(म्हणे) ‘पू. संभाजी भिडेगुरुजी यांना गोव्यात येण्यापासून रोखा !’ – गोवा काँग्रेस

हिंदुद्वेषाने पछाडलेल्या काँग्रेसला पोटशूळ !

पू. संभाजीराव भिडे गुरुजी

पणजी, २२ ऑगस्ट (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख पू. संभाजी भिडेगुरुजी २४ ऑगस्ट या दिवशी गोवा दौर्‍यावर येणार आहेत. पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे २४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ वाजता समर्थगड, मडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी गोमंतकातील मठ-मंदिर आणि हिंदु धर्म रक्षणार्थ दिलेले योगदान आणि पोर्तुगीजकालीन विध्वंस झालेल्या मंदिराची पुनर्स्थापना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा काँग्रेस समितीने ‘पू. संभाजी भिडेगुरुजी हे चिथावणीखोर वक्तव्ये करण्यास कुप्रसिद्ध आहे’, असा आरोप करून त्यांना गोव्यात येण्यास बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

गोवा काँग्रेस समितीच्या मते सध्या गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणे, शंखवाळ येथील चॅपलच्या आवारात मूर्तीची स्थापना करणे आदी विषयांवरून वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर पू. संभाजी भिडेगुरुजी यांचा गोवा दौरा होत आहे. पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी यापूर्वी राष्ट्रपुरुष आणि समाजसुधारक यांचा अवमान करणारी विधाने केली आहेत आणि महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत. पू. संभाजी भिडे गुरुजी यांच्या यापूर्वीच्या वक्तव्यांचा आढावा घेतल्यास त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने यापूर्वी केलेली आहेत. गोव्यातही त्यांनी अशीच विधाने केल्यास गोव्यातील शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडू शकतो. यामुळे प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा ‘श्रीराम सेने’चे श्री. प्रमोद मुतालिक यांना ज्याप्रमाणे गोव्यात प्रवेशबंदी केली आहे, त्याचप्रमाणे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनाही गोव्यात प्रवेशबंदी करावी.

संपादकीय भूमिका

एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा करणार्‍या काँग्रेसला हिंदु धर्माविषयी बोलणार्‍यांना विरोध का ?