झोकून देऊन सेवा करणारे आणि साधकांमध्‍ये सेवेची तळमळ निर्माण करून त्‍यांना घडवणारे ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. चेतन राजहंस (वय ४० वर्षे) !

‘फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ या कालावधीत हरिद्वार येथे कुंभमेळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या कालावधीत मला सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस यांच्‍या समवेत सेवा करण्‍याची संधी मिळाली.

श्रावण शुक्‍ल तृतीया (१९.८.२०२३) या दिवशी श्री. चेतन राजहंस यांचा वाढदिवस आहे. त्‍या निमित्त कुंभमेळ्‍याच्‍या वेळी त्‍यांच्‍या समवेत सेवा करतांना मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. चेतन राजहंस यांना ४० व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

श्री. चेतन राजहंस

१. कोरोना महामारीमुळे हरिद्वार येथे कुंभमेळा होण्‍याची निश्‍चिती नसतांनाही श्री. चेतन यांनी साधकांना कुंभमेळ्‍याच्‍या सेवेविषयी सकारात्‍मक रहाण्‍यास सांगणे

‘कोरोना महामारीमुळे हरिद्वार येथे कुंभमेळा होईल कि नाही ?’, याची निश्‍चिती नव्‍हती. याविषयी शासनाकडून स्‍पष्‍टपणे सांगितले जात नव्‍हते; पण चेतनदादा कुंभमेळ्‍याच्‍या सेवेसंबंधी नेहमीच सकारात्‍मक होता, तसेच तो याविषयी सर्व साधकांनाही सकारात्‍मक रहाण्‍यास सांगत असे. तो आम्‍हाला सांगायचा, ‘‘आपल्‍याला कुंभमेळ्‍यात सर्व सेवा करायच्‍या आहेत. गुरुकार्याचा प्रसार करायचा आहे.’’ त्‍यामुळे आमच्‍या मनात उत्‍साह निर्माण होत असे. त्‍यानंतर आम्‍हाला ‘कुंभमेळ्‍याच्‍या सेवेसाठी हरिद्वारला जायचे आहे’, असे समजले. तेव्‍हा आम्‍हाला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली आणि आमचा सेवेतील उत्‍साह वाढला.

२. सेवेची तळमळ

२ अ. चेतनदादा प्रकृती बरी नसल्‍याने रुग्‍णालयात उपचार घेऊन घरी येणे आणि त्‍या वेळी विश्रांती घेत असतांना कुंभमेळ्‍याच्‍या संदर्भातील सेवा करणे : कुंभमेळ्‍याच्‍या सेवेला जाण्‍यापूर्वी चेतनदादा पुष्‍कळ रुग्‍णाईत होता. तो नुकताच रुग्‍णालयात उपचार घेऊन घरी आला होता. आधुनिक वैद्यांनी त्‍याला विश्रांती घेण्‍यास सांगितले होते. त्‍या वेळी दादा विश्रांती घेत असतांनाच ‘कुंभमेळ्‍याच्‍या सेवेच्‍या आयोजनासाठी सत्‍संग घेणे, साधकांच्‍या सेवांचे नियोजन करणे’, अशा सेवा करत होता.

२ आ. कुंभमेळ्‍याला जाण्‍यापूर्वी मोठा प्रवास करून आल्‍यावरही विश्रांती न घेता जिज्ञासूंना संपर्क करण्‍यास प्राधान्‍य देणे : आम्‍ही कुंभमेळ्‍याच्‍या सेवेला जाण्‍यासाठी मुंबईहून आगगाडीने जाणार होतो. आमची गाडी रात्री १२ वाजता होती. प्रवासाच्‍या आदल्‍या दिवशी दादा गोव्‍याहून चारचाकी गाडीने देवद (पनवेल) येथे आला. तो दुसर्‍या दिवशी मुंबईला गेला आणि त्‍याने विश्रांती न घेता दिवसभर मुंबईमधील जिज्ञासूंना संपर्क करण्‍याची सेवा केली. संपर्कांची सेवा पूर्ण करून तो हरिद्वार येथे जाण्‍यासाठी रात्री थेट आगगाडी स्‍थानकावर आला.

२ इ. प्रवासातही साधकांच्‍या सेवांचे नियोजन करणे आणि त्‍यांच्‍या अडचणी सोडवणे : दादाने आगगाडीच्‍या प्रवासातही आमच्‍या सेवांचे पुढील नियोजन करून घेतले, तसेच महत्त्वाचे ई-मेल पाठवले. दादाने त्‍याच्‍या समवेत असणार्‍या साधकांच्‍या अडचणी जाणून घेतल्‍या आणि त्‍यांच्‍या मनात असणार्‍या शंका अन् अडचणी यांवर योग्‍य पद्धतीने मार्गदर्शन केले.

