ब्रिटनमध्ये ७ नवजात मुलांच्या हत्येच्या प्रकरणी परिचारिका दोषी

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमधील लुसी लेटबी (वय ३३ वर्षे) या परिचारिकेला ७ नवजात मुलांची हत्या आणि अन्य ६ मुलांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लुसी हिला २१ ऑगस्ट या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. ज्या मुलांच्या हत्येच्या प्रकरणी लुसी हिला दोषी ठरवण्यात आले आहे, त्यांतील काही मुले आजारी होती, तर काही अकाली जन्मलेली होती.

तिने जून २०१५ ते जून २०१६ या कालावधीत उत्तर-पश्‍चिम इंग्लंडमधील काउंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयात या हत्या केल्या. तिला आतापर्यंत ३ वेळा अटक करण्यात आलेली आहे. लुसी हिच्या घरातून पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीवर ‘मी दुष्ट आहे, मीच हे केले’ असे लिहिले होते.