सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’त ‘अच्‍युताष्‍टकम्’वरील भावपूर्ण नृत्‍य सादर करणार्‍या साधिकांनी अनुभवलेला भावभक्‍ती आणि आनंद यांचा वर्षाव !

नृत्‍यातील सहभागी साधिकांनी अनुभवले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीमन्‍नारायणस्‍वरूप !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधकांवर भावभक्‍तीचा वर्षाव करणारा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्‍सव ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथे साजरा झाला. या सोहळ्‍याची सांगता साधिकांनी सादर केलेल्‍या ‘अच्‍युताष्‍टकम्’वरील भावपूर्ण नृत्‍याने झाली. नृत्‍यसेवेत सहभागी झालेल्‍या साधिकांना नृत्‍य करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

(भाग १)

१. कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

कु. अपाला औंधकर

१ अ. ‘नृत्‍य करतांना समोर साक्षात् परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या रूपात भगवंतच विराजमान होता. ‘त्‍यांच्‍या दिव्‍य रथातून पुष्‍कळ पिवळा प्रकाश बाहेर पडत आहे आणि जणू तो रथ संपूर्ण ब्रह्मांडात दैदिप्‍यमान झाला आहे’, असे मला जाणवले.

१ आ. ‘रथाच्‍या पुढच्‍या बाजूला असलेली गरुडदेवाची मूर्ती सजीव असून त्‍याच्‍या पंखांतून किरण बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवले.

१ इ. ‘आम्‍ही नृत्‍यसेवा करत होतो, ती वेळ पृथ्‍वीलोकातील नसून वैकुंठलोकातील आहे’, असे मला जाणवले.

१ ई. नृत्‍य करतांना साक्षात् श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुदेवांना पाहून प्रार्थना करणे आणि त्‍या वेळी त्‍यांनी माझ्‍याकडे पाहून स्‍मितहास्‍य करणे : नृत्‍य करतांना नृत्‍याच्‍या शेवटी मी ‘गरुडदेवा’ची मुद्रा करते आणि माझ्‍या पाठीमागून एक साधिका विष्‍णूचे रूप दाखवते. सोहळ्‍याच्‍या आधी सराव करतांना मला सतत वाटायचे, ‘मला गरुडदेव बनायचे आहे आणि तेव्‍हा नारायणाला यावेच लागेल !’ ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी साक्षात् श्रीमन्‍नारायणस्‍वरूप गुरुदेवांना माझ्‍या समोर पाहून शेवटची गरुडदेवाची मुद्रा केल्‍यावर माझ्‍याकडून पुढील प्रार्थना झाली, ‘हे श्रीहरि, हे पद्मनाभा, हे लक्ष्मीकांता, माझे अस्‍तित्‍व काहीच नको. माझ्‍यात पंख हालवण्‍याचीही शक्‍ती नाही. तू सदैव माझ्‍या पाठीशी आहेस. मला तुझ्‍या चरणांची सेवा अखंड करता येऊ दे.’ तेव्‍हा मी गुरुदेवांकडे स्‍थुलातून पाहिले आणि त्‍या वेळी त्‍यांनीही माझ्‍याकडे पाहून स्‍मितहास्‍य केले.’

२. कु. शर्वरी कानस्‍कर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

कु. शर्वरी कानस्कर

अ. ‘नृत्‍यसेवा करतांना ‘नृत्‍य आकाशात होत आहे’, असे मला वाटले.

आ. नृत्‍य चालू असतांना ‘तेथे साक्षात् नारायणस्‍वरूप गुरुदेव, महालक्ष्मीस्‍वरूप श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या समवेत सप्‍तर्षी, देवता अन् पंचमहाभूतेही उपस्‍थित आहेत’, असे मला जाणवले.

इ. ‘नृत्‍य करतांना गुरुदेवांच्‍या चरणी ‘तन’ अर्पण होत आहे आणि त्‍यासह गुरुदेवांना पाहिल्‍यावर ‘मन’ही त्‍यांच्‍या चरणी अर्पण झाले’, असे मला जाणवले.

