आनंदी, सेवेची आवड आणि गुरूंप्रती भाव असलेली ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली यवतमाळ येथील कु. अनुष्‍का जयंत करोडदेव (वय १७ वर्षे) !

‘वर्ष २०१७ मध्‍ये ‘कु. अनुष्‍का जयंत करोडदेव उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आली असून तिची आध्‍यात्मिक पातळी ५५ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये तिची आध्‍यात्मिक पातळी ५६ टक्‍के झाली आहे. तिच्‍यावर पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्‍यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१३.७.२०२३)

सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’   

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 


पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. अनुष्‍का करोडदेव

कु. अनुष्‍का जयंत करोडदेव (वय १७ वर्षे) हिची तिच्‍या आईला लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

१. ‘कु. अनुष्‍का मनमोकळेपणाने बोलून सर्वांशी लवकर जवळीक साधते. ती नेहमी सकारात्‍मक असते.

२. आनंदी

मी माझ्‍या ताईकडे (सनातनच्‍या ११९ व्‍या (समष्‍टी) संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (मोठी बहीण)) गोवा येथे वास्‍तूशांतीला गेले असतांना तिथे काही संत आले होते. तेव्‍हा एक संत अनुष्‍काशी भ्रमणभाषवर बोलतांना म्‍हणाल्‍या, ‘‘तू किती आनंदी आहेस ?’’

सौ. सोनल करोडदेव

३. घरकामात साहाय्‍य करणे

अनुष्‍का घरकामात मला साहाय्‍य करते. मी सतत आजारी असते. तेव्‍हा तीच घरातील सर्व कामे करते. एकदा मला रुग्‍णालयात भरती केले असतांना ती घरचे आवरून माझी सेवा करायची. ती ‘घरातील काम म्‍हणजे आश्रमसेवा आहे’, असा भाव ठेवून करते.

४. धर्माचरण

ती प्रतिदिन कुंकू लावते आणि मैत्रिणींनाही अशा कृती करण्‍यास सांगते.

५. देवाची आवड

अनुष्‍का सकाळी अंघोळ केल्‍यावर गणपति स्‍तोत्र म्‍हणते.

६. सेवेची आवड

अनुष्‍का प्रसारात सूत्रसंचालन करणे, साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या सेवेसाठी साहाय्‍य करणे, पत्रक वाटप करणे’, अशा सेवा करते.

७. गुरूंप्रती भाव

अ. माझी मोठी बहीण पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्‍याकडे त्‍यांच्‍या घराच्‍या वास्‍तूशांतीच्‍या पूजेसाठी मी गेले होते. अनुष्‍काची बारावीची परीक्षा असल्‍याने तिला वास्‍तूशांतीसाठी येता आले नाही. तेव्‍हा मला वाटायचे की, ‘तिची आणि गुुरुमाऊलींची (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी) भेट होणार नाही.’ तेव्‍हा ती मला म्‍हणाली, ‘‘आई, तू गुरुमाऊलीला स्‍थुलातून भेटणार आहेस; परंतु ती सूक्ष्मातून माझ्‍या समवेतच आहे; कारण गुरुमाऊली माझ्‍या स्‍वप्‍नात आली होती आणि मला तिने स्‍वतःच्‍या हाताने दूध-भात भरवला.’’ त्‍या वेळी माझी भावजागृती झाली.

आ. अनुष्‍काची गुरूंवर पुष्‍कळ श्रद्धा आहे. ती सतत गुरुदेवांशी सूक्ष्मातून (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी) बोलते.

इ. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समवेत घेऊन ती अभ्‍यास करते. ती बालसाधकांच्‍या आढाव्‍यात लहान भावप्रयोग घेते आणि कृष्‍णाशी बोलते.

८. अनुष्‍का जेव्‍हा खोलीमध्‍ये अभ्‍यास करते, तेव्‍हा तिच्‍या खोलीमधून दैवी सुगंध येतो.

९. कु. अनुष्‍काचे स्‍वभावदोष

मोठ्याने बोलणे, आळस.’

– सौ. सोनल जयंत करोडदेव (कु. अनुष्‍काची आई), यवतमाळ (३१.३.२०२३)