२ ई. हरिद्वारला पोचल्‍यावर विश्रांती न घेता सेवेला आरंभ करणे : आम्‍ही अनुमाने ३२ घंटे प्रवास करून सकाळी हरिद्वारला पोचलो. त्‍या वेळी देहली येथील साधक आमच्‍या आधी सेवेसाठी हरिद्वारला पोचले होते. ‘त्‍या साधकांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच सेवा वेळेत पूर्ण व्‍हावी’, यासाठी दादा अंघोळ करून लगेच सेवेला बाहेर पडला. ‘मोठा प्रवास करून आलो आहे किंवा प्रवासात झोप झाली नाही. त्‍यामुळे एक दिवस विश्रांती घेऊया’, असा विचार त्‍याच्‍या मनात आला नाही.

३. कुंभमेळ्‍याची सेवा परिपूर्ण होण्‍यासाठी श्री. चेतन यांनी तळमळीने केलेले प्रयत्न !

३ अ. सेवेचे नियोजन करतांना सहसाधकांना सहभागी करून घेणे आणि प्रत्‍येक कृती उत्तरदायी साधकांना विचारून करणे : चेतनदादा आम्‍हाला समवेत घेऊन सेवेचे नियोजन करत असे, तसेच ‘एखाद्या साधकाला कोणती सेवा द्यावी ?’, याविषयी तो आमचे मत घेत असे. त्‍यानंतर जी काही निर्णयप्रक्रिया होईल, त्‍यामागील दृष्‍टीकोनही तो आम्‍हाला सांगत असे. यामधून ‘गुरुदेवांचा व्‍यापक दृष्‍टीकोन आमच्‍या लक्षात यावा आणि आम्‍ही त्‍यातून शिकावे’, हा दादाचा उद्देश असे. एखादे सूत्र आमच्‍या लक्षात येत नसेल, तर तो आम्‍हाला त्‍याविषयी उत्तरदायी साधकांना विचारण्‍यास सांगत असे. दादाने आम्‍हाला ‘स्‍वतःच्‍या मनाने काहीच करायचे नाही’, हे सूत्र शिकवले.

३ आ. प्रसाराच्‍या सेवेसाठी साधकांची सिद्धता करून घेण्‍यासाठी अभ्‍यासवर्ग घेणे : कुंभमेळ्‍याच्‍या सेवेसाठी वेगवेगळ्‍या जिल्‍ह्यांतून साधक आले होते. त्‍यांतील पुष्‍कळसे साधक प्रासंगिक सेवा करणारे होते किंवा त्‍यांनी प्रसाराची सेवा फारशी केली नव्‍हती. ‘सर्व साधकांना चांगल्‍या पद्धतीने प्रसार करता यावा’, यासाठी दादाने साधकांचा अभ्‍यासवर्ग घेतला. यामध्‍ये त्‍याने ‘उत्तर भारत आणि हरिद्वार येथे प्रसार करतांना कोणती काळजी घ्‍यायला हवी ? हरिद्वारमधील विविध स्‍थानांचे माहात्‍म्‍य काय आहे ? गंगानदी आणि कुंभ यांचे माहात्‍म्‍य काय ?’, यांविषयी साधकांना माहिती दिली अन् साधकांची सिद्धता करून घेतली. दादाने ‘कुंभमेळ्‍यात सेवा केल्‍याने काय लाभ होतो ? सेवा करतांना भाव कसा ठेवायला हवा ?’, यांविषयी सर्व साधकांचा सखोल अभ्‍यास करून घेतला.

३ इ. श्री. चेतन यांनी घेतलेल्‍या अभ्‍यासवर्गामुळे साधकांचा आत्‍मविश्‍वास आणि सेवेतील उत्‍साह वाढणे : चेतनदादाने घेतलेल्‍या या अभ्‍यासवर्गाचा सर्व साधकांना पुष्‍कळ लाभ झाला. सर्व साधकांनी सांगितले, ‘‘आतापर्यंत आम्‍ही अशी सेवा केली नव्‍हती. ‘आम्‍हाला ग्रंथांची माहिती सांगायला जमणार नाही’, असे वाटायचे; पण चेतनदादांनी घेतलेल्‍या अभ्‍यासवर्गामुळे आम्‍हाला ते शिकायला मिळाले आणि आमचा आत्‍मविश्‍वास वाढला.’’ अनेक साधकांना हिंदी चांगल्‍या पद्धतीने बोलता येत नव्‍हते; पण अभ्‍यासवर्गामुळे सर्वांनी त्‍यावर मात करून प्रसाराची सेवा उत्‍साहाने केली.

३ ई. अल्‍प कालावधीत साधकांशी जवळीक साधणे आणि त्‍यांना आधार देणे : चेतनदादाने अल्‍प कालावधीमध्‍ये वेगवेगळ्‍या जिल्‍ह्यांतून आलेल्‍या साधकांशी जवळीक साधली. ‘साधक कोणत्‍या जिल्‍ह्यातून आले ?  त्‍या साधकाचे गुण-दोष काय आहेत ?’, हे सर्व दादाने अल्‍प कालावधीत जाणून घेतले. दादा साधकांच्‍या अडचणी जाणून घेऊन त्‍यांच्‍याशी संवाद साधत असे. त्‍यामुळे सर्व साधकांना दादाचा आधार वाटत असे. सर्व साधक दादाशी मोकळेपणाने बोलून अडचणी आणि त्‍यांच्‍याकडून झालेल्‍या चुकाही सांगत असत.

३ उ. अल्‍पाहार आणि जेवण यांची व्‍यवस्‍था झालेल्‍या मठात जाण्‍यापूर्वी साधकांना आवश्‍यक अशा सूचना देणे : गुरुकृपेने साधकांचा अल्‍पाहार आणि जेवण यांची व्‍यवस्‍था हरिद्वारमधील एका मठात झाली होती. अल्‍पाहारासाठी साधारण २५ साधक मठात जाणार होते. ‘मठामध्‍ये गेल्‍यानंतर आपले आचरण कसे असायला हवे ? साधकांनी कोणती काळजी घ्‍यावी ?’, या सर्व सूचना दादाने साधकांना दिल्‍या.

४. जेवणासाठी मठात गेल्‍यावर तेथे विविध सेवा स्‍वतः करणे आणि इतरांनाही करायला सांगणे

आम्‍ही जेवायला मठात जात होतो. तेथे मठातील सेवक आम्‍हाला जेवण वाढत होते. तेव्‍हा चेतनदादांनी सर्व साधकांना सांगितले, ‘‘आपण गुरुदेवांचे सेवक आहोत. आपणही दिसेल ती सेवा करायला हवी.’’ ‘बसायला सतरंजी घालणे, ताटे ठेवणे, पाणी वाढणे’, या सर्व सेवा चेतनदादाने स्‍वतः केल्‍या आणि सर्व साधकांना कृतीतून शिकवले. ‘गुरुदेवांनी आपल्‍याला जे शिकवले आहे, ते प्रत्‍येक साधकाच्‍या आचरणात यावे’, असा दादाचा प्रयत्न होता.

५. अहं अल्‍प असल्‍याने सर्व प्रकारच्‍या सेवा सहजतेने करणे

‘कुंभमेळ्‍यामध्‍ये संपर्क करणे, नियोजनाचे सत्‍संग घेणे, साधकांचे नियोजन करणे, सोशल मिडियासाठी मुलाखत देणे, वृत्त बनवणे, प्रदर्शनासाठी तंबू उभारणे, पटांगणाची स्‍वच्‍छता करणे, रुग्‍ण साधकांना डबा देणे, काही साधकांना चहा करून देणे, भोजन वाढणे, प्रदर्शन दाखवणे, अडचणींवर आध्‍यात्मिक उपाय विचारणे आणि ते करणे’, अशा सर्वच सेवा दादा करत होता. त्‍या वेळी ‘मी सनातन संस्‍थेचा राष्‍ट्रीय प्रवक्‍ता आहे किंवा माझ्‍याकडे सेवांचे दायित्‍व आहे’, असा विचार त्‍याच्‍या मनात नव्‍हता. दादा प्रत्‍येक सेवेचा आढावा उत्तरदायी साधकांना देत असे.

६. समाजातील व्‍यक्‍तींशी पहिल्‍या भेटीतच जवळीक होणे आणि त्‍यांच्‍या मनात गुरुदेवांप्रती आदर निर्माण होऊन त्‍यांनी धर्मकार्यात उत्‍स्‍फूर्त सहभाग घेणे

हरिद्वारमध्‍ये सेवा करतांना चेेतनदादा अनेक नवीन आश्रमांतील उत्तरदायी व्‍यक्‍तींना संपर्क करत असे. दादा प्रत्‍यक्षात प्रथमच या सर्वांना भेटला होता; पण या सर्वांशी दादाची पहिल्‍याच भेटीत जवळीक झाली. दादा प्रत्‍येकाला संपर्क करतांना ‘गुरुदेवांनी सर्वांना कसे एकत्र आणले ? कसे शिकवले ?’, हे सांगत असे. त्‍यामुळे समाजातील व्‍यक्‍तींच्‍या मनातही गुरुदेवांप्रती आदर निर्माण झाला. काही जणांनी साधकांच्‍या निवासासाठी त्‍यांचे आश्रम उपलब्‍ध करून दिले. काही जणांनी साधकांच्‍या जेवणाची सोय केली. काही जणांनी साधकांना भेटून त्‍यांचे कौतुकही केले. हरिद्वारहून निघतांना दादाने काही जणांची भेट घेतली. त्‍या वेळी तेथील एकाने दादाला सांगितले, ‘‘तुम्‍ही आमच्‍या मनात स्‍थान निर्माण केले आहे. त्‍यामुळे आम्‍ही तुम्‍हाला विसरणार नाही.’’

‘कोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमीवर झालेल्‍या कुंभमेळ्‍यात समष्‍टी सेवा करतांना ‘साधकांना समजून घेऊन समष्‍टी सेवेचे नियोजन करणे आणि साधकांमध्‍ये नेतृत्‍वगुण निर्माण करणे’, हे मला चेतनदादाकडून शिकायला मिळाले’, याबद्दल परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– एक चरणसेवक (९.१.२०२३)