रत्नागिरी – डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने संशोधित केलेली ‘रत्नागिरी-८’ या जातीच्या लागवडीकडे कल वाढला आहे. चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा आणि १३५ दिवसांत सिद्ध (तयार) होणार्या ‘रत्नागिरी-८’ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह सर्वदूर पोचली आहे. राष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली ही जात असल्यामुळे देशातील काही खासगी आस्थापने आणि विद्यापिठाच्या मान्यतेने ‘रत्नागिरी-८’ बियाणे सिद्ध करण्यात आले आहे. यावर्षी वाणाची ८० टन एवढी विक्रमी विक्री झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव भात संशोधन केंद्राच्या वतीने वर्ष २०१९ मध्ये ‘रत्नागिरी-८’ हे वाण विकसित केले. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या ५ जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली असून, कोकणासह विदर्भातही मागणी आहे. या वाणाला उत्तरप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगाणा या राज्यांतूनही पसंती मिळाली आहे. बदलत्या हवामानात टिकणारी ही योग्य जात असून उशिराने पडणार्या पावसाचा फटका या पिकाला बसत नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या बियाण्याची लागवड केली जाते. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी रत्नागिरी आणि फोंडा (सिंधुदुर्ग) केंद्रांवर मिळून ८० टन बियाण्यांची विक्री झाली. गतवर्षी ५० टन विक्री झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणी वाढली आहे. यावर्षी बियाण्याची कमतरता भासल्याने अधिकची मागणी देता आली नाही. ‘सुवर्णा’ या जातीला पर्याय म्हणून ‘रत्नागिरी-८’ ही जात विकसित केली.
‘रत्नागिरी-८’ या वाणाला परराज्यातही पसंती ! – डॉ. विजय दळवी
याविषयी शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी म्हणाले की, कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत शिरगाव भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या ११ जाती आणि १ संकरित जात विकसित केली आहे. ‘रत्नागिरी-१’ हे वाण जुने असून, देशासमवेतच अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत या वाणाने लोकप्रियता मिळवली असतांना आता ‘रत्नागिरी-८’ या वाणाला परराज्यातही पसंती मिळाली आहे. वाढत्या मागणीमुळेच विक्रमी विक्री होऊ शकली आहे.