ई. ‘नृत्‍यातील प्रत्‍येक मुद्रा म्‍हणजे एक पाकळी आहे आणि अनेक मुद्रांनी बनलेले एक भावपुष्‍पच गुरुदेवांच्‍या चरणी अर्पण झाले आहे’, असे मला वाटले.

उ. ‘नृत्‍यसेवेतून तन, मन, बुद्धी आणि गुरुदेवांच्‍या प्रतीचा भाव, असे सर्वकाही त्‍यांच्‍याच चरणी अर्पण होत आहे’, असा विचार माझ्‍या मनात आला.

ऊ. ‘नृत्‍य झाल्‍यानंतर गुरुदेवांच्‍या चरणी नृत्‍य हे पुष्‍प म्‍हणून अर्पण झाले’, असे मला वाटले.

‘हे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, ‘आपल्‍याच कृपेने मला ही सेवा करता आली आणि अनेक अनुभूती आल्‍या’, याबद्दल हे कृपाळू भगवंता, आपल्‍या ब्रह्मांडव्‍यापी कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

३. कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

कु. म्रिणालिनी देवघरे

अ. ‘ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी आम्‍हाला कळले, ‘आता नृत्‍यगटाने नृत्‍यसेवेसाठी सिद्ध रहायचे आहे.’ तेव्‍हा मला आनंद झाला आणि मनातून थोडी भीतीही वाटत होती. व्‍यासपिठाजवळ जाईपर्यंत माझ्‍या मनात विचार येत होते, ‘सर्व नीट होईल ना ? काही चूक होणार नाही ना ?’ व्‍यासपिठावर गेल्‍यावर माझ्‍या मनातील सर्व विचार क्षणात नाहीसे झाले आणि माझ्‍यात उत्‍साह निर्माण होऊन मला आतून आनंद जाणवू लागला.

आ. व्‍यासपिठावर गेल्‍यावर ‘आपण पृथ्‍वीवर नसून एका वेगळ्‍याच उच्‍च लोकात गेलो आहोत, तसेच माझ्‍या शरिरात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली’, असे मला जाणवले.

इ. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना नमस्‍कार करतांना ‘त्‍यांच्‍याकडे बघतच रहावे’, असे मला वाटत होते.

ई. ‘रथात लावलेल्‍या दिव्‍यामुळे नाही, तर गुरुदेवांच्‍या तेजामुळे रथ प्रकाशमान झाला आहे’, असे मला वाटले.

उ. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना पाहून मला पुष्‍कळ आनंद झाला.

ऊ. नृत्‍य चालू झाल्‍यावर मला माझे अस्‍तित्‍व जाणवत नव्‍हते. केवळ ‘गुरुदेवांनी दिलेल्‍या ऊर्जेवर नृत्‍य होत आहे’, असे मला जाणवले.

ए. ‘प्रत्‍येक मुद्रा आणि पदन्‍यास करतांना त्‍यांतून आनंदाची स्‍पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.

ऐ. नृत्‍याच्‍या एका रचनेत गोलात येऊन टाळ्‍या (हातांत टाळ न घेता टाळ वाजवण्‍याची कृती करतांना) वाजवतांना ‘आम्‍ही सर्व जणी आकाशात, हवेत तरंगत नृत्‍य करत आहोत’, असे मला वाटले.

ओ. नृत्‍याच्‍या शेवटी दशावतार सादर करतांना प्रत्‍येक साधिका एकेक करून श्रीविष्‍णूचा अवतार साकारत होती. आम्‍ही सर्व जणी आपापल्‍या श्रीविष्‍णूच्‍या अवताराच्‍या मुद्रेत बसलो होतो. सर्वांत शेवटी ‘श्रीविष्‍णु आला’, असे दाखवले. तेव्‍हा ‘एक क्षण सर्व सृष्‍टी थांबली आहे’, असे मला वाटले.

