हलगर्जीपणा चालणार नाही, एजन्सी नेमून स्वच्छता ठेवा ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह  

  • पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम !

  • स्वच्छतागृहे आणि शौचालये यांच्या अस्वच्छतेविषयी विभागप्रमुखांची कानउघाडणी


रत्नागिरी – सर्वच कार्यालय प्रमुखांनी कार्यालयात स्वच्छता, टापटीपपणा ठेवावा. तहसीलदार कार्यालय इमारतीमधील शौचालये आणि स्वच्छतागृहे यांच्याविषयी अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. त्याविषयी एजन्सी नेमून स्वच्छता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिले. याच वेळी त्यांनी ‘उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या पाठीमागे असणार्‍या शौचालयात सापडलेल्या देशी दारूच्या बाटल्यांविषयी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी तात्काळ लेखी खुलासा करण्याचे आदेशही उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले आहेत.

तहसीलदार कार्यालय इमारतीमधील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेविषयी पत्रकारांनी स्वच्छता करून आंदोलन केले. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सिंह यांनी सर्वच विभागप्रमुखांची तातडीने बैठक घेऊन त्यांची कानउघाडणी केली.

जिल्हाधिकारी सिंह पुढे म्हणाले की,

१. कार्यालय हेही आपले घर आहे. घराप्रमाणेच कार्यालयेही स्वच्छ असावीत. आपल्या मजल्यावरील स्वच्छतागृहे आणि शौचालये यांची स्वच्छता ठेवणे, हेही आपले कर्तव्य आहे.

२. पत्रकारांनी येऊन त्याची स्वच्छता करणे ही गोष्ट आपल्यासाठी भूषणावह नाही.

३. सर्वच प्रशासकीय इमारतीमधील कार्यालय प्रमुखांनी शौचालये, स्वच्छतागृहांमधील स्वच्छतेविषयी सजग असायला हवे.

४. ज्या इमारतीमध्ये ज्या मजल्यावर शौचालये आणि स्वच्छतागृहे आहेत त्याचे दायित्व  त्या त्या कार्यालय प्रमुखांनी घ्यावे. कामानिमित्त येणारे अभ्यागत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी याची स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे.