संस्‍कृतमुळे सुसंस्‍कृत !

लंडन शहराच्‍या मध्‍यवर्ती भागात असणार्‍या ‘सेंट जेम्‍स इंडिपेन्‍डंट स्‍कूल’ या शाळेतील विद्यार्थ्‍यांसाठी संस्‍कृत भाषेचे शिक्षण सक्‍तीचे करण्‍यात आले आहे. ‘संस्‍कृत भाषेमुळे विद्यार्थ्‍यांना गणित, विज्ञान आणि इतर भाषा शिकणे सोपे जाते’, असे संस्‍कृत विभागाचे प्रमुख वारविक जेसप यांचे मत आहे. त्‍या शाळेत आज पहिल्‍या इयत्तेपासून संस्‍कृत शिकवले जाते. आज स्‍वत:च्‍या देशात म्‍हणजेच भारतात उपेक्षा झेलत असलेली देवभाषा संस्‍कृत जगामध्‍ये मात्र एक सन्‍माननीय भाषा समजली जाते ! ‘संस्‍कृत शिकणे म्‍हणजे शिकण्‍यातील महत्त्वपूर्ण दर्जा प्राप्‍त करणे’, असे मानले जाते.

भारतापेक्षा भारताबाहेरील इतर देशांमध्‍ये संस्‍कृतमध्‍ये संशोधन करणारी मंडळी अधिक आहेत. जर्मनीच्‍या १४ प्रसिद्ध विश्‍वविद्यालयांमध्‍ये आणि ४ ब्रिटीश विश्‍वविद्यालयामध्‍ये संस्‍कृत ही भाषा शिकवली जाते. जगातील अनेक शाळांमध्‍ये संस्‍कृत भाषेला पाठ्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्‍हणून समाविष्‍ट करण्‍यात आले आहे. न्‍यूझीलंडची राजधानी असलेल्‍या ऑकलॅन्‍डच्‍या माऊंट इडेन भागातील एका शाळेत विद्यार्थ्‍यांना इंग्रजी शिकवण्‍यासाठी आधी संस्‍कृत शिकवले जाते. ‘फिकिनो’ नावाच्‍या या शाळेतील शिक्षकांचे म्‍हणणे आहे की, संस्‍कृतमुळे मुलांची शिकण्‍याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. ‘ध्रुव संगीत वृंद’चे डॉ. संजय त्रिवेदी यांच्‍या मते ‘नासाच्‍या अंतराळात पाठवण्‍यात येणार्‍या यानामध्‍ये इतर भाषांचा समावेश करायचा झाल्‍यास ‘संस्‍कृत’ या भाषेचा समावेश करू शकतो’; कारण संस्‍कृत भाषेची वाक्‍ये जरी उलटी-सुलटी झाली, तरीही वाक्‍याचा अर्थ पालटत नाही. अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्‍थेने असे संशोधन केले आहे, ‘प्रतिदिन संस्‍कृत भाषा बोलण्‍याने ‘मज्‍जा संस्‍था’ मजबूत होते आणि परिणामी ‘मधुमेह’ अन् ‘कोलेस्‍टेरॉल’ न्‍यून होते.’

अर्थशास्‍त्र शिकवतांना आपण बाहेरच्‍या अर्थतज्ञांपासून आरंभ करतो; पण कौटिल्‍याचे अर्थशास्‍त्र शिकवले जात नाही; कारण कौटिल्‍याचे अर्थशास्‍त्र ‘संस्‍कृत’मध्‍ये आहे. संस्‍कृत भाषेला ‘मृत भाषा’ ठरवल्‍यानेच प्राचीन ज्ञानापासून भारतीय आजही वंचित आहेत. संस्‍कृत ही देवभाषा असल्‍याने शालेय शिक्षणात ती अनिवार्य केल्‍यास त्‍यातील धर्मज्ञानामुळे युवा पिढीतील कुसंस्‍कार, क्रौर्य आणि दुर्जन वृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी साहाय्‍य होऊ शकते. विद्यमान केंद्र सरकारने आता संस्‍कृत भाषेला तिचे पुनर्वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी पावले उचलावीत, अशी अपेक्षा !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे