गोवा : ‘पेपर स्प्रे’चा वापर करणारे ५ विद्यार्थी विद्यालयातून एक मासासाठी निलंबित

डिचोली येथील विद्यालयात विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास झाल्याचे प्रकरण

शाळेचे प्राचार्य (मध्यभागी)

डिचोली, १८ ऑगस्ट (वार्ता.) – येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात ‘पेपर स्प्रे’ प्रकरणावरून एका विद्यार्थिनीसह ५ संशयित विद्यार्थ्यांना एका मासासाठी विद्यालयातून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची विद्यालयाच्या शिस्तपालन समितीने गंभीर नोंद घेऊन या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. अन्वेषणानंतर दोषी आढळणार्‍या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत या समितीने दिले आहेत.

(सौजन्य : Goa 365 TV) 

उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला विभागाच्या ११ वी इयत्तेच्या वर्गात ११ विद्यार्थिनींना १७ ऑगस्ट या दिवशी वर्ग चालू असतांना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. १० विद्यार्थिनींना नंतर रुग्णालयात भरती करण्यात आले. एका बाधित विद्यार्थिनीला पुन्हा त्रास होऊ लागल्याने तिला १७ ऑगस्टच्या रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा भरती करण्यात आले. अन्य विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. विद्यालयात १७ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे शाळेच्या पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. १८ ऑगस्ट या दिवशी पालकांनी विद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे घटनेविषयी स्पष्टीकरण मागितले, तसेच कडक उपाययोजना करण्याची मागणी केली. शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर यांनी १८ ऑगस्ट या दिवशी सकाळी विद्यालयाला भेट देऊन विद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, शिस्तपालन समिती आणि पालक-शिक्षक संघ यांची बैठक घेऊन झालेल्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेतली. राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही विद्यालयाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

‘पेपर स्प्रे’ म्हणजे काय ?

‘पेपर स्प्रे’ हा अडचणीच्या प्रसंगी आत्मसंरक्षणासाठी वापरण्यात येतो. यामध्ये ‘ओलिओरेसिन कॅप्सिकम्’ हा घटक असतो. ‘ओलिओरेसिन कॅप्सिकम्’ हे अनेक प्रकारच्या गरम मिरच्यांमध्ये आढळणारे नैसर्गिक तेल आहे, तसेच ‘पेपर स्प्रे’मध्ये अन्य एक घटक अत्यंत दाहक असतो. ज्यामुळे डोळे आणि श्वसनमार्ग यांना अडथळा निर्माण होत असतो.

सविस्तर वृत्त वाचा –

भर वर्गात विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास : डिचोली (गोवा) येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील घटना
https://sanatanprabhat.org/marathi/712002.html