जगभर ‘सनातन धर्मा’चा जागर होत आहे ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ता, भाजप

पुणे येथील ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ सोहळा !

कार्यक्रमस्थळी उपस्थित श्री शहजाद पुनावाला (मध्यभागी) आणि अन्य मान्यवर व पुरस्कार विजेते

पुणे, १९ ऑगस्ट (वार्ता.) – आज संपूर्ण जगावर ‘सनातन धर्म’ स्वत:ची छाप सोडत आहे. ‘सनातन धर्मा’चा सर्वत्र जागर होत आहे. ज्या देशाने आपल्यावर १५० वर्षे राज्य केले, त्या देशाचा पंतप्रधान ‘हिंदु’ आहे. ज्याच्या नावात ‘ऋषी’ आहे, त्यांच्या बोलण्यातून ‘सनातन धर्मा’चे विचार प्रसारित होतात, त्यांना ‘हिंदु धर्मा’चा अभिमान आहे. त्या ‘इंग्लंड’ देशाला मागे सारत आपण जगातील ५वी अर्थव्यवस्था निर्माण करू शकलो, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केले. ते फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘अ‍ॅम्फी थिएटर’मध्ये ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ सोहळ्यात बोलत होते. ‘विश्व संवाद केंद्र, पश्चिम महाराष्ट्र’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ यांनी संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता. यावर्षी ‘दिव्य मराठी’चे अहिल्यानगर येथील अनिरुद्ध देवचक्के, ‘झी २४ तास’चे अरुण मेहेत्रे, ‘पुढारी’च्या सुषमा नेहरकर आणि ‘सामाजिक माध्यमा’तून आशुतोष मुगळीकर यांना ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

शहजाद पुनावाला पुढे म्हणाले की, देवर्षी नारद यांच्या नावावरून काही लोक टीका करतात; परंतु त्यांना त्यांचे महत्त्व कळून येत नाही. देवर्षी नारदमुनी हे खरे आदर्शवादी पत्रकार होते. त्यांच्यामध्ये उत्तम संवाद, जिज्ञासा, स्पष्टता, वचनबद्धता, सत्यता, वास्तववादी आणि आदर्श जीवन जगणे, असे गुण दिसून येतात. आज देशाला प्रखर राष्ट्रवादी आणि देशभक्ती विचारांना पाठबळ देणारी पत्रकारिता हवी आहे. राष्ट्रीय विचार, राष्ट्रभावना जागृत करणार्‍या आणि तेवत ठेवणार्‍या विचारांची आवश्यकता आहे.