॅसपेरोव्ह, बॉबी फिशर, विश्वनाथन् आनंद इत्यादी. या सूचीमध्ये पुढील काही वर्षांत प्रज्ञानंद याचे नावही अंतर्भूत झाले, तर नवल वाटणार नाही. प्रत्येक महान खेळाडूची खेळण्याची पद्धत वेगळी. कुणी आक्रमक, तर कुणी सौम्यपणे खेळून प्रतिस्पर्ध्यावर मात करणारा; मात्र सर्वांमध्ये एक समान गुण म्हणजे त्यांची बुद्धीबळाच्या ६४ घरांवर असलेली हुकूमत. ती गाजवण्याची क्षमता प्रज्ञानंद याच्यामध्येही दिसून येते. जगज्जेता होण्यासाठी अपार कष्ट घेण्याची सिद्धता लागते; मात्र त्याहून अधिक कठीण असते, ते स्वतःच्या गुणांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणे. प्रज्ञानंद असाच खेळत राहिला, तर पुढील काही वर्षांत तो नवनवीन जागतिक विक्रम करील. त्याही पुढे जाऊन बुद्धीबळ जगतात त्याला ‘सभ्य आणि सुसंस्कृत बुद्धीबळपटूू’ म्हणून ओळखले जाईल, हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते. केवळ बुद्धीबळच नव्हे, तर कुठल्याही खेळात अशी ओळख मिळवणे, हे पुष्कळ कठीण असते. बेशिस्त वर्तन, अहंकार यामुळे संबंधित खेळात प्रावीण्य असलेल्या बर्याच खेळाडूंचे आयुष्य वाया गेल्याची अनेक उदाहरणे आपण पहातो. बुद्धीबळपटूंच्या गुण-अवगुणांविषयी बोलायचे झाले, तर जगज्जेते बॉबी फिशर यांचे नाव येथे विशेषत्वाने घ्यावेसे वाटते. विद्युत्गतीने चाली खेळणे, आक्रमक खेळून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणे, ही त्यांच्या खेळाची वैशिष्ट्ये ! वयाच्या १५ व्या वर्षी फिशर यांनी अमेरिकन चॅम्पियनशिप जिंकली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. असे असले, तरी खेळाच्या व्यतिरिक्त ते गाजले, ते त्यांच्या फटकळ, उर्मट आणि उद्धट स्वभावामुळे. त्यांच्या या स्वभावामुळे पत्रकारांचे ते लाडके होते; कारण त्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे पत्रकारांना बरेच खाद्य मिळत असे. वर्ष १९५७ नंतर काही दशके त्यांनी बुद्धीबळ जगत अक्षरशः गाजवले. असे असले, तरी फटकळ स्वभावामुळे त्यांची कारकीर्द डागाळली. येथे फिशर आणि प्रज्ञानंद यांची तुलना करण्याचे कारण नाही; कारण प्रज्ञानंद याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तरीही बुद्धीबळाच्या पटलावर तुम्ही कसे खेळता, याहून अधिक आयुष्याच्या पटलावर तुम्ही कसे खेळता, हे अधिक महत्त्वाचे. आयुष्याच्या शेवटी बेरीज वजाबाकी करतांना याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. प्रज्ञानंद यामुळेच उठून दिसतो. येथे आणखी एका घटनेची उजळणी करावीशी वाटते. जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्याशी असलेल्या त्याच्या संभाषणाचा एक व्हिडिओ बर्याच कालावधी पूर्वी प्रसारित झाला होता. त्यात अनेक होतकरू बुद्धीबळपटू कार्लसन यांना प्रश्न विचारतांना दिसत आहेत. त्यात प्रज्ञानंद त्यांना काही प्रश्न विचारतो. यात त्याच्या मुखावर दिसणारी जिज्ञासा, विनम्रता बरेच काही सांगून जाते. वास्तविक पहाता आतापर्यंत कार्लसन आणि प्रज्ञानंद १९ वेळा समोरासमोर आले आहेत. त्यात कार्लसन ७ वेळा जिंकले आहेत, तर प्रज्ञानंद ५ वेळा; मात्र तरीही आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून शिकण्याची वृत्ती ठेवणे, हे विशेष आहे. केवळ खेळाचेच नव्हे, तर प्रज्ञानंद याला मिळालेल्या संस्कारांच्या शिदोरीमुळे तो बुद्धीबळ जगतात नक्कीच एक वेगळी छाप पाडेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
क्रीडा क्षेत्रात ‘महान’ असण्यासह विनम्र आणि सभ्य असणारे खेळाडूच क्रीडाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवतात ! |