औ. त्‍या वेळी मला ‘याच स्‍थितीत राहूया. यातून बाहेर यायला नको’, असे वाटले.

अं. ‘नृत्‍यातील ती ७ मिनिटे एका वेगळ्‍याच भावस्‍थितीत आणि वेगळ्‍याच लोकात गेली’, असे मला जाणवले.

क. नृत्‍य संपल्‍यावरही ‘नृत्‍य झाले’, असे मला वाटतच नव्‍हते. काही वेळ माझ्‍या मनाची तीच भावस्‍थिती टिकून होती.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १५.५.२०२३)

४. कु. विशाखा चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कु. विशाखा चौधरी

४ अ. नृत्‍याचा सराव करतांना

४ अ १. मन सकारात्‍मक आणि शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असणे : ‘नृत्‍याचा सराव करतांना पहिले काही दिवस मला नृत्‍यातील मुद्रा आणि पदन्‍यास करायला जमत नव्‍हते; पण तेव्‍हा माझे मन नकारात्‍मक न होता ‘देवासाठी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासाठी) नृत्‍य करायला शिकायला हवे. मी अजून कसे प्रयत्न केले पाहिजेत ?’, या विचाराने इतर साधिकांकडून शिकून मी त्‍याचा सराव करायचे. त्‍यातून मला एक वेगळाच आनंद मिळत होता.

४ अ २. सहसाधिकांनी केलेल्‍या साहाय्‍यामुळे ताण न येता शिकण्‍याचा आनंद मिळणे : नृत्‍य करतांना इतर साधिकांना ‘माझी किंवा अन्‍य साधिकेची नृत्‍याची रचना (मुद्रा आणि  पदन्‍यास) चुकत आहे’, असे लक्षात आल्‍यावर त्‍या तो भाग केवळ सांगून सोडून देत नव्‍हत्‍या. ‘साधिकेला नृत्‍यातील ती रचना कुठल्‍या पद्धतीने सराव केल्‍यावर जमेल ?’, अशा पद्धतीने त्‍या ती करून दाखवत होत्‍या. त्‍यामुळे ताण न येता मला शिकण्‍याचा आनंद घेता आला.

४ आ. नृत्‍याचा सराव करतांना आलेल्‍या अनुभूती

अ. सराव करतांना सर्वांना एकदा चंदन आणि एकदा धूप यांचा पुष्‍कळ सुगंध आला.

आ. ‘प्रत्‍येक दिवशी सरावानंतर मनातील आनंद आणि भावस्‍थिती वाढत आहे’, असे माझ्‍या लक्षात आले.

इ. प्रत्‍येक दिवशी नृत्‍याचा सराव करतांना आम्‍हा १२ जणींची मने जुळत गेली. त्‍यामुळे सर्वांकडून नृत्‍य एकसारखे आणि एका लयीत होत होते.

४ इ. ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी नृत्‍य करतांना मन आनंदाच्‍या स्‍थितीत असण्‍याचे कारण देवाने सूक्ष्मातून सांगणे : इतर दिवशी नृत्‍य करतांना भावजागृती होऊन माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू यायचे; पण ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी नृत्‍यसेवा करतांना माझे मन केवळ आनंदाच्‍या स्‍थितीत होते. देवाने सूक्ष्मातून मला याचे कारण सांगितले, ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे आनंदस्‍वरूप आहेत; म्‍हणून त्‍यांच्‍या समोर नृत्‍य करतांना आनंदाची अनुभूती आली.’

‘हे गुरुदेवा, ‘तुमच्‍या कृपेमुळे ही नृत्‍यसेवा शिकून तुमच्‍या चरणी समर्पित करता आली’, याबद्दल मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’ (१६.५.२०२३) ॐ

(क्रमशः पुढच्‍या रविवारी)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक